लाल सिंह चढ्ढा या चित्रपटाचे दिग्दर्शन आमीर खान करतोय?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

काही महिन्यांपूर्वीच लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटामधील त्याचे लूक सोशल मीडियावर व्हायरलही झाले. करिना कपूरही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. आमिर आणि त्याची पत्नी किरण राव मिळून या चित्रपटाची निर्मिती करताहेत. 

मुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला. तगडी स्टारकास्ट, अवाढव्य सेट असूनही कथेच्या बाबतीत फसलेला हा चित्रपट प्रेक्षकांनीही नाकारला. या चित्रपटानंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. काही महिन्यांपूर्वीच त्याने लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटामधील त्याचे लूक सोशल मीडियावर व्हायरलही झाले. करिना कपूरही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. आमिर आणि त्याची पत्नी किरण राव मिळून या चित्रपटाची निर्मिती करताहेत. 

लाॅकडाऊन होण्यापूर्वी आमीर खान या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. अजूनही बरेचसे चित्रीकरण या चित्रपटाचे बाकी आहे. सध्या चित्रीकरणच बंद असल्यामुळे सगळे काही ठप्प झाले आहे. आमीर खान लाल सिंह चढ्ढा या चित्रपटात काम करीत असला आणि निमिर्तीही तो करीत असला तरी दिग्दर्शनातही त्याला अधिक रस आहे. खरे तर या चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन आहे. त्याने यापूर्वी सिक्रेट सुपरस्टारसारखा यशस्वी चित्रपट दिला आहे. आमीर खानच्याच प्राॅडक्शन हाऊसमध्ये त्याने विविध विभागांमध्ये काम केले आहे. किरण राव आणि आमीर खाननेच त्याला या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली आहे. परंतु अंदर की बात अशी आहे की त्याच्याबरोबरच आमीर खानही दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहे. खरे तर आमीरने आपल्या चित्रपटातील दिग्दर्शकाला वारंवार सल्ले दिलेले आहेत. मुळात अभिनयाबरोबरच त्याला दिग्दर्शनाचीही आवड आहे.

त्यामुळे काही दिग्दर्शकांनी त्याचे सल्ले मानलेले आहेत. शेवटी चित्रपट चांगला बनावा याकरिता आमीर खान कसोशीने प्रयत्न करीत असतो. तसे ते सगळेच कलाकार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम करीत असते. परंतु आमीरचे काही दिग्दर्शकांबरोबर याबाबतीत खटकेही उडालेले आहेत. कारण प्रत्येक दिग्दर्शक आमीरचे ऐकतोच असे काही नाही. काही जण आमीरच्या सूचना रास्त मानतात तर काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. आता लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या बाबतीत आमीरने काही सल्ले दिग्दर्शक अद्वैत चंदनला दिले आहेत किंबहुना तोच दिग्दर्शन करीत आहे असे कळते. ते काहीही असो चित्रपट कसा आहे ते शेवटी महत्त्वाचे. याआधीही आमिरने त्याच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दिग्दर्शकांना दिग्दर्शनाबाबत सल्ले दिले होते. त्यामुळे त्याचे दिग्दर्शकांबरोबर खटकेही उडाले. आता  लाल सिंह चड्ढाच्या दिग्दर्शनातही तो सामिल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amir Khan will produce Lal Singh Chadhdha movie