'लक्ष्मी बाँब' फुटणार डिजिटलवर !

रमेश डोईफोडे  
Tuesday, 29 September 2020

अक्षयकुमारचा `लक्ष्मी बाँब` हा बहुचर्चित चित्रपट 'बिग बजेट' असूनही थिएटरऐवजी नोव्हेंबरमध्ये "डिस्ने-हॉटस्टार'वर प्रदर्शित होत आहे. या ट्रेंडविषयी...

मुंबई- "कोरोना'च्या प्रादूर्भावामुळे सध्या देशातील सगळीच चित्रपटगृहे कुलुपबंद आहेत. त्यामुळे अनेक नवीन चित्रपट पूर्ण झाले असूनही, ते सध्या प्रेक्षकांपुढे येऊ शकलेले नाहीत. या संकटातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अक्षयकुमारचा `लक्ष्मी बाँब` हा बहुचर्चित चित्रपट 'बिग बजेट' असूनही थिएटरऐवजी नोव्हेंबरमध्ये "डिस्ने-हॉटस्टार'वर प्रदर्शित होत आहे. या ट्रेंडविषयी...

हे ही वाचा: उषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

जगभरातील सर्वच उद्योग-व्यवसायांचे गणित गेल्या पाच-सहा महिन्यांत कोलमडले आहे. चित्रपट उद्योगही त्याला अपवाद नाही. हिंदीत वेगवेगळ्या बॅनरकडून बिग बजेट चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. मोठ्या स्टार मंडळींच्या तारखा मिळवून चित्रपट वेळेत पूर्ण करणे, त्याचे देशात-परदेशांत वितरण करणे, हे मोठे आव्हानात्मक काम असते. आज कित्येक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. मात्र, देशातील सर्व चित्रपटगृहे अजूनही बंद असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नफ्याचे गणित विस्कळीत

चित्रपटगृहांतील तिकीट खिडकीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म, संगीताचे हक्क हे निर्मात्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत असतात. त्यात चित्रपटगृहांत प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद अर्थातच सर्वाधिक मोलाचा असतो. सलमान, अक्षयकुमार, आमिर, शाहरुख यांसारख्या सुपरस्टारचे चित्रपट पहिल्या आठवड्यातच एवढी कमाई करतात, की केवळ निर्मिती खर्चच नव्हे, तर मोठा नफाही निर्मात्याच्या खिशात पडतो. तथापि, उत्पन्नाचा हा मार्ग तूर्त बंद राहिल्याने सगळेच हिशोब विस्कळीत झाले आहेत.

डिजिटलचा पर्याय

चित्रपटासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक झालेली असते. ती वेळेत मोकळी झाली नाही तर त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड वाढत जातो. त्यामुळे ज्यांचे चित्रपट पूर्ण झाले आहेत वा केवळ पोस्ट प्रॉडक्शनचे किरकोळ काम बाकी राहिले आहे असे निर्माते काळजीत पडले आहेत. कोरोनामुळे उद्‌भवलेले संकट निवळण्याची वाट पाहणे किंवा चित्रपटगृहांचा पर्याय पूर्णपणे बाजूला ठेवून डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते प्रदर्शित करणे असे दोन मुख्य मार्ग त्यांच्यापुढे उपलब्ध आहेत. काही निर्मात्यांनी संभाव्य नफ्यात तडजोड करून डिजिटलची निवड केली आहे. त्यात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती अक्षयकुमारच्या 'लक्ष्मी बॉंब'ची.

तमीळ चित्रपटाचा रिमेक

यापूर्वी कधीही साकारली नाही, अशी वेगळी भूमिका अक्षयकुमारने या चित्रपटात केली आहे. 'हॉरर-कॉमेडी' या प्रकारातील 'लक्ष्मी बॉंब' हा 'मूनी 2: कंचना' या तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे. त्याचे मूळ दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनीच हिंदी आवृत्तीचीही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये चित्रीकरण पूर्ण केले होते. पोस्ट प्रॉडक्शनचे काम फेब्रुवारीपर्यंत चालले आणि नंतर प्रदर्शनाचे नियोजन सुरू असतानाच लॉकडाउन चालू झाला. त्यामुळे ही सर्वच प्रक्रिया पुढे ठप्प झाली. कोरोनाचे संकट लवकरच आटोक्याात येईल असा विचार करून प्रेक्षकांपुढे येण्याचे दोन-तीन मुहूर्तही जाहीर झाले. परंतु त्यानुसार कार्यवाही करता आली नाही. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून 'लक्ष्मी बॉंब'चा धमाका डिजिटलवरच उडवण्याचा निर्णय झाला.

सध्या पर्याय एकच

'गुलाबो सिताबो', 'सडक 2', 'बिग बुल', 'दिल बेचारा', 'लुटकेस', 'खुदा हाफिज', 'भुज - द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटगृह न मिळाल्यामुळे या चित्रपटांच्या निर्मात्यांनाही डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्याचा पर्याय निवडावा लागला आहे. त्यांपैकी काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, तर उर्वरित येण्याच्या मार्गावर आहेत. अमिताभ बच्चन, अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सुशांतसिंह, कुणाल खेमू, कियारा अडवानी, तुषार कपूर या नव्या-जुन्या कलाकारांची मांदियाळी या चित्रपटांत आहे.

बड्या चित्रपटांची पंचाईत

सगळ्याच निर्मात्यांना चित्रपटगृहांपर्यंत आपली कलाकृती न्यायची आहे. पण सध्याच्या असाधारण परिस्थितीत ते शक्य् न झाल्यास, ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेणे स्मॉल बजेट चित्रपटांना आर्थिकदृष्ट्या फार हानिकारक ठरत नाही; पण बिग बजेट प्रोजेक्टची गोष्ट वेगळी असते. त्यांना पहिल्याच आठवड्यात शंभर कोटी रुपयांच्यावर कमाई अपेक्षित असते. तरच त्यांचे जमा-खर्चाचे गणित जमते. यात अर्थातच तिकीट खिडकीवरील गल्ल्याचा वाटा मोठा असतो. ते वगळून केवळ डिजिटल माध्यमावर अवलंबून राहणे त्यांच्यासाठी आतबट्ट्याचे ठरते. त्यामुळेच रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' अद्याप प्रेक्षकांपुढे येऊ शकलेला नाही. त्यातही अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत आहे. हा बिग बजेट चित्रपट आहे. त्याच्या निर्मितीत करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन हे बडे बॅनरही सहभागी आहे. यावरून 'सूर्यवंशी'मध्ये किती मोठी गुंतवणूक झाली असेल याचा अंदाज यावा. मात्र उशीर झाला तरी चालेल पण शक्यतो चित्रपटगृहातच आधी चित्रपट प्रदर्शित करायचा असा निर्धार रोहित शेट्टीने केलेला दिसतो आहे.

सव्वाशे कोटींचा सौदा !

या पार्श्वभूमीवर 'लक्ष्मी बॉंब' हा पहिलाच बिग बजेट चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी निर्मात्यांना सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा घसघशीत मोबदला मिळाला असल्याचे सांगितले जाते. अर्थात हा चित्रपट थिएटरमध्ये आला असता तर यापेक्षा जास्त गल्ला आठवडाभरात गोळा झाला असता त्यामुळे हा सौदा फार मोठ्या फायद्याचा आहे असे म्हणता येत नाही अशीही टिप्पणी चित्रपट वर्तुळात ऐकायला येत आहे. पण हा चित्रपट व्यवसायाच्या नवीन मॉडेलचा अंगीकार कसा करावा? या दृष्टीने दिशादर्शक ठरू शकेल अशी स्थिती आहे. सध्याची अस्थिरता आणि अनिश्चितता आणखी किती काळ राहील याची खात्री नाही. त्यामुळे कोट्यवधींची गुंतवणूक झालेल्या प्रोजेक्टचा खर्च अकारण वाढत जाणार आहे. तो टाळण्यासाठी मोठ्या लाभाची अपेक्षा न ठेवता, गुंतवणूक मोकळी करून माफक नफ्यात समाधान मानायचे असा निर्णय कदाचित यापुढे घ्यावा लागणार आहे. त्याची सुरवात 'लक्ष्मी बॉंब'ने केली आहे.

संपादन: दिपाली राणे-म्हात्रे  

akshay kumars big budget film laxmmi bomb to release on ott 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumars big budget film laxmmi bomb to release on ott