अनिकेत विश्वासराव-माझं नाव बदनाम करण्याची धमकी दिली होतीEntertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aniket Vishwasrao-Sneha Chavhan
स्नेहा चव्हाणने अभिनेता अनिकेत विश्श्वासराववर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

माझं नाव बदनाम करण्याचा कट, पत्नीच्या आरोपांवर अनिकेतची प्रतिक्रिया

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आईवडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाणने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात स्नेहाने तक्रार दाखल केली. या तक्रारीत स्नेहाने अनिकेतचे अनैतिक संबंध आणि सिनेक्षेत्रात त्याच्यापेक्षा माझं नाव मोठे होईल, या भितीने पतीने जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मला मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन माझा छळ केला. सासू- सासरे यांनी माझ्यावर होणार्‍या अत्याचाराला न रोखता अनिकेतला दुजोरा दिला, असं स्नेहाने तक्रारीत नमूद केलं. ही घटना मुंबईतील दहिसर इथल्या विश्वासराव रेसिडेन्सीमध्ये १० डिसेंबर २०१८ ते 2 फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडल्याचं तिने म्हटलं. गेल्या काही दिवसांपासून स्नेहा आणि अनिकेत यांच्यात वाद सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

पण या तक्रारीसंदर्भात अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याशी संपर्क साधला असता त्याने 'सकाळ डिजिटल'ला आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला,'स्नेहा ५ फेब्रुवारी २०२१ पासून माझ्यासोबत राहत नाही. जाताना ती स्वतःचे सोन्याचे दागिने सोबत घेऊन गेली आहे. तिला माझ्यापासून विभक्त व्हायचं होतं. आणि त्यासाठी तिने २५ लाखांची पोटगी मागितली होती. पण मी नकार दिला आणि रीतसर कोर्टात जाऊन घटस्फोट घेऊया असे सांगताच स्नेहा आणि तिच्या कुटुंबियांकडून मला धमक्या येऊ लागल्या. मी जर पैसे दिले नाहीत तर माझं नाव बदनाम केलं जाईल असंही मला सांगितलं गेलं होतं.. पण मी याकडे दुर्लक्ष केलं. स्नेहाचा स्वभाव हा आधीपासूनच रागीट होता. ती माझ्या कोणत्याही मैत्रिणीसोबत किंवा अभिनेत्रीसोबत माझे नाव जोडायची,संशय घ्यायची. तिला अभिनयक्षेत्रात काम मिळत नव्हतं यासाठीही ती मला दोष देत होती. तिचा स्वभाव केवळ रागीट नाही तर विक्षिप्त आहे. मला अजूनही कळत नाही ती ५ फेब्रुवारीपासून आजपर्यंत म्हणजे १० महिने गप्प का राहिली? आजचा दिवसच का निवडला. माझ्या वडिलांचा आज वाढदिवस आहे,आणि मुद्दामहून स्नेहा आणि तिच्या कुंटुंबियांनी आम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी हे केलंआहे."

अनिकेत आणि स्नेहाने ५ ऑगस्ट २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. अनिकेत हा मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तर स्नेहाने २०१६ मध्ये स्वप्निल जोशीच्या 'लाल इश्क' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. अनिकेत आणि स्नेहाने 'हृदयात समथिंग समथिंग'मध्ये एकत्र काम केलं.

loading image
go to top