अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा पोलिसांमधल्या माणुसकीला सलाम

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या फोटोशूटविषयी सांगते, “ जेव्हा आपण लॉकडाऊनच्या काळात स्वत:च्या सुरक्षेसाठी घरात होतो. तेव्हा आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि इतर सुरक्षा कर्मचारी मात्र उन्हा-तान्हात, पावसा-पाण्यात आपला जीव धोक्यात घालून ‘ऑनड्युटी’ दक्ष होते.

मुंबई - अभिनेत्री तेजस्विनी पंडित यंदा आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना मानवंदना देत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिने डॉक्टरांमधल्या ‘दैवी’ भावनेला आदरांजली दिल्यावर नवरात्रीच्या दूस-या दिवशी पोलिसांनी कोरोना काळात केलेल्या अभूतपूर्व योगदानाला आदरांजली दिली आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या फोटोशूटविषयी सांगते, “ जेव्हा आपण लॉकडाऊनच्या काळात स्वत:च्या सुरक्षेसाठी घरात होतो. तेव्हा आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि इतर सुरक्षा कर्मचारी मात्र उन्हा-तान्हात, पावसा-पाण्यात आपला जीव धोक्यात घालून ‘ऑनड्युटी’ दक्ष होते. काही लोकांनी ह्याकाळात पोलिसांवरच टीका केली. मात्र पोलिसांनी आपल्या माणूसकीचे किंबहूना काही ठिकाणी तर ‘दैवी’ वृत्तीचे दर्शन दाखवले. कोणी ज्येष्ठ नागरीकांना मदतीचा हात दिला, तर कोणी रूग्णांच्या मदतीला धावून गेले.”

तेजस्विनी पंडित म्हणते, “ आपण देवीची अनेक रूपं मानतो. चंडिका, भवानी, अंबाबाई.. देवीने अनेक रूपात येऊन ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’  केलेले आहे. ह्याच वाटेवर चालणा-या पोलिसांना माझी ही मानवंदना आहे.”आबालृवृध्दांना मदत करताना अनेक पोलिस कर्मचारी दिवसभर तहानभूक विसरून राबत होते. अनेकांना तर कर्तव्यापोटी तीन-चार महिने आपल्या घरातल्यांपासूनही दूर रहावे लागले.

दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट करत आहे. 2017 पासून तेजस्विनी पंडितने सिनेसृष्टीत एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. तेजस्विनी पंडितच्या ह्या फोटोशूट मागे  चित्रकार उदय मोहिते, फोटोग्राफर विवियन पुलन, लेखक आरजे आदिश आणि दिग्दर्शक धैर्यशील यांनीही परिश्रम घेतले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Tejaswini Pandit salutes the humanity in the police