कोरोनानंतर मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणावर बदल होतील;दिग्दर्शकांनी व्यक्त केल्या भावना

रफिक पठाण
Tuesday, 19 May 2020

सध्या चित्रपटगृह आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये चित्रपटांचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म (ओटीटी)वर चित्रपट प्रसिद्ध करण्याच्या निर्णयावरून वाद सुरु आहेत. त्यासंबंधी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव आणि महेश लिमये यांनी सकाळच्या #सकाळ_माझं_मत या विशेष कार्यक्रमात त्यांचे मत मांडले आहे.

पुणे: सध्या संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा खूप मोठ्या प्रमाणात चित्रपटसृष्टीला देखील फटका बसलेला आहे. लॉकडाऊनमध्ये देशातील सर्वच चित्रपटगृहे बंद असल्यामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात आले आहे. सध्या भारतात ऑनलाईन म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्याचा प्रेक्षकांचा कल वाढला असून अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपट निर्मात्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मागणी मांडत आहेत. या मागणीचा तीव्र विरोध आयनॉक्स, पीव्हीआर यासारख्या भारतातील सर्वात मोठी चित्रपटगृहांची साखळी असलेल्या चित्रपटगृहांनी विरोध केला आहे. सध्या चित्रपट निर्माते सुद्धा द्विधा मनस्थितीत असून काही चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यास समंती दिली असून काहींनी याला विरोध दर्शविला आहे. 

सकाळ माझं मत या विशेष कार्यक्रमात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाबाबत नुकतेच चर्चासत्र घेण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव आणि महेश लिमये यांनी आपले मत व्यक्त केले आहे. या कार्यक्रमात त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर त्यांनी मत व्यक्त केले आहे. 

अमिताभ-आयुष्मान स्टारर गुलाबो सिताबोचा मजेशीर टीझर रिलीज

लॉकडाऊन काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाकडे कसे पाहता?

या प्रश्नावर आपले मत व्यक्त करताना महेश लिमये आणि संजय जाधव या दोघांनीही लॉकडाऊन काळ असेपर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यास काहीच हरकत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. चित्रपट प्रदर्शित करत असताना त्यामागे खूप मोठे आर्थिक गणित असते. निर्मात्यांना त्यांची गुंतवणुकीतून लवकर परतावे हवे असतात त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर ज्यांचे चित्रपट प्रदर्शनास सज्ज आहेत त्यांनी प्रदर्शित करण्यास काहीच अडचण नसल्याचे मत महेश लिमये यांनी व्यक्त केले. लॉकडाऊन नंतर प्रत्येक चित्रपट निर्माता आपला चित्रपट हा चित्रपटगृहातच प्रदर्शित करण्यास इच्छुक असेल असे सुद्धा मत महेश लिमये यांनी व्यक्त केले आहे. ज्या निर्मात्यांना शक्य असेल त्यांनी आता चित्रपट प्रदर्शित न करता लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करावा असे मत संजय जाधव यांनी व्यक्त केले आहे. 

जगभरात गाजणारा हा कॅरी मिनाटी नेमका आहे तरी कोण?

लॉकडाऊन नंतर मराठी चित्रपटसृष्टीत होणाऱ्या बदलामुळे काय परिणाम होतील?

लॉकडाऊननंतर शासनाकडून चित्रपट निर्मात्याना अनेक सूचनांचे पालन करण्याची सक्ती करण्यात येऊ शकते. त्याचा थेट परिणाम हा चित्रपटाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो असे मत संजय जाधव यांनी व्यक्त केले आहे. शासनाकडून जर नवीन नियमावली आली तर सेटवर कमीतकमी व्यक्तींच्या उपस्थितीत संपूर्ण चित्रीकरण करावे लागू शकते किंवा शिफ्टनुसार वेगवेगळ्या विभागातील कामगारांना काम करावे लागू शकते असे मत महेश लिमये यांनी व्यक्त केले आहे. 

ओटीटी प्लॅटफॉर्मवर असलेल्या चित्रपट, वेबसिरीज याबद्दल तुम्हाला काय वाटते ?
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या अनेक चित्रपटात तसेच वेबसिरीजमध्ये अनावश्यकरीत्या हिंसक तसेच उत्तेजनात्मक चित्रीकरण करत असल्याची खंत महेश लिमये यांनी व्यक्त केली आहे. तसेच चित्रपट, जाहिराती यापेक्षा वेबसिरीजमध्ये व्यक्त होण्यासाठी जास्त वेळ मिळत असल्यामुळे अश्या एखाद्या चांगल्या वेबसिरीजसाठी काम करण्याची इच्छा महेश लिमये यांनी व्यक्त केले आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असलेले चित्रपट,वेबसिरीज यांमुळे सध्या मनोरंजन होत असून जगभरातील चित्रपट पाहण्यासाठी उत्तम साधन यामुळे मिळाले असल्याचे मत संजय जाधव यांनी व्यक्त केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After lockdown, government may force filmmaker to follow few instructions