ऑन स्क्रीन : कॅबिनेट ऑफ क्युरिऑसिटीज : डेल टोरोच्या कल्पनेतून उपजलेला भय-पसारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cabinet of curiosities movie

गिअर्मो डेल टोरो या मेक्सिकन लेखक-दिग्दर्शकाची दिग्दर्शकीय कारकीर्द पाहिल्यास त्याला भयाविष्कारामध्ये असलेला रस सहजरीत्या दिसून येऊ शकतो.

ऑन स्क्रीन : कॅबिनेट ऑफ क्युरिऑसिटीज : डेल टोरोच्या कल्पनेतून उपजलेला भय-पसारा

एखाद्या लोकप्रिय दिग्दर्शकाने अँथॉलॉजी मालिका निर्माण करून त्याद्वारे त्याला विशेष रस असलेल्या नानाविध संकल्पना समोर मांडण्याची संधी इतर लेखक-दिग्दर्शकांना देण्याचा प्रकार नवीन नाही. १९६०च्या दशकातील ‘आल्फ्रेड हिचकॉक प्रेझेंट्स’, मिक गॅरिसची ‘मास्टर्स ऑफ हॉरर’ (२००५-०७) किंवा काही काळापूर्वी जॉर्डन पीलने प्रस्तुत केलेले ‘द ट्वायलाईट झोन’चे (२०१९-२०) दोन सीजन अशी मालिकांची बरीच उदाहरणे देता येतील. आता गिअर्मो डेल टोरोने प्रस्तुत केलेल्या ‘कॅबिनेट ऑफ क्युरिऑसिटीज’चीही भर या यादीत पडलेली आहे.

गिअर्मो डेल टोरो या मेक्सिकन लेखक-दिग्दर्शकाची दिग्दर्शकीय कारकीर्द पाहिल्यास त्याला भयाविष्कारामध्ये असलेला रस सहजरीत्या दिसून येऊ शकतो. त्याचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘क्रोनोस’ (१९९३) हा भयपट आणि त्यानंतरच्या काळात त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘मिमिक’ (१९९७), ‘हेलबॉय’ चित्रपटद्वयी (२००४-०८), ‘पॅन्स लॅबिरीन्थ’ (२००६), इत्यादी कलाकृतींमध्येही नानाविध प्रकारची भयनिर्मिती दिसली होती. मात्र, डेल टोरोच्या चित्रपटांतील भय हे अचानक निर्माण होणारे नाही. त्याची भयनिर्मिती मानवी जीवन, संस्कृती आणि इतिहासाला विचारात घेते. त्याची मूळे मानवी स्वभाव, इतिहास आणि वर्ण-वंशद्वेषासारख्या सामाजिक-राजकीय मुद्द्यांमध्ये आढळतात. ज्याद्वारे डेल टोरो हा कृष्णवर्णीय, समलैंगिक, स्थलांतरित, इत्यादी पात्रांच्या निमित्ताने सामाजिक-राजकीय अर्थाने उपेक्षित, तिऱ्हाईत असलेल्या व्यक्तींच्या कथा सांगताना दिसतो.

‘कॅबिनेट ऑफ क्युरिऑसिटीज’ या मालिकेतील केवळ दोन एपिसोड्स डेल टोरोने लिहिले आहेत. तर, इतर एपिसोड्स डेव्हिड प्रायर, ॲना लिली ॲमिरपोर, पॅनोस कॉस्मॅटोस, जेनिफर केण्ट यांसारख्या कलाकारांनी लिहिले व दिग्दर्शित केले आहेत. डेल टोरोने लिहिलेल्या एपिसोड्समध्ये तर त्याची विशिष्ट अशी छाप दिसतेच, पण त्याने न लिहिलेल्या एपिसोड्सवरही त्याचा ठसा दिसून येतो. ज्यात मानवी संस्कृतीचा इतिहास आणि मिथकं, मानवी मेंदूची उपज असलेली दुःस्वप्नं, मानवी स्वभाव आणि शरीराशी निगडीत घटक आणि भय-संकल्पनांचा ऊहापोह केला जातो. शिवाय, डेल टोरोने न लिहिलेल्या ‘दि ऑटॉप्सी’ आणि ‘दि आऊटसाइड’मधील परकीय जीवांच्या डिझाइनमुळे त्याचे चित्रपट आठवतात.

मालिकेतील डेल टोरोने लिहिलेले दोन भाग सोडल्यास इतर भाग भयकथांकरित प्रसिद्ध असलेल्या लेखकांच्या साहित्यावर आधारलेले आहेत. ज्यात हेन्री कटनर आणि एच. पी. लव्हक्राफ्टपासून एमिली कॅरोल व मायकल शियापर्यंत निरनिराळ्या लेखकांचा समावेश होतो.

मालिकेतील दिग्दर्शकांपैकी जवळपास सर्वच दिग्दर्शक हे त्यांच्या नावीन्यपूर्ण भयपटांकरिता प्रसिद्ध आहेत. यातील प्रत्येक व्यक्ती ज्या पद्धतीने कथा मांडते, त्यात ज्या पद्धतीची दृश्यशैली दिसते याची काही वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, ॲमिरपोरच्या कथा या स्त्री पात्रे आणि त्यांच्या आयुष्यातील समस्यांशी निगडीत असण्याची शक्यता असते. ‘कॅबिनेट ऑफ क्युरिऑसिटीज’मध्ये तिने दिग्दर्शित केलेला ‘दि आऊटसाइड’ हा एपिसोड समाजाने स्त्रियांवर लादलेल्या सौंदर्याच्या संकल्पनांभोवती फिरतो. तिथली भयनिर्मिती सामाजिक व मानसशास्त्रीय अर्थाची आहे.

मालिकेच्या निर्माणकर्त्या डेल टोरोने वेगवेगळ्या प्रकारच्या भयाविष्कारात रस असलेल्या लोकांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. ज्यामुळे सामाजिक-राजकीय कंगोरे असलेल्या भयकथा, परग्रहवासीयांच्या पृथ्वीवरील आगमनाविषयक भयकथा, बॉडी हॉरर प्रकाराकडे झुकणारी भयकथा असे निरनिराळे प्रकार मालिकेमध्ये पाहायला मिळतात. भयपटांकरिता प्रसिद्ध असलेल्या समकालीन दिग्दर्शकांच्या कलाकृती, त्यांची शैली आणि संकल्पना यांची एक उत्तम शोकेस (पन इन्टेन्डेड) ‘कॅबिनेट ऑफ क्युरिऑसिटीज’च्या निमित्ताने तयार झालेली आहे. डेल टोरो तसेच भयपटाच्या चाहत्यांनी ती पाहणे गरजेचे आहे, हे वेगळे सांगणे न लगे!

टॅग्स :Entertainmentmovie