कोल्हापूर, खणखणीत टॅलेंट...!

संभाजी गंडमाळे
सोमवार, 1 एप्रिल 2019

कधी कधी ‘हा आला कोल्हापूरचा शाहू महाराज’ असं म्हणूनही कमी लेखण्याचा प्रयत्न होतो; पण आम्ही त्याचवेळी ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा राजर्षी शाहूंचा बाणाच अंगिकारतो आणि जे काही असेल ते गुणवत्तेवर, अशी खमकी भूमिका घेतो,

बाळ्या, पक्‍या, अवध्या म्हणजे कोल्हापूर...तांबडा-पांढरा, मिसळ, कोल्हापुरी पायताण म्हणजे कोल्हापूर, पैलवान रांगडा गडी म्हणजे कोल्हापूर, असा अभिमान मिरवताना हे सगळं असलं तरी ‘डोक्‍यानं कमी’ असं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न कधीकधी जाणीवपूर्वक होतो. पण, हे कधीच खपवून घेणार नाही. कोल्हापूर म्हणजे जसा सरळसोटपणा तसंच खणखणीत टॅलेंट आहे आणि पूर्वीच्या पिढ्यांसह आमच्या पिढीनेही ते सिद्ध करून दाखवलं आहे. येणारी पिढी तर आमच्यापेक्षा कैक पटीने पुढे असेल... अभिनेता स्वप्नील राजशेखर अगदी सरळसोटपणे संवाद साधत असतात.

कधी कधी ‘हा आला कोल्हापूरचा शाहू महाराज’ असं म्हणूनही कमी लेखण्याचा प्रयत्न होतो; पण आम्ही त्याचवेळी ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा राजर्षी शाहूंचा बाणाच अंगिकारतो आणि जे काही असेल ते गुणवत्तेवर, अशी खमकी भूमिका घेतो, असेही ते आवर्जून सांगतात.

स्वप्नील यांचं शिक्षण कोल्हापुरातच झालं आणि ‘जुळता जुळता जुळतंय की’ म्हणत त्यांची गाठही जुळली ती इथल्या शिवाजी पेठेतच. आजवर त्यांचे ८७ हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. अलीकडच्या काळातील ‘कट्यार काळजात घुसली’, ‘काशिनाथ घाणेकर’, ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’, ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’ आदी चित्रपट गाजले. ‘राजा शिवछत्रपती’, ‘कुलस्वामिनी’, ‘जय मल्हार’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘स्वप्नांच्या पलिकडले’, ‘अजूनही चांदरात आहे’ यासह सध्याच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘जुळता जुळता जुळतंय की’ या दूरचित्रवाणी मालिकाही रसिकांनी डोक्‍यावर घेतल्या. ‘खेळ मांडला’ मालिकेसह ‘सावट’, ‘बलुतं’ या लघुपटांचे लेखनही केले. त्यासाठी अनेक बक्षिसेही त्यांना मिळाली. 

स्वप्नील सांगतात, ‘‘कोल्हापूरचा असल्याचा स्वाभिमान नेहमीच लढण्याचे बळ देतो. विशेषतः संघर्षाच्या काळात तर तो पुन्हा पुन्हा नव्या उमेदीनं कामाला लाग, अशी प्रेरणा देत राहतो. मुळात कोल्हापूरचा म्हणून असलेला आणखी एक महत्वाचा संस्कार म्हणजे एकवेळ एखाद्याचं लग्न चुकलं तरी चालेल; पण मयताला गेलेच पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Swapnil Rajshekhar interview