नम्रता म्हणाली, गरोदरपणात सात महिने मी शूट केलं आणि सासूबाई मात्र.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress namrata sambherao talk about her mother in law in sony marathi instagram live maharashtrachi hasyajatra

नम्रता म्हणाली, गरोदरपणात सात महिने मी शूट केलं आणि सासूबाई मात्र..

Maharashtrachi Hasyajatra : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'नम्रता संभेराव'. तिनं साकारलेली 'लॉली' असो, 'आई' असो किंवा नुकतेच सर्वांसमोर आलेले 'पावली' हे पात्र असो. तिच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला हसवलं आहे. नुकतीच ती सोनी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून लाईव्ह आली होती. यावेळी तिनं वैयक्तिक आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. (actress namrata sambherao talk about her mother in law in sony marathi instagram live maharashtrachi hasyajatra)

या लाईव्ह मध्ये नम्रता म्हणते, 'आज नवरात्री निमित्त सांगायचं झालं तर मला माझी आई आणि माझी सासू या दुर्गेच्या अवतारात आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. मी आज अभिनेत्री म्हणून मिळालेल्या यशामागे माझी आई आणि सासू आहेत. आज मी तुमचं मनोरंजन करत आहे याचं भाग्य मला माझ्या आईमुळे मिळालं. तिचा मला पाठिंबा मिळाला नसता तर मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दिसले नसते. आज मी या क्षेत्रामध्ये जे काही मिळवलं आहे त्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे.'

पुढे ती आपल्या सासूबाईंबाबत म्हणते, 'माझ्या आयुष्यातील दुसरी दुर्गा म्हणजे माझ्या सासूबाई. लग्नानंतर मुलींना बरंच टेन्शन असतं. आपल्या सासरकडची मंडळी आपल्या सांभाळून घेतील की नाही?, आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करण्यास आपल्याला पाठिंबा मिळणार की नाही? असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात असतात. पण माझं हे टेन्शन अगदी दूर झालं. कारण मला माझ्या सासूबाईंनी पूर्णपणे पाठिंबा दिला.'

'गरोदरपणात मी जवळपास सात महिने काम केलं. हे फक्त सासूबाईंमुळे शक्य झालं. माझा मुलगा रुद्राज झाल्यानंतरही तू पुढच्या सहा महिन्यामध्ये पुन्हा कामाला जायचं असं त्यांनी मला सांगितलं होतं. मुलाचं टेन्शन घेऊ नको त्याला आम्ही सांभाळू. तू नीट काम कर असं त्यांनी मला आवर्जून सांगितलं. त्यांचा हाच पाठिंबा मिळाला आणि मी काम करू शकले.' अशा भावना तिने व्यक्त केल्या.