'ट्रॅजिडी किंग' दिलीप कुमारांचा नवाबी अंदाज

Senior actor Dilip Kumar
Senior actor Dilip Kumaresakal

डॉ. जलील पारकर

अष्टपैलू अभिनेते दिलीप कुमार वयाची शंभरी पूर्ण करतील असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही वाटत होते; मात्र ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे आजारपण, त्यांचे कौटुंबिक आयुष्य याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे त्यांचे कौटुंबिक मित्र डॉ. जलील पारकर यांनी (actor-dilip-kumar-family-friend-dr-Jalil-parkar-memory-akb84)

दिलीप साहेब यांची तब्येत मागील सातआठ वर्षांपासून नरम-गरम होती. तरीही सुदृढ शरीरयष्टी, जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वासामुळेच ते प्रत्येक आजारावर मात करायचे. काही दिवसांतच खणखणीत बरे व्हायचे. त्यामुळे ते वयाचे शतक पूर्ण करतील असे वाटायचे. मात्र वयोमानाप्रमाणे शरीर त्यांना साथ देत नव्हतं. त्यांच्या डाव्या फुफ्फुसात पाणी झाले होते. त्यांच्या हृदयातील संसर्ग वाढला होता. त्यातच त्यांचे शतक हुकले. आता त्यांच्या सहवासातील आठवणी कायम सोबत राहणार आहेत.

dilip kumar
dilip kumar Team esakal

दिलीप कुमार यांचे भाषेवर फार प्रेम होते. ते सर्व भाषांचा आदर करायचे. हिंदी, उर्दू, इंग्रजीसह त्यांचे पश्तुनी भाषेवरही प्रभुत्व होते. त्यांना या भाषा बोलायला फार आवडायचे. अनेकदा वेगवेगळ्या भाषांमधून आमच्याशी संवाद साधायचे. ते धीरगंभीर आणि सावकाश बोलायचे. त्यांच्या तोंडून निघालेला प्रत्येक ‘लफ़्ज’ टाइप रायटरमधून निघालेला वाटायचा. मराठी नाट्य संगीताचीही जाण होती. रुग्णालयात असताना मी अनेकदा त्यांची मराठी नाट्य संगीताची गुणगुण ऐकली आहे.

अत्यंत मृदुभाषी दिलीप साहब त्यांच्या खास अंदाजात, ऊर्दूचा ‘लहेजा’ असलेल्या हिंदी भाषेत आमच्याशी संवाद साधत. सर्वांचा आदर करायचे. चिडलेले किंवा दुसऱ्यावर ओरडताना मी कधीही पाहिले नाही. उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही नेहमी विचारपूस करायचे. इतकेच नाही, तर त्यांची सेवा करणाऱ्या वॉर्ड बॉयची देखील आस्थेनं चौकशी करत. ‘भाई, सब ठीक है ना... बच्चे कैसे है,’ असे त्यांचे आपुलकीचे शब्द आजही माझ्या कानात रुंजी घालत आहेत.

dilip kumar and dharmendra shatrughana sinha
dilip kumar and dharmendra shatrughana sinha Team esakal

डॉक्टरांप्रति आदर

अगदी सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर डॉ. श्रीकांत गोखले उपचार करत होते. दिलीप साहेबांचे ते आवडते डॉक्टर होते. डॉ. श्रीकांत गेल्यानंतरही दिलीप साहेब त्यांची नेहमी आठवण काढायचे. डॉ. गोखले हे दिलीप साहब यांच्याकडे सायकलवर जायचे. डॉ. गोखले यांच्यासह डॉ. बापट, डॉ. राममूर्ती यांच्याबद्दलदेखील आदर व्यक्त करायचे. डॉ. नितीन गोखले, डॉ. विनय चव्हाण, डॉ. प्रकाश जैदानी, डॉ. बंदुकवाला, डॉ. अनिता पटेल, डॉ. जयदीप पालेप, डॉ. मानस देशमुख हे त्यांच्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर होते. दुसऱ्यांच्या कामात ते कधीच लुडबुड करत नव्हते. डॉक्टरांचे सर्व सल्ले ते तंतोतंत पाळायचे. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या-औषध ते अगदी वेळेवर खायचे. सांगितलेला प्रत्येक सल्ला ते आवर्जून ऐकायचे. ‘डॉक्टर ईश्वर का रूप है’ असे ते म्हणत.

ऋणानुबंध २१ वर्षांचे

दिलीप साहब यांच्यासोबत माझे गेल्या २१ वर्षांपासूनचे ऋणानुबंध होते. तशी त्यांची ओळख त्याही आधीपासूनची होती; मात्र डॉक्टर म्हणून माझे त्यांच्या कुटुंबाशी मैत्रीपूर्ण नाते हे साधारणत: २००० पासूनचे. त्यांच्या कुटुंबाला मी आधीपासून ओळखत होतो. माझे बाबादेखील त्यांच्या मित्रांपैकी एक होते. त्यांचे दोन्ही भाऊ माझे चांगले मित्र होते. त्यांच्या बहिणीवरही मी अनेकदा उपचार केले. ते त्यांच्या भावा आणि बहिणीची फार काळजी घ्यायचे. त्यांचं काही दुखलं-खुपलं की मी हजर व्हायचो, त्यामुळे त्यांच्या घरी माझे अनेकदा जाणे होत असे. ते जेव्हा कधी घरी असत तेव्हा आवर्जून आमच्याशी गप्पा मारत असत. घरी आलेल्या पाहुण्यांचे ते फार मनापासून स्वागत करायचे.

Dilip Kumar
Dilip Kumarsakal

अफाट वाचन

दिलीप कुमार यांचे वाचन चौफेर होते. खास करून आंतरराष्ट्रीय लेखकांची पुस्तके वाचायचे. बरेचदा पुस्तक हातात घेऊनच माझ्याशी बोलायचे. जगभरातील वेगवेगळ्या विषयांवर वाचन करीत असत. त्यांना वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेणे, त्यांची ओळख करून घेण्यात रमायचे. जेव्हा ते गप्पा मारत तेव्हाही जगभरातील वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचे आणि एकांतात विचारमग्न असायचे. त्यांना दर्जेदार कविता आणि शास्त्रीय संगीत आवडायचे. अर्थपूर्ण गीतं आणि शायरीचेही चाहते होते. शकील बदायुनि, मजरुह सुल्तानपुरी, साहिर लुधियानवी यांची अनेक गीतं आणि कविता त्यांच्या तोंडपाठ होत्या. या कवितांमधील ओळी किंवा शायरीचा वापर ते बोलण्यातही करायचे. महंमद रफी, तलत महेमूद यांची गाणीही त्यांना आवडायची. प्राण, राज कपूर, देव आनंद, मुराद, अजित हे त्यांचे खास मित्र. मधुबाला, वैजयंतीमाला, वहिदा रहेमान, नर्गिस, निम्मी या अभिनेत्रींशी त्यांचे चांगले संबंध होते. ते महिलांचा फार आदर करत असत.

shahrukh khan at dilip kumar house esakal news
shahrukh khan at dilip kumar house esakal news

दिलीप साहेब यांचा जन्म पेशावरचा.

तेथील संस्कृतीचा प्रभाव आणि संस्कार होते. ते आजारपणातही कधी घाबरलेले किंवा गोंधळलेले दिसले नाहीत. प्रत्येक संकटाला धीरगंभीरपणे ते तोंड द्यायचे. आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. डोळ्यात तो नेहमी दिसायचा. प्रचंड देशाभिमानी होते. त्यांना मोठी चित्रपट कंपनी काढायची फार इच्छा होती, त्याविषयी ते भावाशी बोलायचे; मात्र काही कारणास्तव ते झाले नाही; पण त्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून दिलंय ते कुठल्या इन्स्टिट्यूटपेक्षा कमी नाही.

दिलीप साहब यांच्या ‘हेअर स्टाईल’ने सर्वांनाच गारुड घातलं होतं. त्यांच्या केसांची स्टाइल ही त्यांची ओळख राहिली आहे. ती त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांचे केस जसे होते तसेच शेवटपर्यंत होते. कधी कधी ते केसांवरून हात फिरवत संवाद साधत. कडक हस्तांदोलनही त्यांची आणखी एक खासियत. हस्तांदोलन नेहमी एखाद्या जवानासारखे कडक करायचे. ते हस्तांदोलन मी कधीही विसरणार नाही.दिलीप साहब खूप एनर्जीटिक होते. काही वेळा ते माझ्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना जरा बरे वाटले की खूप गप्पा मारायचे. डॉक्टर नाही मिळाला तर पॅरामेडिकल स्टाफसह ते दिलखुलास बोलायचे. रुग्णालयाचा कॉरिडॉर किंवा गार्डनमध्ये सर्वांसोबत फिरायला जायचे. त्यांच्या जगण्यात उत्साह होता.

ते आले आणि पिनड्रॉप सायलेन्स...!

१९७८ सालातील गोष्ट असेल. त्या वेळी मी जे जे वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होतो. माटुंगामधील षण्मुखानंद सभागृहात आमचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमाला हजर होते. नट-नट्यांना बघून विद्यार्थ्यांनी सभागृहात आरडाओरड, शिट्या मारायला सुरुवात केली. मोठा जल्लोष सुरू होता. आम्ही विद्यार्थी कुणाचंही ऐकायला तयार नव्हतो. शेवटी आयोजकांनी दिलीप साहब यांना विनंती केली. दिलीप साहब स्टेजवर आले आणि त्यांनी माईक हातात घेतला. ते बोलायला गेले आणि सर्व विद्यार्थी शांत झाले. सभागृह ‘पिन ड्रॉप’ सायलेन्स झाला. ही ताकद दिलीप साहब यांची होती.

दिलीप कुमार हे जरी ‘लिजेन्ड्री ॲक्टर’ असले तरी त्यांचे राहणीमान खूपच साधे होते; मात्र अंदाज एखाद्या नवाबासारखा. ‘राम और श्याम’ चित्रपटातील एका दृश्यात ते जिन्यावरून नवाबी अंदाजात खाली येत असल्याचा सीन आहे, त्याच अंदाजात ते त्यांच्या घरातील जिन्यावरूनदेखील उतरायचे. त्यांच्या घरातील जिना पाहिला की मला त्यांच्या त्या चित्रपटाची आठवण येते.दिलीप साहब राज्यसभेवर खासदारदेखील होते; मात्र त्यांचे सर्व पक्षांत मित्र होते. बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या खास मित्रांपैकी एक होते. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, शरद पवार, राजीव गांधींपासून ते अगदी सोनिया गांधींपर्यंत त्यांचे सर्वांशी चांगले व मैत्रीचे संबंध होते.

Dilip-Kumar-and-Saira-Banu
Dilip-Kumar-and-Saira-Banu

सायरा बानू त्यांची खरी सखी

दिलीप साहब जेव्हा कधी आजारी पडले, जेव्हा रुग्णालयात आले तेव्हा त्यांच्यासोबत नेहमी त्यांची पत्नी सायरा बानू असायच्या. त्यांच्याशिवाय दिलीप साहब आल्याचे मला कधीही आठवले नाही. त्या दिलीप साहब यांची फार काळजी घ्यायच्या. रुग्णालयात एवढा स्टाफ असला तरी त्या त्यांच्याजवळ थांबायच्या. त्यांची शुश्रूषा करायच्या. दोघांमधील असं घट्ट नातं इतर कुठेही दिसणे कठीणच. त्यांच्या कपड्यावर एक डागही पडलेला त्यांना आवडायचा नाही. दिवसातून दहा वेळा कपडे खराब झाले तरी त्या दहा वेळा त्यांचे कपडे बदलायच्या. त्या कधीही कंटाळलेल्या मला दिसल्या नाहीत. कदाचित यामुळेच दिलीप साहब यांना दीर्घ आयुष्य लाभले.

(शब्दांकन : मिलिंद तांबे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com