
‘लुमन इंडस्ट्रीज’ ही कंपनी एक प्रयोग राबवत आहे, ज्यात कर्मचाऱ्यांच्या आठवणींची विभागणी करत एकाच व्यक्तीमध्ये दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे निर्माण केली जातात - एक मूळ व्यक्ती आणि दुसरी ‘लुमन’मधील कर्मचारी.
‘वर्क-लाईफ बॅलन्स’ ही संज्ञा एव्हाना बहुतांशी लोकांच्या परिचयाची बनली आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची विभागणी करीत, त्याचा समतोल साधत स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार कसा करावा, याविषयीची ही संकल्पना. ‘सेव्हरन्स’ ही मालिका ज्या जगात घडते, त्यात मात्र एका कंपनीने यावर एक नावीन्यपूर्ण उपाय शोधून काढला आहे.
‘लुमन इंडस्ट्रीज’ ही कंपनी एक प्रयोग राबवत आहे, ज्यात कर्मचाऱ्यांच्या आठवणींची विभागणी करत एकाच व्यक्तीमध्ये दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे निर्माण केली जातात - एक मूळ व्यक्ती आणि दुसरी ‘लुमन’मधील कर्मचारी. हीच प्रक्रिया सेव्हरन्स म्हणून ओळखली जाते, ज्यात आठवणींचे काप केले जाऊन दोन व्यक्तिमत्त्वे तयार होतात. दोघांचा एकमेकांशी संबंध उरत नाही. कामाच्या जागी तयार होणाऱ्या आठवणी वेगळ्या, वैयक्तिक जीवन वेगळे आणि दोन्हीकडील ताणतणाव वेगवेगळे.
साहजिकच लुमनचा हा प्रयोग वादाचे कारण बनतो. अगदी ‘सेव्हरन्स’ म्हणजे भांडवलशाही जगाने कामगारांचे शोषण करण्यासाठी राबवलेली संकल्पना इथपर्यंत आरोप होतात. ‘सेव्हरन्स’ ही मालिका आपल्याला दिसायला सुरुवात होते ती लुमनमध्ये कर्मचारी असलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या दृष्टिकोनातून. असे केल्याने मानवाधिकार कायदा किंवा कर्मचाऱ्यांचे शोषण वगैरे मुद्द्यांपर्यंत पोचण्याच्या आधीपासूनच प्रेक्षक व्यावसायिक जीवनातील व्यक्तिमत्त्वांची बाजू समजून घेत असतात.
त्यामुळे ‘बाहेरुन आत’ पाहण्याऐवजी ‘आतून बाहेर’ पाहण्याचा मार्ग मालिकाकर्ते निवडतात. ज्यात व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याची विभागणी करताना मालिकेतील दृश्यरचना व रंगसंगती, वास्तुकला, पात्रांचे पोशाख, इत्यादी गोष्टी प्रकर्षाने बदलतात. ‘सेव्हरन्स’मधील कर्मचाऱ्यांचे जग हे एकसुरी पद्धतीचे आहे. पांढरा, राखाडी, काळा, निळा नि हिरवा अशा काही मर्यादित रंगांचे वर्चस्व असलेले वऱ्हांडे आणि कार्यालयीन जागा दृश्यस्तरावर फारच सुंदर, तरीही उबगवाण्या वाटतात, तर लुमनबाहेरचे जग तसे रंगीबेरंगी आणि अधिक मोकळे वाटणारे आहे.
सेव्हरन्स मजल्यावर काम करणाऱ्या मार्क (ॲडम स्कॉट), डिलन (झॅक चेरी) आणि अर्विंग (जॉन टर्टुरो) यांच्या विभागात हेली (ब्रिट लोअर) ही नवी सदस्या आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात उलथापालथ होऊ लागते. ज्यात कुतूहलापासून सुरु झालेल्या प्रकरणाला लवकरच क्रांतीचे स्वरूप प्राप्त होते. लुमनमधील कर्मचाऱ्यांचे गूढ आणि ऊबगवाणे, जवळपास नैराश्यपूर्ण आयुष्य, लुमन इंडस्ट्रीजकडून दिली जाणारी अमानवी वागणूक, कामाच्या जागी अडकलेल्या व्यक्तिमत्त्वांना कामाच्या जागेमधून बाहेर पडता न येणे यामुळे प्रेक्षकांचाही या लढ्यास मूक पाठिंबा असतो.
डॅन एरिक्मनने निर्माण केलेल्या व अभिनेता-दिग्दर्शक बेन स्टिलरने दिग्दर्शित केलेल्या ‘सेव्हरन्स’वर अनेकविध चित्रपटमालिकांचे, त्यांतील दृश्यशैलीचे प्रभाव आहेत. लेखक-दिग्दर्शक चार्ली कॉफमन, दिग्दर्शक स्टॅन्ली कुब्रिक, ‘द मॅट्रिक्स’ चित्रत्रयी, ‘ऑफिस स्पेस’ (१९९९) इत्यादी अनेक संदर्भ सापडतात. असे सारे प्रभाव असले तरी ‘सेव्हरन्स’च्या अभिनव कल्पकतेवर शंका घ्यायचे कारण नाही, हे मालिका पाहताना लक्षात येते.
‘सेव्हरन्स’मध्ये अनेक गंभीर मुद्दे असले, तरी मालिकेमध्ये प्रासंगिक विनोदाचाही समावेश आहे. मालिकेच्या केंद्रस्थानी असलेली संकल्पना ‘सायन्स-फिक्शन’ प्रकारची असली तरी त्यानंतर मात्र दूरवर डिस्टोपिया आणि मानवी भावभावनांचे विश्व पसरलेले दिसते. ज्यात अनेक नैतिक, सामाजिक, मानसशास्त्रीय संकल्पनांचा वेध घेतला जातो. त्यामुळेच भांडवलशाही जगतातील क्रूरपणाच्या पार्श्वभूमीवर ही मानवी क्रांती लक्ष वेधून घेणारी ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.