esakal | अमोल पालेकरांची पंचवीस वर्षांनंतर रंगभूमीवर एन्ट्री

बोलून बातमी शोधा

amol-palekar}

‘कसूर’ या नाटकाचे लेखन त्यांच्या पत्नी संध्या गोखले-पालेकर यांनी केले आहे. नाटकाचे कथानक, त्याची मांडणी आणि त्यातील नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये याबद्दल त्या दोघांनीही ‘सकाळ’शी संवाद साधला.

अमोल पालेकरांची पंचवीस वर्षांनंतर रंगभूमीवर एन्ट्री
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - अमोल पालेकर म्हटले की जुन्या कौटुंबिक, खुमासदार विनोदी चित्रपटांचा नायक अशी प्रतिमा समोर येते; परंतु तब्बल पंचवीस वर्षांनंतर ते पुन्हा रंगभूमीवर येत आहेत. तेही एका पोलिस अधिकाऱ्याच्या गंभीर भूमिकेत. वयाच्या पंचाहत्तरीत ते ‘कसूर’ या हिंदी नाटकाद्वारे चाहत्यांसमोर आपल्या अभिनयाचे कौशल्य पुन्हा दाखविणार आहेत.

 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

‘कसूर’ या नाटकाचे लेखन त्यांच्या पत्नी संध्या गोखले-पालेकर यांनी केले आहे. नाटकाचे कथानक, त्याची मांडणी आणि त्यातील नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये याबद्दल त्या दोघांनीही ‘सकाळ’शी संवाद साधला. भाषेच्या पलीकडे जाणारे, अभिनय दृश्‍यात्मकता आणि विषयाच्या मांडणीतील वैविध्य यात असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटांमध्ये सध्या प्रेक्षकांवर प्रभाव पाडणारे विषय येत आहेत. मराठी असो वा हिंदी नाटकही मागे राहू नयेत. काळाशी भिडणारे, लोकांना रुचणारे आशय-विषय त्यात यायला हवे, अशी अपेक्षा गोखले यांनी व्यक्त केली.

नाटकांच्या कथानकाविषयी गोखले म्हणाल्या, ‘‘आपल्या भोवताली ज्या गोष्टी घडतात, त्याची अभिव्यक्ती कशी होईल हे सांगता येत नाही. मी एक डॅनिश चित्रपट पाहिला. त्याचा जणू काही समकालीन संबंध असल्याचे वाटले. त्यातून हे नाट्य फुलले. एक यशस्वी आयुष्य जगलेले निवृत्त पोलिस अधिकारी लोकांच्या सेवेसाठी काही काम करीत राहतो. त्यादरम्यान त्याला एक फोन येतो. त्यानंतर काही निर्णय घेत जातो आणि गुरफटतो. त्यातून कसूर हे गूढ नाट्य उभे राहाते.’’

प्रेक्षकाला दीर्घकाळ गुंतून ठेवेल, असे हे कथानक आहे. त्यामुळे साऊंड डिझायनिंगवर आम्ही भर दिला आहे. त्यावर राष्ट्रीय पारितोषिक विजेता मंदार कमलापूरकर यांनी काम केले आहे. चित्रपटाचे वाटावे असे पार्श्‍वसंगीत यात आहे. एकूण सात पात्रे आहेत, त्यांच्या आंतरसंवादातून हे नाटक पुढे जात राहते. नाटकाचे मुंबईत प्रयोग झाले आहेत. पुण्यातील नाट्यरसिकांसमोर आम्ही जातो आहोत, त्यांचा प्रतिसाद कसा मिळेल, हे आता पाहायचे आहे. गुवाहाटी, कोलकता, अहमदाबाद आणि मंगळूर येथेही या नाटकाचे प्रयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रंगभूमीवर पाऊल पडते पुढे...
अडीच दशकांनंतर रंगभूमीवर पाऊल पडत आहे, याबद्दल अमोल पालेकर म्हणतात, ‘‘सुरुवातीला भीती वाटत होती, नवशिका असल्यासारखे वाटत होते. आता दोन प्रयोग झाले असून रसिकांचा या नाटकाला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ‘सेटल’ झालो आहे. नाटकातील भूमिका पोलिस अधिकाऱ्याची होती. व्यक्तिरेखा आणि पोलिसी देहबोलीचा बराच अभ्यास केला. पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यासाठी खूप मदत केली. नाटक तर रसिकांचे रंजन करीलच. त्यापेक्षाही हे नाटक पाहिल्यानंतर आपल्या शंभर नंबरला फोन केल्यावर किती प्रचंड यंत्रणा राबते, हे सगळ्यांच्या लक्षात येईल.’’