"थ्री इडियट्स" मध्ये 'व्हायरस' ची भूमिका साकारणार होता 'हा' अभिनेता!

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 मे 2020

राजकुमार हिरानी दिग्दर्शित थ्री इडियट्स' चित्रपट हा अनेक अर्थांनी खूप खास आहे. अगदी कमाईचे विक्रम असो किंवा चित्रपटाची कथा, गाणी किंवा अगदी कलाकार सर्व काही छान जुळून आल्यानंतर एक उत्तम कलाकृती कशी तयार होते याचे उदाहरण म्हणजे थ्री इडियट्स' चित्रपट आहे. या चित्रपटामधील अनेक भूमिकांकडे आजही पाहिल्यावर ती इतर कोणत्या अभिनेत्याने अधिक चांगल्या प्रकारे साकारली असती असे ठामपणे सांगता येणार नाही. 

मुंबई : चित्रपट अनेकांना पाहायला आवडतात. हिंदी, मराठी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या चित्रपट अनेकांना आवडतात. काही चित्रपट काहींना प्रभावित करून जातात. असाच हिंदीमधील थ्री इडीयट्स चित्रपट इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित वास्तव चित्र दाखवणारा चित्रपट अनेकांना भावला आहे.

बोमण ईरानीच्या ऐवजी हा अभिनेता साकारणार होता भूमिका
राजकुमार हिरानी दिग्दर्शित थ्री इडियट्स' चित्रपट हा अनेक अर्थांनी खूप खास आहे. अगदी कमाईचे विक्रम असो किंवा चित्रपटाची कथा, गाणी किंवा अगदी कलाकार सर्व काही छान जुळून आल्यानंतर एक उत्तम कलाकृती कशी तयार होते याचे उदाहरण म्हणजे थ्री इडियट्स' चित्रपट आहे. या चित्रपटामधील अनेक भूमिकांकडे आजही पाहिल्यावर ती इतर कोणत्या अभिनेत्याने अधिक चांगल्या प्रकारे साकारली असती असे ठामपणे सांगता येणार नाही. म्हणजे अगदी आमीर खानने साकारलेला रँचो असो किंवा आर. माधवनने साकारलेला फरहान असो प्रत्येक कलाकाराची निवड अगदी योग्यच आहे हे चित्रपट पाहिल्यावर जाणवतेच. याच चित्रपटामध्ये बोमन इराणी यांनींही महाविद्यालयाच्या डीनची भूमिका अगदी चोखपणे पार पडली. मात्र चित्रपटामध्ये रँचोने 'व्हायरस' हे टोपण नाव दिलेली ही भूमिका करण्यास बोमन यांनी नकार दिला होता. आपल्याऐवजी इरफान खानला या भूमिकासाठी विचारावे असे बोमन यांनी हिरानी यांना कळवले होते.

बोमन म्हणाले....

याबद्दल बोमन यांनीच नुकत्याच एका मुलाखतीमध्ये माहिती दिली. बोमन इराणी यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये 'थ्री इडियट्स' मधील भूमिकेसंदर्भात माहिती दिली. हिरानी यांनी या भूमिकेसाठी बोमन यांना विचारले होते. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मुन्नाभाईमधील भूमिकेप्रमाणेच असल्याचे सांगत ती साकारण्यास नकार दिला होता. “तुम्ही जर नीट या दोन्ही भूमिकांकडे पाहिले तर दोन्ही सारखीच पात्रं आहेत हे तुमच्या लक्षात येईल. दोन्ही पात्रांमध्ये खूप साम्य आहे. ते दोघेही डीन आहेत. दोघांच्याही मुली अशा हिरोच्या प्रेमात पडतात जो या दोघांच्या डोळ्यात खुपत असतो,” असं या भूमिकांमधील साम्य सांगताना बोमन म्हणाले.

...तर इरफानला पाहण्याची संधी मिळाली असती.

याचमुळे त्यांनी मुन्नाभाईनंतर पुन्हा एकदा अशीच भूमिका साकारण्यास नकार दिला होता. "मी त्यावेळी हिरानी यांना इरफानला या भूमिकेसाठी घेण्याचा सल्ला दिला होता. इरफान जी भूमिका साकारतो अगदी उत्तम प्रकारे साकारतो असे कारणही मी त्यावेळी दिले होते." असे या मुलाखतीमध्ये बोमन यांनी सांगितले. मात्र बोमन यांनी दिलेला सल्ला हिरानी यांना पटला नाही. “या भूमिकेसाठी इरफान खूप तरुण वाटेल असे हिरानी यांनी मला सांगितले. त्यावेळी म्हणजे मी खूप वयस्कर आहे का असा सवाल हिरानी यांना केला आणि आम्ही दोघेही हसत सुटलो,” अशी त्या चर्चेच्या वेळेची आठवणही बोमन यांनी सांगितली. नंतर आपण हिरानी यांच्याबरोबर या भूमिकेबद्दल चर्चा करुन ती मुन्नाभाईमधील भूमिकेपेक्षा थोडी वेगळी कशी वाटेल याबद्दल चर्चा करुन भूमिका साकारण्यास होकार दिल्याचेही बोमन यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच हिरानी यांनी बोमनचा सल्ला ऐकला असता तर आपल्याला 'व्हायरस'च्या भूमिकेमध्ये बोमन यांच्याऐवजी इरफान खानला पाहण्याची संधी मिळाली असती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor irfan khan was going to play the role of 'Virus' in 'Three Idiots'!