सुपरस्टार रजनीकांत यांचा 'दरबार' लूक पाहिला का?

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

2020 मध्ये 'पोंगल' सणाला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची खूप काळ वाट पाहावी लागणार हे नक्की.

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेते, थलायवा, सुपरस्टार रजनीकांत हे 'दरबार' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ए. आर. मुरुगादास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यांनीच या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर गुरुवारी (ता.25) ट्विटरवरून पोस्ट केले.

स्पायडर, सरकारसारखे चित्रपट दिगदर्शित केल्यानंतर ए.आर. मुरुगादास आता दरबार हा चित्रपट घेऊन येत आहेत. मुरुगादास यांनीच गुरुवारी सायंकाळी 7 वाजता चित्रपटाचे टायटल डिझाइन आणि रजनीकांत यांचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केले. त्यानंतर रजनी चाहत्यांनी सोशल मीडियावर उड्या घेतल्या. 

मुरुगादास यांनी 9 एप्रिलला दरबारचे पहिले पोस्टर शेअर केले होते. आज पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये रजनीकांत पोलिसाच्या पोशाखात दिसत आहेत. त्यामुळे हा एक कॉप ड्रामा असणार हे स्पष्ट झाले आहे. आता आपल्या लाडक्या थलायवाला पोलिसाच्या भूमिकेत पाहण्यासाठी सगळे चाहते आसुसलेले आहेत.

सध्या रजनीकांत 'दरबार' या चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहेत. नयनतारा, निवेथा थॉमस, दलीप ताहिल, सोरी, हरीश उथमान, जीव, मनोबाला, सुमन, आनंदराज, राव रमेश, बोस वेंकट, प्रकाश राज, नवाब शाह आणि योगी बाबू हे कलाकार या चित्रपटात सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून सुनील शेट्टी तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. तसेच प्रतिक बब्बर या चित्रपटात नकारात्मक भूमिका निभावताना दिसणार आहे.

हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट रजनीकांत यांचा 167 वा चित्रपट ठरणार आहे. पांडियान (1992) नंतर म्हणजे जवळजवळ 25 वर्षांनंतर रजनीकांत यांनी पोलिसाची भूमिका साकारली आहे.

2020 मध्ये 'पोंगल' सणाला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची खूप काळ वाट पाहावी लागणार हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AR Murugadoss shares new stills of Rajinikanth from upcoming cop drama Darbar