"अजय-काजोलने सर्वांपासून लपवलं"; महिमा चौधरीने सांगितल्या भीषण अपघाताच्या आठवणी

Mahima Chaudhry
Mahima Chaudhry

'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री महिमा चौधरी हिने एक काळ गाजवला. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र करिअरच्या यशस्वी शिखरावर असताना महिमाचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघाताचा परिणाम महिमाच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमाने त्या भयानक अपघाताच्या आठवणी सांगितल्या. त्या कठीण काळात अजय देवगण आणि काजोलने फार मदत केल्याचंही तिने सांगितलं. अजय देवगण निर्मित 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी बेंगळुरूमध्ये महिमाचा अपघाता झाला होता. शूटिंगला जात असताना एका दूधाच्या ट्रकने महिमाच्या कारला जोरात धडक दिली होती. त्या अपघातात महिमाच्या चेहऱ्याला काचांच्या तुकड्यांमुळे जबर दुखापत झाली होती. 

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत महिमा म्हणाली, "गाडीची काच माझ्या चेहऱ्याला बंदुकीच्या गोळीप्रमाणे लागली होती. जेव्हा माझा अपघात झाला होता, तेव्हा माझ्या शूटिंगच्या सेटवर कोणालाच जायची परवागनी नव्हती. तेव्हा काही माध्यमांनी लिहिलं, महिमाचा अपघात झाला आणि तिच्या चेहऱ्यावर दुखापतीमुळे खूप डाग झाले आहेत. आता आपण तिला 'स्कारफेस' बोलू शकतो. त्या घटनेचा त्रास मला अजूनही होतो. त्या कठीण काळात अजय-काजोलने माझी खूप मदत केली होती."

"अजय आणि काजोल, हे त्यावेळी माझ्या चित्रपटाचे निर्माते होते. माझ्या अपघाताबद्दल इंडस्ट्रीत कोणाला कानोकान खबर लागू नये याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती. कारण त्यावेळी त्या बातमीमुळे माझं पूर्ण करिअर उध्वस्त झालं असतं. मला सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठीही त्यांनी प्रयत्न केले", असं ती पुढे म्हणाली.  

महिमाने १९९७ मध्ये 'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. त्यानंतर 'दिल क्या करे' हा तिचा दुसरा चित्रपट होता. या अपघातातून महिमा जेव्हा बरी झाली, तेव्हा अक्षय कुमारने तिला 'धडकन' या चित्रपटाची ऑफर दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com