निधड्या छातीचं कोल्हापूर..!

संभाजी गंडमाळे
Sunday, 31 March 2019

आपुलकी, जिव्हाळा असो किंवा एखाद्यावर भरभरून प्रेम करणारं कोल्हापूर... पण, त्याच्याही पेक्षा स्पष्टवक्तेपणाचं आणि निधड्या छातीचं कोल्हापूर म्हणून मला माझ्या शहराचा मोठा अभिमान वाटतो. शिक्षण असो किंवा इथल्या मैदानावर खेळण्याचा आनंद, कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याचा आत्मविश्‍वास कोल्हापूरच्या मातीनं दिला.

आपुलकी, जिव्हाळा असो किंवा एखाद्यावर भरभरून प्रेम करणारं कोल्हापूर... पण, त्याच्याही पेक्षा स्पष्टवक्तेपणाचं आणि निधड्या छातीचं कोल्हापूर म्हणून मला माझ्या शहराचा मोठा अभिमान वाटतो. शिक्षण असो किंवा इथल्या मैदानावर खेळण्याचा आनंद, कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याचा आत्मविश्‍वास कोल्हापूरच्या मातीनं दिला आणि म्हणूनच आमच्यासारखे तरुण मुंबईसारख्या महानगरीत आजही पाय घट्ट रोवून उभे आहेत... प्रसिद्ध अभिनेते आनंद काळे संवाद साधत सांगत होते. पण, त्याचवेळी निवांतपणा हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य असलं तरी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊन ते बदलत्या काळात आता सोडायलाच हवे. अन्यथा स्पर्धेच्या जगात आपण टिकणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही ते मांडतात. 

माईसाहेब बावडेकर प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉमर्स कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धांतून रंगमंचावर ‘एंट्री’ केली. अनेक नाटकं रंगमंचावर आली आणि हीच शिदोरी घेऊन त्यांनी मुंबई गाठली. ‘चार दिवस सासूचे’ या गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिकेतील अशोक देशमुखांची भूमिका त्यांनी तब्बल आठ वर्षे केली. या मालिकेचे तीन हजार ६०० भाग प्रसारित झाले. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या सध्याच्या बहुचर्चित मालिकेत त्यांनी नुकतीच ‘कोंडाजी बाबा फर्जंद’ भूमिकेतून ‘एंट्री’ केली आहे. ‘आमच्या हिचं प्रकरण’ या व्यावसायिक नाटकात त्यांची मध्यवर्ती भूमिका असून, एका वर्षात या नाटकाचे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात १७२ प्रयोग झाले आहेत.
आनंद काळे सांगतात, ‘‘आजवर एकूण ३६ चित्रपट केले. ‘घे भरारी’, ‘आबा जिंदाबाद’, ‘माहेरची पाहुणी’, कुंदन शहांचा ‘पी से पीएम तक’ आदी चित्रपट गाजले. हॉलिवूडच्या ‘रिम्बेम्बर ॲम्नेशिया’ या चित्रपटातही भूमिका असून, हा चित्रपट पुढच्या महिन्यात अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात झाले असून, यानिमित्त कोल्हापूरची लोकेशन्सही आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली आहेत.  महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसच्या माध्यमातून आता दूरचित्रवाणी मालिका व वेबसिरीज निर्मितीत उतरणार आहे.’’   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Anand Kale interview