esakal | actress-mandira-bedi-birthday-special-she-did-not-want-baby-12-years-due-her-career
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Mandira bedi struggle to enter in Bollywood as well as television industry

आई होण्यापेक्षा करिअरला दिलं महत्व; बारा वर्षानंतर घेतला 'चान्स'

sakal_logo
By
युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - टेलिव्हिजनवर ९० च्या दशकात प्रसिध्द झालेल्या शांती या मालिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याला कारणही तसचं होतं. त्या मालिकेमध्ये काम करणा-या मंदिरा बेदी नावाच्या अभिनेत्रीनं आपल्या नावाचा ठसा भूमिकेच्या माध्यमातून उमटवला होता. 15 एप्रिल हा तिचा जन्मदिवस आहे. मंदिराचा चित्रपटांमध्ये फारसा जीव रमला नाही. त्यामुळे ती छोट्या पडद्यावर रमली. तिथून तिची लोकप्रियता वाढली. गेल्या वर्षी तिनं थिंकिस्तान नावाच्या वेबसीरिजमध्ये काम केले होते. त्यात तिच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली. एका जाहिरात एजन्सीमध्ये क्रिएटीव्ह हेडची भूमिका मंदिरानं त्यात साकारली होती. सर्वात प्रथम करिअरकडे लक्ष देणारी अभिनेत्री म्हणूनही मंदिराचा उल्लेख करावा लागेल. त्यासाठी तिनं आपल्या मातृत्वालाही नाकारलं होतं. जन्मदिनाच्या निमित्तानं जाणून घेऊयात मंदिराचा प्रवास.

1994 मध्ये दुरदर्शनवर शांती नावाची मालिका आली होती. त्यात मंदिरानं जबरदस्त काम केले होते. तेव्हापासून तिच्यातील अभिनयाला पैलू पडण्यास सुरुवात झाली होती. कुठल्याही साच्यात अडकून न पडता नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्यास तिनं प्राधान्य दिले होते. क्रिकेटमध्ये समालोचन करुन वेगळा ठसा उमटवला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींविषयी खुलासा केला आहे. तिनं सांगितलं आहे की, मी 12 वर्षे मातृत्वापासून लांब राहिले त्याचे कारण करिअर हेच होते. वयाच्या विशीपासून मी मनोरंजन क्षेत्रात आहे. तेव्हापासून मी माझ्या ताकदीवर करिअर केले. 30 व्या वर्षी मी स्वतला असुरक्षित समजत होते. आता 40 असताना मला खुप छान वाटत आहे.

12 वर्षानंतर आई झाल्यानंतर कसे वाटले या प्रश्नावर मंदिरानं सांगितलं की, मी 2011 मध्ये मुलाला जन्म दिला. त्यावेळी मी 39 वर्षांची होते. मला नेहमी भीती वाटायची की जर मी प्रेग्नेंट झाले तर माझे करिअर संपून जाईल. कारण मनोरंजन क्षेत्रात कमालीची स्पर्धा आहे. त्यातील राजकारणाविषयी मला चांगले माहिती होते. त्यामुळे मी सावध होते. मला माझ्या जबाबदारीची जाणीवही होती. मात्र योग्य त्यावेळी काय करावे असा प्रश्न माझ्यापुढे होता. यासगळ्या निर्णयासाठी मला माझ्या पतीच्या सल्ल्याची गरज होती. त्याच्याशिवाय आमच्यातील नातं योग्य प्रकारे चालणार नव्हतं.

1999 मध्ये मंदिरानं दिग्दर्शक राज कौशल यांच्याशी लग्न केलं. मुलाखतीत मंदिरानं सांगितलं, मनोरंजन क्षेत्रात महिलांचा प्रवास हा फार काळ चालत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. मला नेहमी त्याच गोष्टीची भीती वाटायची. चित्रपट आणि मालिकांमध्ये बराच काळ काम करणा-या कलाकारांमध्ये कालांतरानं असुरक्षितपणाची भावना येऊ लागते. मंदिरानं 1995 मध्ये दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधून अभिनेत्री म्हणून सुरुवात केली होती.

loading image