esakal | अँकर हिंदी बोलू लागल्यावर ए. आर. रहमान चिडले; आता दिलं स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

a r rehman

रहमान यांच्यावर संतापले होते नेटकरी 

अँकर हिंदी बोलू लागल्यावर ए. आर. रहमान चिडले; आता दिलं स्पष्टीकरण
sakal_logo
By
स्वाती वेमूल

ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा '९९ साँग्स' हा चित्रपट येत्या १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रहमान यांच्या स्वभावाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. कार्यक्रमाची निवेदिका रहमान यांच्याशी हिंदी भाषेत बोलायला लागली तेव्हा ते थेट मंचावरून निघून गेले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यावरून रहमान यांच्यावर टीकासुद्धा झाली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रहमान यांनी त्या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. 

'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या एका मुलाखतीत ए. आर. रहमान म्हणाले, "आम्ही तीन भाषांमध्ये म्युझिक लाँच करत होतो. हिंदी भाषेत म्युझिक लाँच केल्यानंतर आम्ही तमिळ भाषेकडे वळलो होतो. प्रत्येक कार्यक्रमाची एक रुपरेषा आखून दिलेली असते. आम्ही मंचावरून तमिळ प्रेक्षकांशी संवाद साधत होतो, त्यामुळे मी निवेदिकेला तमिळ भाषेत बोलण्यास सांगत होतो. पण ती अचानकपणे हिंदी बोलायला लागल्यामुळे मी आश्चर्यचकित होऊन 'अरे हिंदी' असं म्हटलं. पण मी मंचावरून गेल्यानंतर बाकीची लोकं तिथे येणार होते आणि पुढील कार्यक्रम पार पडणार होता. खरंतर ती मस्करी होती. त्यात गंभीर होण्याचं काहीच कारण नव्हतं. पण तो व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आम्हालाच त्याचा फायदा झाला."
 

हेही वाचा : मृण्मयी देशपांडेचा मुंबईला 'Good Bye'

नेमकं काय घडलं होतं?
म्युझिक लाँचसाठी ए. आर. रहमान यांच्यासोबत इतरही कलाकार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची निवेदिका या सर्व कलाकरांचा परिचय इंग्रजी आणि तमिळ भाषेत करून देत होती. जेव्हा ती अभिनेता एहान भट्टकडे वळली तेव्हा ती त्याच्यासोबत हिंदी भाषेत बोलू लागली. ते ऐकून रहमान पटकन म्हणाले, "अरे हिंदी?" त्यांनी असा प्रश्न का विचारला हे न समजल्याने निवेदिका गोंधळून गेली. ते पुढे तिला म्हणाले, "मी तुम्हाला आधीच विचारलं होतं की तुम्ही तामिळमध्ये बोलणार की नाही". यावर ती निवेदिका म्हणते, "मी सहज एहानला बरं वाटावं म्हणून हिंदीत बोलले." त्यावर आपण केवळ मस्करी केल्याचं रहमान यांनी स्पष्ट केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. 
मनोरंजन