'चारचौघात सांगता येणार नाही असं साजिद माझ्याशी वागला'

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 20 January 2021

आपल्याशी शाररिक गैरवर्तन केल्याचा आरोप शर्लिननं साजिदवर केला आहे. ज्यावेळी तिनं ही बाब सोशल मीडियावर प्रसिध्द केली तेव्हा साजिदला नेटक-यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई - दिवंगत अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येवर बीबीसीनं जो माहितीपट तयार केला आहे त्यात जियाच्या बहिणीनं दिग्दर्शक साजिद खानवर मी टू चे आरोप केले आहेत. त्यानंतर अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रानंही साजिदवर फार गंभीर आरोप केले आहेत. साजिदनं आपल्याशी लैंगिक विकृत वर्तन केल्याचे तिनं म्हटले आहे. सोशल मीडियावरही तिनं ही पोस्ट शेयर केली आहे.

आपल्याशी शाररिक गैरवर्तन केल्याचा आरोप शर्लिननं साजिदवर केला आहे. ज्यावेळी तिनं ही बाब सोशल मीडियावर प्रसिध्द केली तेव्हा साजिदला नेटक-यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली आहे.  सहा वर्षांपूर्वी शर्लिन ही साजिदला भेटली होती. त्यावेळी साजिदनं आपल्याशी गैरवर्तन केल्याचे तिनं म्हटलं आहे. चारचौघात सांगता येणार नाही अशा पध्दतीनं साजिद माझ्याशी वागला. ते माझ्यासाठी फारच धक्कादायक होते. त्याला त्याचे काहीच वाटले नाही. माझ्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर मी साजिदला भेटायला गेली होते. त्यावेळी त्यानं खूप खालच्या पातळीवर जाऊन माझ्याशी वर्तन केलं. त्याच्याकडून हे अपेक्षित नव्हते.

तो मला जबरदस्तीने लैंगिक कृत्य करण्यास प्रवृत्त करत होता. त्याला मी मनाई केल्यानंतरही तो काही ऐकेना. मी असे काही करणार नाही याची साजिदला समज दिली. तसेच यासाठी मी त्याला भेटायला आली नसल्याचेही सांगितले. जे काही झालं ते सगळं कल्पनेच्या पलीकडचे होते. हे सगळं सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर साजिदला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येऊ लागले आहे. त्याच्यावर टीकाही केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी जियाच्या बहिणीनं जियावरील माहितीपटात दिलेल्या मुलाखतीत साजिदवर मी टू चे आरोप केले होते. या आरोपानंतर बॉलीवूडमधील मी टू प्रकरण पुन्हा समोर येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

जियाची बहिण करिश्मानं सांगितले होते, जियालाही साजिदनं खूप त्रास दिला होता. सध्या लंडनमध्ये जिया वरील माहितीपट प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यातून जियाच्या आत्महत्या प्रकरणाचा वेध घेण्यात आला आहे. जियाचा शाररिक व मानसिक छळ करण्याचा आरोप साजिदवर केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress Sherlyn chopra accuses filmmaker Sajid khan of me too allegations