कलापूरनंच दिलं ‘फिनिक्‍स’ भरारीचं बळ!

संभाजी गंडमाळे
शनिवार, 13 एप्रिल 2019

हौस म्हणून एकांकिका, नाटकांकडं वळलो आणि आयुष्याचा हाच टर्निंग पॉईंट ठरला. कलापूरच्या मातीनं फिनिक्‍स भरारीचं बळ दिलं. सिनेमा, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांतून आता याच माझ्या कलापूरचं नाव मोठं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे.

रंकाळा पदपथ उद्यानात वडिलांना हातभार म्हणून त्यांच्याबरोबर जम्पिंग बलून घेऊन जायचो. पोरांना जाम आनंद वाटायचा. त्यावेळी वाटायचं आनंद वाटणारं झाड व्हायला हवं आपण, मात्र करिअर कशात करायचं काहीच ठरलं नव्हतं. ‘आयटीआय’मध्ये ‘प्लंबिंग’चा ट्रेड केला. महापालिका पाणीपुरवठा विभागात मीटर रीडर म्हणूनही काम केलं. तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये डिप्लोमाही पूर्ण केला. त्याच दरम्यान हौस म्हणून एकांकिका, नाटकांकडं वळलो आणि आयुष्याचा हाच टर्निंग पॉईंट ठरला. कलापूरच्या मातीनं फिनिक्‍स भरारीचं बळ दिलं. सिनेमा, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांतून आता याच माझ्या कलापूरचं नाव मोठं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे...अभिनेता अमोल नाईक भरभरून बोलत असतो. अर्थात आता सर्वत्र त्याची ‘बरकत’ अशीच ओळख असली तरी त्याला त्याच्याही पुढे जाऊन आणखी नव्या भूमिका साकारायच्या आहेत.

अमोल कसबा बावड्याचा. सावरकरनगरात राहणारा. बलभीम विद्यालय, त्यानंतर मेन राजाराम हायस्कूल आणि गोखले कॉलेजलाही त्याचं शिक्षण झालं. फिनिक्‍स क्रिएशन्सचे संस्थापक अभिनेता संजय मोहिते यांनी त्याच्यातील टॅलेंट ओळखून त्याला एकांकिका, नाटकात संधी दिली.

संजय पवार लिखित ‘पांडुरंग’ ही त्याची पहिली एकांकिका. त्यानंतर प्रवीण तरडे लिखित ‘आर्टिफीसीअल इंटेलिजेंन्स’ ही एकांकिका त्याने केली आणि मग सुरू झाला, राज्य नाट्य स्पर्धेचा प्रवास. विजय तेंडुलकर लिखित ‘पाहिजे जातीचे’, अद्वैत दादरकर लिखित ‘मीटर डाउन’, विद्यासागर अध्यापक लिखित ‘नाव झालचं पाहिजे’ या नाटकांत विविध भूमिका साकारल्या. ‘खेळीमेळी’, ‘शांतता कोर्ट...’ या नाटकांच्या तांत्रिक बाजू सांभाळल्या. व्यावसायिक रंगभूमीवर ‘सोकाजीराव टांगमारे’, ‘अपना सपना फनी फनी’ ही नाटकं केली. याच अनुभवाच्या जोरावर ‘मनातल्या उन्हात’ सिनेमात त्याला भूमिका मिळाली. ‘साम’ वाहिनीवरील ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेबरोबरच आणखी दोन सिनेमेही केले.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील पुढची संधी एवढी भारी ठरली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याची ‘बरकत’ अशीच ओळख निर्माण झाली. या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून त्याला पुरस्कारही मिळाला. आगामी ‘कोल्हापूर डायरी’ आणि ‘मेड फॉर इच ऑदर’ या चित्रपटातूनही अमोल झळकणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amol Naik interview