नायक अन्‌ खलनायकही... 

अरुण सुर्वे
गुरुवार, 31 मे 2018

'एक हसीना थी' या मालिकेत मी खलनायकाची भूमिका साकारली. मात्र, त्यापूर्वी मी 'टारझन - द वंडर कार' या चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती अन्‌ त्यातून लोकप्रियही झालो होतो. त्यामुळे खलनायक सरकारनं जमेल की नाही, याची शंका होती. पण, त्यातही मला यश आलं. सांगतोय अभिनेता वत्सल शेठ... 

आमचं कुटुंबीय मुळचं गुजराथचं. पण, माझे आजोबा काही वर्षांपूर्वी मुंबईत आले. अन्‌ येथेच स्थायिक झाले. त्यामुळे आम्हीही मुंबईकरच झालो. माझा जन्मही मुंबईतच झाला. माझं शालेय शिक्षण उत्पल शाळेमध्ये तर मिठीबाई महाविद्यालयात मी पदवी घेतली.

खरंतर आमच्या कुटुंबात अभिनय क्षेत्रामध्ये कोणीही नव्हतं. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी कधीच नाटक वा स्नेहसंमेलनात सहभागी झालो नाही. मात्र, चार-पाच वर्षांचा असताना मी एकदाच स्नेहसंमेलनात सहभाग घेत रॅबिट बनलो होतो. महाविद्यालयीन शिक्षणानंतर माझ्यात अभिनयाची गोडी वाढू लागली. त्यामुळे मी ऑडिशन देण्यासाठी सुरवात केली. काही जाहिरातींमध्येही काम केलं. त्याचदरम्यान मला 1998 मध्ये 'जस्ट मोहब्बत' या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. खरंतर हा माझ्यासाठी छोट्या पडद्यावर पहिला अन्‌ मोठा ब्रेक होता. त्यामुळे अभिनयातील बारकाव्यांसह अनेक तांत्रिक गोष्टी येथे मला शिकता आल्या अन्‌ याच मालिकेपासून मी स्वतःला अभिनयात झोकून दिले. 'टारझन द वंडर कार' या चित्रपटामध्ये अभिनयाची संधी मिळाली. या चित्रपटाच्या माध्यमातूनच मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट युवांसह लहान मुलांना इतका आवडला, की त्यातील माझ्या भूमिकेचं भरभरून कौतुक झालं. त्यानंतर 'पेइंग गेस्ट', 'हिरोज', 'यू मी और हम', 'तो बात पक्की' यांसह काही चित्रपटांत काम केलं. तसेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'एक हसीना थी', 'बाजीगर', 'हासिल' या मालिकांमध्ये अभिनय केला.  
मनीष गुप्ता यांच्या 'हॉस्टेल' या चित्रपटातील भूमिकेमुळेही मला खूप प्रसिद्धी मिळाली. दरम्यान, विक्रम भट यांच्या 'गेहरायियाँ' या वेबसीरिजमध्येही मी अभिनय केला. त्यात मी भूताचं पात्र साकारलं. हे पात्र साकारताना खूप मजा आली अन्‌ तो एक वेगळाच अनुभव होता. यामध्ये मला उत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं. माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण 'हासिल' या मालिकेमुळे आला. कारण, यासाठी मला गोल्ड अॅवॉर्ड मिळालं. ज्यावेळी पारितोषिक वितरण समारंभ होता, तेव्हा माझ्या आई-बाबांना व्यासपीठावर बोलविलं अन्‌ त्यांनी ते अॅवॉर्ड स्वीकारलं. त्यामुळे मी खूप आनंदित झालो. 'एक हसीना थी' या मालिकेत मी शौर्यची अर्थात खलनायकाची भूमिका साकारली. पण, ही भूमिका स्वीकारावी की नको, या मनःस्थितीत होतो. त्यातच माझी शरीरयष्टी व उंचीही तेवढी नव्हती. त्यातच टारझनमध्ये मी नायकाची भूमिका साकारली होती अन्‌ त्यातून मी लोकप्रियही झालो होतो. त्यामुळे खलनायक सरकारनं जमेल की नाही, याची शंकाही मला होती. मात्र, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ती भूमिका माझ्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली अन्‌ त्यात मला यशही आलं. विशेष म्हणजे प्रेक्षकांनाही ही भूमिका खूप आवडली अन्‌ त्यांनी माझी खलनायकाची भूमिका स्वीकारली, याचा आनंदही झाला. खरंतर हाच माझ्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. तेव्हापासूनच मला खलनायकाच्या भूमिका मिळण्यास सुरवात झाली. आगामी काळातही मला नायक व खलनायकाच्या भूमिका साकारायच्या असून, बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी मी प्रयत्नही करत आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Actor Vatsal Sheth Interview