
AIFF 2024: सिनेरसिक ज्या चित्रपट महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत असा अजिंठा - वेरुळ फिल्म फेस्टिव्हलची (AIFF) सर्वांना उत्सुकता आहे. AIFF चा उद्घाटन सोहळा ३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकारचे प्रधान सचिव अपुर्व चंद्रा (आय.ए.एस.), प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. या महोत्सवात असणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे...
AIFF महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध भरगच्च कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार, दि. ४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता आयनॉक्स येथे पा, चिनी कम, घुमर, शामीताभ, पॅडमॅन या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे ‘दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या मास्टर क्लासचे’ आयोजन करण्यात आलेले आहे.
गुरूवार, दि. ४ जानेवारी २०२४ रोजी सायं ६ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक ‘पद्मश्री जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत’ आयोजित करण्यात आलेली आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्यासोबत संवाद साधतील.
शुक्रवार, दि. ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे आर्टिकल १५, थप्पड, रा-वन, मुल्क या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे ‘दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या मास्टर क्लासचे’ आयोजन करण्यात आलेले आहे.
शनिवार, दि. ६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.३० वा. केंद्र शासन-पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदुम यांच्या 'गांधी आणि सिनेमा' या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शनिवार, दि. ६ जानेवारी २०२४ रोजी सायं. ६.३० वा. ‘मीट द डिरेक्टर्स’ या सत्रात भारतीय सिनेमा गटातील सर्व दिग्दर्शकांसमवेत विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी चित्रपट रसिकांना या सिनेमांच्या दिग्दर्शकांसमवेत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधता येईल.
रविवार, दि. ७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वा. ज्येष्ठ अभिनेते व ‘दिग्दर्शक ध्रृतीमान चॅटर्जी यांच्या मृणाल सेन समजून घेताना या विशेष संवादाचे आयोजन’ करण्यात आले आहे. महान चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांमधून श्री.चॅटर्जी यांनी प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.
स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.