नागराज मंजुळे विचारणार, 'कोण होणार करोडपती' (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 March 2019

आतापर्यंत दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी नागराज यांना पाहिले. आता सूत्रसंचालक म्हणून ते प्रेक्षकांसमोर येणार असल्याने त्यांचा अंदाज कसा असेल याविषयी उत्सुकता राहील.

अभिनेता सचिन खेडेकर नंतर 'कोण होणार करोडपती' या रिअॅलिटी शो च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आता नवीन खांद्यांवर आली आहे. अभिनेता, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ही जबाबदारी पेलली आहे.

बुद्धीच्या जोरावर सगळे शक्य आहे आणि अभ्यास कधीच वाया जात नाही याची जाणीव करुन देणारा रिअॅलिटी शो म्हणजे 'कोण होणार करोडपती'. हे शो चे तिसरे पर्व आहे. पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी दुसऱ्या पर्वाची जबाबदारी स्वप्निल जोशीने पार पाडली होती. आता नवीन पर्वाची घोषणा झाल्यापासूनच सूत्रसंचालक कोण असणार याची उत्सुकता आणि चर्चा होतीच. पण नागराज मंजुळे यांचे नाव समोर येताच या पर्वाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आणखीनच वाढली आहे. 

'सैराट' दिग्दर्शक म्हणून ओळख असलेले नागराज मंजुळे हे 'कौन बनेगा करोडपती' या शो चा मराठी रिमेक सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती'चे नवे सूत्रसंचालक असतील आणि 'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत मंजुळे सध्या 'झुंड' या चित्रपटाचे शूटींग देखील करत आहेत. हा योगायोगच म्हणावा लागेल. 

आतापर्यंत दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी नागराज यांना पाहिले. आता सूत्रसंचालक म्हणून ते प्रेक्षकांसमोर येणार असल्याने त्यांचा अंदाज कसा असेल याविषयी उत्सुकता राहील. या नवीन पर्वात कोणकोणते नवीन बदल असतील आणि कोणत्या नवीन लाइफलाइन्स असतील हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. गेल्या पर्वापर्यंत शो चे नाव 'कोण होईल मराठी करोडपती' असे होते. आता ते 'कोण होणार करोडपती' असे झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor and director nagraj manjule is new host of kon honar crorepati marathi reality show