esakal | कलापूरनंच पेरलं संगीतकार होण्याचं स्वप्न
sakal

बोलून बातमी शोधा

कलापूरनंच पेरलं संगीतकार होण्याचं स्वप्न

कलापूरनंच संगीतकार होण्याचं स्वप्न मनात पेरलं आणि ते पूर्ण करण्याचं पाठबळही दिलं... युवा वादक अक्षय गुरव संवाद साधत असतो. केवळ अभिनयच नव्हे तर संगीतातही कलापूरची नवी पिढी आता जोमानं कार्यरत झाली असून अक्षय याच तरुणाईचा प्रतिनिधी.

कलापूरनंच पेरलं संगीतकार होण्याचं स्वप्न

sakal_logo
By
अनिल एच. मोरे

मी मूळचा हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे गावचा. कलानगरीत आजवर अनेक दिग्गज कलाकार झाले. हीच परंपरा आमच्या घरातही. संगीताचा वारसा घरातच लाभल्याने आपसूकच या क्षेत्राकडे वळलो. चौथीत असल्यापासूनच तबला शिकायला लागलो आणि आता तर म्युझिक इंडस्ट्रीत अनेक नामवंत कलाकारांबरोबर काम करतो आहे. कलापूरनंच संगीतकार होण्याचं स्वप्न मनात पेरलं आणि ते पूर्ण करण्याचं पाठबळही दिलं... युवा वादक अक्षय गुरव संवाद साधत असतो. केवळ अभिनयच नव्हे तर संगीतातही कलापूरची नवी पिढी आता जोमानं कार्यरत झाली असून अक्षय याच तरुणाईचा प्रतिनिधी.

अक्षयचं महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेजमध्ये झालं. दरम्यानच्या काळात धनाजी पाटील यांच्याकडे तबल्याचं तर विक्रम पाटील यांच्याकडं की-बोर्डचं शिक्षण त्यानं घेतलं. आकाशवाणी, दूरदर्शनवरील कार्यक्रमाबरोबरच राज्यस्तरीय संगीत स्पर्धाही त्यानं गाजवल्या. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यानं थेट चेन्नईतील प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानच्या ‘म्युझिक कॉन्झवेटरी’मध्ये प्रवेश घेतला आणि तो पियानिस्ट झाला. बेसिक, रशियन आणि इंडियन पियानोचं शिक्षण त्यानं येथे पूर्ण केलं. आजवर त्यानं दोन लघुपट, एका हिंदी व एका मराठी चित्रपटाबरोबरच भोपाळ, मुंबई आणि केरळ येथील विविध दूरचित्रवाणी वाहिन्यावरील कार्यक्रमांसाठी संगीत दिलं आहे.

सध्या तो एका हिंदी चित्रपटाबरोबर, विविध मालिकांना पार्श्वसंगीत देतो आहे. ए. आर. रेहमान यांच्याबरोबरच शिवमणी, रणजित बारोट, जोनिता गांधी, जावेद अली यांच्याबरोबर तो काम करत असून संगीत दिग्दर्शनातच तो आता रमला आहे. प्राथमिक शिक्षक असणारे त्याचे वडील तबला, हार्मोनियम वादक असून त्यांनीही अक्षयला खमकं पाठबळ दिलं. करिअरच्या मळलेल्या वाटेवरून न जाता अक्षयने संगीतक्षेत्रातच करिअरचा निर्णय घेतला आणि वडिलांसह साऱ्या कुटुंब त्याच्या पाठीशी राहिलं. म्हणूनच तो यशाचा एकेक टप्पा पार करतो आहे.

प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी ‘डॅडीज डॉटर’ या हिंदी चित्रपटासाठी गायलेलं ‘परी’ हे गाणं असो किंवा आदर्श शिंदे यांच्या आवाजातील मराठी चित्रपटांसाठीची गाणी; त्यांना अक्षयनेच संगीत दिलं आहे. तो सांगतो, ‘‘संगीत क्षेत्रात आत्ता कुठे करिअरचा पहिला टप्पा आहे. अजून बरेच काही करायचे आहे. कलापूरचं पाठबळ आणि प्रेरणा पाठीशी असल्यानं नक्कीच या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करेन.’’

loading image