अभिनेता अक्षय कुमारने मागितली पत्नी ट्विंकलची माफी, म्हणाला 'माझ्या पोटावर लाथ मारु नकोस'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

'पॅडमॅन' या सिनेमाने दोन वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने अक्षय कुमारने ट्वीट केलं आहे.

मुंबई- अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ही जोडी बॉलीवूडच्या काही खास जोड्यांपैकी एक आहे. अक्षयचा मजेशीर स्वभाव तर सगळ्यांनाच माहित आहे. त्याने ट्विंकलच्या आईसोबतही अनेकदा प्रँक केले आहेत. ट्विंकल आणि अक्षय एकमेकांसोबत मजा मस्करी करताना अनेकदा पाहायला मिळतात. २०१८ मध्ये अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' हा सिनेमा रिलीज झाला होता आणि त्याच्या या सिनेमाचं कौतुकंही झालं होतं. हा सिनेमा ख-या घटनेवर आधारित आहे. अरुणाचलम मरुगननाथम या व्यक्तीने सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त मशीन तयार केली होती आणि महिलांना याचा वापर करण्यासाठी जागरुक केलं होतं. या विषयावर हा सिनेमा आहे. नुकतंच 'पॅडमॅन' या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाली. 

हे ही वाचा: दीपिका पदूकोणच्या मोबाईलमध्ये 'या' नावाने सेव्ह आहे रणवीरचा नंबर

'पॅडमॅन' या सिनेमाने दोन वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने अक्षय कुमारने ट्वीट केलं आहे. त्याने लिहिलंय, 'पॅडमॅन या सिनेमाला २ वर्ष पूर्ण झाली. मला आनंद आहे की आम्ही एक असा मुद्दा सांगण्यात यशस्वी झालो ज्यावर लोक बोलायला घाबरायचे. मला आशा आहे की आपण देशातील गरिबी नष्ट करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू आणि मासिक पाळी वर्ज्यचा मुद्दा खोडून काढू शकू.'

अक्षयने या ट्वीटमध्ये सिनेमातील अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटेला टॅग केलंय.

अक्षयच्या या पोस्टवर ट्विंकल खन्नाने उत्तर देत लिहिलंय, 'अक्षय कुमार आता तु नक्कीच माझ्या आगामी प्रोडक्शनचा भाग नसशील.'

यानंतर लगेचच अक्षयने ट्विंकलची माफी मागितली आणि लिहिलं, 'कृपया माझ्या पोटावर लाथ मारु नको. टीमला टॅग करायला विसरलो. मी माझ्या निर्मात्यांची माफी मागतो. सिनेमाचे दिग्दर्शक आर.बल्की ज्यांच्यामुळे हा सिनेमा शक्य नव्हता.' खरंतर ट्विंकल खन्ना पॅडमॅन या सिनेमाची निर्माती होती. 

अक्षय कुमार नुकताच गरजु महिलांना सॅनिटर पॅड देण्याच्या मोहिमेत जोडला गेला आहे. या मोहिमेत त्याने लोकांना देखील पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन केलं आहे.  

 akshay kumar sorry to his wife twinkle khanna  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar sorry to his wife twinkle khanna