'घटस्फोट नको, आणखी एक संधी द्यायची आहे

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 6 March 2021

आता आलियाने तिचा विचार बदलला आहे. ती म्हणते, जेव्हा मला कोरोना झाला होता तेव्हा मुंबईतील घरी मी एकटे होते.

मुंबई - आपल्या अभिनयामुळे सर्वांच्या कौतूकास पात्र झालेल्या नवाझुद्दीन सिध्दीकीला आता वेगळ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरु असल्याची चर्चा समोर आली आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमकं कोणत्या थरापर्यत जाणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे तर जगाच्या पाठीवर नवाझुद्दीनचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांनाही त्या बातमीनं धक्का बसला आहे. मात्र त्याच्या पत्नीनं माघार घेतल्याची कळते आहे. तिनं जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यामुळे सध्या तरी त्यांच्यात कोणताही वाद नसल्याचे दिसून येते आहे.

आलियाने एका मीडिया हाऊसशी बोलताना आपली इच्छा केली आणि म्हणाली की, तिला पुन्हा एकदा नवाजसोबत राहायचे असून घटस्फोट नको आहे. 11 वर्षांपूर्वी नवाझुद्दीनचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नवाज आणि आलिया यांच्या नात्यात ठिणगी पडल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र आता आलियाने आपला निर्णय बदलला आहे. आलियाच्या मते, तिला नवाझुद्दीनला संधी द्यायची आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलियाने ईमेल व व्हॉट्सअ‍ॅपवर कायदेशीर नोटीस पाठवत त्याच्याकडून घटस्फोट घेण्याची मागणी केली होती.

आता आलियाने तिचा विचार बदलला आहे. ती म्हणते,  जेव्हा मला कोरोना झाला होता तेव्हा मुंबईतील घरी मी एकटे होते. त्या परिस्थितीत नवाजने दोन्ही मुलांची काळजी घेण्यास मला साथ दिली. आता मला या नात्याला आणखी एक संधी द्यायची आहे.आलियाने तिचा घटस्फोटाचा निर्णय मागे का घेतला? याबद्दल तिला विचारले असता तिने खुलासा केला आहे. ती म्हणाली, 'गेल्या दहा दिवसांपासून मी कोरोनाशी लढतेय, घरी क्वारंटाइन आहे. या दरम्यान माझी मुलं , 11 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा यांची सर्व जबाबदारी नवाजुद्दीनने घेतली आहे. तो लखनऊमध्ये शुटिंग करतोय, असे असले तरी तो मुलांकडे लक्ष देतोय, त्यांची काळजी घेतोय, इतकेच नाही तर माझीही विचारपूस करतो', त्याचे हे रूप पाहून मला आनंद होतोय', असे आलिया म्हणाली.

आलिया म्हणाली, आमच्या दोघांमध्ये जे काही गैरसमज किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही एकत्र बसून सोडवण्याचा प्रयत्न करु. आम्ही याबद्दल सकारात्मक आहोत, असेही आलियाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor nawazuddin siddiquis wife Aaliyah actor wants to live with him again