कोल्हापूर माणुसकीचा मळा...!

संभाजी गंडमाळे
रविवार, 7 एप्रिल 2019

‘‘गंगावेस आणि शिवाजी पेठ परिसरात सारं बालपण गेलं. साहजिकच इथल्या पेठेत झालेली जडणघडण आणि मिळालेल्या संस्काराची शिदोरी घेऊनच करिअरचा एकेक टप्पा पार करतो आहे.’’ 

- विकास पाटील, अभिनेता

एकमेकांना कुठलाही हेतू मनात न ठेवता जमेल तेवढी मदत करणारं, माणसांत मिसळायला शिकवणारं कोल्हापूर म्हणजे माणुसकीचा मळाच. इथला माणसांचा गोतावळा आणि त्यांची िजवापाड जपली जाणारी मैत्री हीसुद्धा अफलातूनच. त्यातही कलापूर म्हणून मानाने मिरवताना एकमेकांना उभं करण्यासाठी प्रत्येकाची सुरू असलेली धडपड साऱ्यांनाच प्रेरणा देत राहते... अभिनेता विकास पाटील भरभरून बोलत असतो. त्याच्याशी संवादातून त्याचा एकूणच प्रवास, कोल्हापूरविषयीच्या आठवणींचे विविध पदर उलगडत जातात.   

विकास पाटील नावाचं एक सळसळत्या उत्साहाचं अजब रसायन येथील रंगभूमीला मिळालं ते सुमारे सोळा-सतरा वर्षांपूर्वी. महाराष्ट्र हायस्कूल, न्यू कॉलेजचा तो विद्यार्थी. विद्यार्थी दशेपासूनच नाटक हेच त्याचं ध्येय ठरलं. प्रत्यय नाट्य संस्थेच्या माध्यमातून त्यानं रंगमंचावर पहिलं दमदार पाऊल टाकलं आणि बक्षिसांची लयलूट सुरू केली.

राज्य नाट्य स्पर्धेत ‘फुटबॉल’मधील त्याच्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं तर ‘रात्रंदिन आम्हां’तील भूमिकेसाठी ‘झी ॲवॉर्ड’ मिळालं. ही काही प्रातिनिधीक उदाहरणं. पण, त्यानंतर नाटक आणि चित्रपटात त्यानं हळूहळू जम बसवला. अर्थात त्यालाही सुरवातीच्या काळात संघर्ष चुकला नाही. पण, आत्मविश्‍वासाच्या बळावर तो एकेक टप्पा पार करत इंडस्ट्रीत ताठ मानेनं उभा राहिला.

‘अस्मिता’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘देवयानी’, ‘पिंपळपान’, ‘तू माझा सांगाती’ आदी दहाहून अधिक मालिका त्यानं केल्या. सध्या ‘जीव झाला येडािपसा’च्या शूटींगमध्ये तो व्यस्त आहे. या मालिकेसाठी तो संवादलेखनही करतो आहे. ‘फॅंड्री’, ‘अय्या’, ‘हिरॉईन’, ‘पोरबाजार’, ‘तुकाराम’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘गंध’, ‘डबल सीट’, ‘मराठी टायगर’ आदी पंचवीसहून अधिक हिंदी व मराठी चित्रपटांतून तो झळकला. ‘हमीदाबाईची कोठी’ आणि आता ‘व्यक्ती आणि वल्ली’ या बहुचर्चित नाटकातूनही तो रंगदेवतेची सेवा करतो आहे. ‘संभवतः’ या लघुपटासाठी त्याला नुकतेच अभिनयाचे पारितोषिक मिळाले आहे. 

विकास सांगतो, ‘‘गंगावेस आणि शिवाजी पेठ परिसरात सारं बालपण गेलं. साहजिकच इथल्या पेठेत झालेली जडणघडण आणि मिळालेल्या संस्काराची शिदोरी घेऊनच करिअरचा एकेक टप्पा पार करतो आहे.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Vikas Patil interview on Kolhapur