
‘प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘अर्जुन’ अव्वल
‘प्लॅनेट मराठी’ नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि नावान्यपूर्ण आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नामवंतांसोबत उगवत्या कलाकारांनाही व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘प्लॅनेट मराठी’ तर्फे ‘प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल’चे (पीएमएसएफएफ)आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल अखेर जाहीर झाला. पाच लाखांचे प्रथम पारितोषिक मधुबन फिल्म्सच्या ‘अर्जुन’ या शॅार्टफिल्मला मिळाले असून तीन लाखांचे द्वितीय पारितोषिक राखाडी स्टुडिओच्या ‘अर्जुन्स स्टोरी’ला मिळाले आहे. तर दोन लाखांचे तृतीय पारितोषिक राखाडी स्टुडिओच्या ‘अवंती’ या शॅार्टफिल्मने पटकावले आहे. पन्नास हजाराचे उत्तेजनार्थ पारितोषिक राखाडी स्टुडिओच्या ‘अभी - अनू’ आणि तीस हजाराचे पारितोषिक अमर गोरे व अकबर सय्यद यांच्या ‘आत्मन’ या शॅार्टफिल्म्सना देण्यात आले आहे.
या शॅार्टफिल्म फेस्टिव्हलला तुफान प्रतिसाद मिळाला असून अवघ्या महाराष्ट्रातून सुमारे १६०० प्रवेशिका आल्या होत्या. या वेळी परिक्षक म्हणून संजय जाधव, मृणाल कुलकर्णी, किरण यज्ञोपावित, निखील महाजन, सर्वेश परब यांनी जबाबदारी सांभाळली होती. आजवर आयोजिलेल्या मराठी शॅार्ट फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये एवढ्या मोठ्या बक्षीसाची रक्कम कदाचित पहिल्यांदाच देण्यात येत आहे.
‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “या स्पर्धेत सुमारे दीड हजारांहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. आम्ही पहिल्यांदाच आयोजिलेल्या या शॉर्टफिल्म फेस्टिवलमधील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग आमच्यासाठी खूपच लक्षणीय होता. इतक्या स्पर्धकांमधून केवळ तीन स्पर्धक निवडणे, हे आमच्या परिक्षकांसाठीही खूपच आव्हानात्मक होते. प्रत्येक शॅार्ट फिल्मचा विषय वेगळा होता, मांडणी वेगळी होती, त्यातील प्रत्येक कलाकाराचा दर्जेदार अभिनय होता. त्यामुळे निवड करणे खूप कठीण होते. कोणत्याही आशयावर अन्याय होऊ नये, याची पुरेपुर काळजी आमच्या परिक्षकांनी घेतली आहे आणि त्यातून या पाच शॅार्ट फिल्म्स विजेत्या ठरल्या आहेत.’’
Web Title: Arjun Top In Planet Marathi Film Festivel
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..