'झोंबिवली'- एक धाडसी प्रयत्न

काही काही चित्रपट असे असतात की, त्यांच्या नावावरून उत्सुकता वाढते. त्यातच त्या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर ती उत्सुकता कमालीची ताणली जाते.
Zombivli Movie
Zombivli Movie

काही काही चित्रपट असे असतात की, त्यांच्या नावावरून उत्सुकता वाढते. त्यातच त्या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर ती उत्सुकता कमालीची ताणली जाते. ‘झोंबिवली‘ या मराठी चित्रपटाबद्दल असेच काहीसे म्हणता येईल. कारण हॉलिवूडमध्ये काही झोंबीपट आलेले आहेत. हिंदीमध्ये गो गोवा गॉनसारखे अपवादात्मक चित्रपट आलेले आहेत; परंतु मराठीमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने ते धाडस दाखविले आहे. त्याच्या या धाडसाला नक्कीच दाद द्यावी लागेल.

या चित्रपटाची कथा डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक नगरीत फिरणारी आहे. डोंबिवली शहरात पुण्यातील मध्यमवर्गीय तरुण सुधीर जोशी (अमेय वाघ) आपली पत्नी सीमासह (वैदेही परशुरामी) राहायला येतो. सुधीर एका कंपनीमध्ये काम करीत असतो. तो ज्या इमारतीत राहत असतो त्याच इमारतीच्या बाजूला जनता नगर नावाची गरीब वस्ती असते. या जनता नगरमधे विश्वास (ललित प्रभाकर) नावाचा तरुण राहात असतो. तो आपल्या वस्तीतील लोकांच्या न्याय-हक्कांसाठी लढत असतो. ही वस्ती आणि ही उच्चभ्रूंची इमारत यांच्यामध्ये पाणीप्रश्न मोठा असतो. त्यामुळे जनता नगरमधील वस्ती आणि मिनरल वॉटरचा प्लांट चालविणारा व्यावसायिक अप्पा मुसळे (विजय निकम) यांच्यामध्ये कमालीचे वैर असते. विश्वास आणि मुसळे यांच्यामध्ये हाडवैर असते. कारण विश्वासच्या वडिलांना फसवून मिनरल वॉटरची जमीन अप्पा मुसळेने घेतलेली असते. याच अप्पा मुसळेच्या कारखान्यात सुधीर काम करीत असतो. सुधीर डोंबिवली या शहरात नव्यानेच राहायला आलेला असतो. त्याची पत्नी सीमा गरोदर असते. सुधीर ज्या कंपनीत काम करीत असतो त्याचा मालक असतो अप्पा मुसळे (विजय निकम). या फिल्टर प्लांटच्या मालकाबद्दल विश्वासच्या मनात तीव्र संताप असतो. त्यामुळे विश्वास त्याच्या विरोधात लढा पुकारतो.

दरम्यानच्या काळात याच डोंबिवली शहरात एक प्रकारचा विशिष्ट असा आजार पसरतो. सुरुवातीला त्याबाबत कोणालाच काही निदान करता येत नाही. त्यानंतर येथे झोंबी शिरलेत असे बोलले जाते आणि त्यानंतर एकच गोंधळ आणि गडबड निर्माण होते. त्यानंतर या झोंबीचा सामना ही मंडळी कसा काय करतात, झोंबीचे काय होते आणि ते कसे निर्माण होतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात दडलेली आहेत. हा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे आणि दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने या हॉरर चित्रपटाला कॉमेडीचा टच उत्तम दिला आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या महेश अय्यर या तमीळ तरुणाने ही कथा लिहिली आहे आणि ती विकसित केली आहे साईनाथ गनुवाड, सिद्धेश पुरकर व योगेश जोशी यांनी. अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्यासह अन्य कलाकारांची कामगिरी उत्तम झाली आहे. अमेयने काहीसा गोंधळलेला, घाबरट व साधा-भोळा असा सुधीर छान साकारला आहे. मध्यमवर्गीय सुधीरच्या डोळ्यांतील भाव त्याने उत्तम टिपलेले आहेत. ललित प्रभाकरने रावडी लूकमधील विश्वास तेवढ्याच ताकदीने रंगविला आहे. त्याचा लूक आणि त्याचे संवाद पाहता ललितने छान रंग या भूमिकेत भरलेले आहेत. वैदेहीने साकारलेल्या सीमाच्या भूमिकेतून दिग्दर्शकाने स्त्री शक्ती दर्शविण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. या तिन्ही कलाकारांनी संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर घेतलेला असला तरी तृप्ती खामकरने आपल्या छोट्याशा भूमिकेत उत्तम छाप पाडली आहे.

Zombivli Movie
Zombiewali Movie l मराठीतला पहिलाच 'झोम्बीपट' प्रेक्षकांना भावणार? |पाहा व्हिडीओ

चित्रपटातील कलाकारांचा लूक आणि मेकअपवर खूप मेहनत घेण्यात आली आहे. तसेच व्हीएफएक्सचा वापर चांगल्या प्रकारे करण्यात आला आहे. दिग्दर्शकाने ही कथा मांडताना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर हॉरर चित्रपटात पार्श्वसंगीत खूप महत्त्वाचे असते. या चित्रपटातील ती एक जमेची बाजू आहे. संकलक जयंत जठार यांचे एडिटिंग उत्तम झाले आहे. विंचू चावला, अंगात आलया वगैरे गाणी छान टिपण्यात आली आहेत. मात्र काही उणिवा या चित्रपटात नक्कीच आहेत. विशेष म्हणजे डोंबिवलीसारख्या शहरात विशिष्ट असा आजार पसरल्याची बातमी सगळीकडे पसरते खरी. याच शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शहरातील परिस्थिती, तेथील सरकारी आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा यावर देखील जाता जाता भाष्य करणे अपेक्षित होते. ते झालेले दिसत नाही. पाणी प्रश्न, बिल्डरांचे आक्रमण आणि रहिवाशांची होणारी फसवणूक वगैरे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट रोमांचक झाला आहे, त्याचबरोबर मनोरंजन करणाराही आहे. एक धाडसी प्रयत्न दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि त्याच्या टीमने केला आहे.

Zombivli Movie
RRR Movie: प्रदर्शनापूर्वीच सापडला कायद्याच्या कचाट्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com