दिल, दोस्ती : ‘टू’ इज कंपनी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abhishek rahalkar and chinmay patwardhan

मालिकेच्या सेटवर आपल्या सहकलाकाराशी झालेली मैत्री ही सर्वांसाठीच खास असते. अभिषेक रहाळकर आणि चिन्मय पटवर्धन यांच्या मैत्रीची गोष्टही अशीच आहे.

दिल, दोस्ती : ‘टू’ इज कंपनी!

- अभिषेक रहाळकर, चिन्मय पटवर्धन

मालिकेच्या सेटवर आपल्या सहकलाकाराशी झालेली मैत्री ही सर्वांसाठीच खास असते. अभिषेक रहाळकर आणि चिन्मय पटवर्धन यांच्या मैत्रीची गोष्टही अशीच आहे. ‘स्वामिनी’ या मालिकेत चिन्मय माधवराव पेशवे यांची भूमिका साकारत होता, तर अभिषेकनं सदाशिवराव पेशवे यांची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या लुक टेस्टदरम्यान यांची पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत त्यांच्या भरपूर गप्पा झाल्या.

अभिषेक म्हणाला, ‘पहिल्याच भेटीत चिन्मयचे आणि माझे विचार इतके चांगले जुळले, की आता आपल्याबरोबर सेटवर आपल्याच सारखं कोणीतरी आहे हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. चिन्मय खूप मेहनती आणि जिद्दी आहे. त्याचं काम असो अथवा शिक्षण; सगळं तो खूप मन लावून करतो. आमच्या दोघांचंही ट्युनिंग इतकं छान जमलं, की एकमेकांशी न बोलताच आम्हाला काय म्हणायचं हे एकमेकांना कळायचं. त्यामुळं एकमेकांना आपोआप समजून घेतलं जायचं. ‘स्वामिनी’ मालिकेच्या वेळी आम्ही दोघंही एकत्र राहायचो. त्यामुळं सेटवर भरपूर लोकांच्यात वावरल्यानंतर घरी आल्यावर आम्हाला आमची आमची स्पेस हवी असायची, पण तेही आम्हाला एकमेकांना कधी बोलून दाखवावं लागलं नाही. आमचा जसा स्वभाव बऱ्यापैकी सारखा आहे, अशाच आमच्या आवडीनिवडीही सारख्याच आहेत. शूटिंगहून घरी आल्यावर आमच्यात भरपूर गप्पा व्हायच्या. माझ्याप्रमाणंच त्यालाही उर्दू साहित्याची आवड आहे.

रोज रात्री गप्पांच्या ओघात आपोआप आम्ही काय नवीन वाचलं ऐकलं हे एकमेकांशी शेअर करायचो, एकमेकांना शेर ऐकवायचो, एकत्र मिळून एखादी छान गझल, कव्वाली, गाणं, कबीराचे दोहे ऐकयचो... आता आमचं रोज बोलणं होत नाही, पण काही नवीन ऐकलं, वाचलं तर ते एकमेकांशी शेअर केलं जातं. तो माझा खूप मोठा समीक्षक आहे. एकमेकांचं काम पाहिल्यावर काय आवडलं किंवा काय आणखीन चांगलं होऊ शकतं, हेही आम्ही स्पष्टपणे एकमेकांना सांगतो. त्यानं ‘टू’ या शॉर्ट फिल्ममध्ये केलेलं काम मला फार आवडलं. आता मालिका संपून दोन वर्षं झाली आहेत, पण आजही आमच्यातलं बॉण्डिंग तसंच आहे.’’

चिन्मयनं सांगितलं, ‘अभिषेकचं आणि माझा ट्युनिंग पहिल्याच भेटीत जमलं. आम्ही एकत्र राहायला लागल्यावर आमच्यात आणखी चांगली मैत्री झाली आणि हिऱ्याचे पैलू जसे आपल्याला नंतर उलगडत जातात, तसंच काहीसं अभिषेकच्या बाबतीत झालं. तो स्पष्टवक्ता आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं त्याचं अजिबात नाही. तो खूप अभ्यासू आहे. त्याला चौकस ज्ञान आहे. त्यामुळं त्याला कोणत्याही विषयावर गप्पा मारता येतात. अभिषेक प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जातो आणि त्याच्या या स्वभावामुळं त्याचा निर्णय व्हायला वेळ लागतो. अभिषेक उत्कृष्ट अभिनेता आहेच, पण त्याचप्रमाणं एक उत्तम प्रेक्षकही आहे. तो नाटक, चित्रपट याचा खूप मोठा चाहता आहे.

‘पॅरासाईट’ या चित्रपटाची ऑस्करला निवड झाल्यावर तो चित्रपट आम्ही एकत्र पाहायला गेलो होतो. त्या दिवशी घरी आल्यावर रात्री आम्ही फक्त त्या चित्रपटावरच चर्चा केली. त्यासोबतच शेरोशायरी हा आमच्या दोघांच्याही मनाजवळचा विषय. त्यामुळं त्याविषयी आमच्यात बरीच देवाण-घेवाण व्हायची. अभिषेक काही ना काही लिहीत असतो, मीही लिहिण्याचा प्रयत्न करतो म्हणून सेटवरही आमची एक शायराना भाषा तयार झाली होती. आमच्यातल्या कनेक्शनमुळं आणि दोघांना आम्ही काय बोलतो हे कमी शब्दांत समजत असल्यामुळं चारचौघांत मला अभिषेकला एखादी गोष्ट सांगायची असल्यास मी त्या अर्थाचा शेर ऐकवायचो. मग मला काय म्हणायचंय हे अभिषेकला अगदी अचूक कळायचं. त्याचं काम तो मन लावून करतोच, त्याच्याबरोबर फिटनेसकडंही लक्ष देतो. त्यानं आतापर्यंत सगळ्याच भूमिका उत्तमरीत्या साकारल्या आहेत, पण ‘वैदेही३ मालिकेत त्यानं केलेलं काम मला विशेष आवडलं.’

(समाप्त)

टॅग्स :Entertainment