माझे पाय जमिनीवरच...

काजल डांगे
गुरुवार, 5 जुलै 2018

चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले, यातच मी समाधानी आहे. यापुढेही गाण्यांतून त्यांना खूश करण्याचा नक्की प्रयत्न करीन. मात्र, इतक्‍या कमी वयात प्रसिद्धी आणि फेम मिळाल्यानंतरही माझे पाय आजदेखील जमिनीवरच आहेत, असे गुपित गायक अरमान मलिकने कॉन्सर्टदरम्यान उघड केले.

चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले, यातच मी समाधानी आहे. यापुढेही गाण्यांतून त्यांना खूश करण्याचा नक्की प्रयत्न करीन. मात्र, इतक्‍या कमी वयात प्रसिद्धी आणि फेम मिळाल्यानंतरही माझे पाय आजदेखील जमिनीवरच आहेत, असे गुपित गायक अरमान मलिकने कॉन्सर्टदरम्यान उघड केले.

अशा चाहत्यांना प्रत्यक्षात भेटल्यानंतर नेमकं काय अनुभवायला मिळालं?
- ‘कॉन्सर्ट’साठी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. ‘हॅप्पी होम अँड स्कूल फॉर द ब्लाईंड’ या शाळेतील मुलांमधील गाण्याची कला पाहून काही क्षणांसाठी मी सारं विसरून गेलो. ‘वजह तुम हो’, ‘हुआ है आज पहली बार’ यांसारखी गाणी मला मुलांनी गायला सांगितली आणि ही गाणी त्यांच्यासाठी मी अगदी मनापासून गायलो. मी फार खूश आहे की, माझ्या आवाजावर आज इतके लोक फिदा आहेत. विशेष म्हणजे ही मुलं मला न पाहता देखील माझ्यावर इतरांपेक्षा जास्त प्रेम करताहेत. हे क्षण अविस्मरणीय आहेत. 

तुझ्या करिअरची सुरुवातही एका रिअॅलिटी शोमधूनच झालीय. रिअॅलिटी शोस्‌ची स्पर्धा आता कितपत वाढलीय? 
- आता सोशल मीडियामुळे रिअॅलिटी शोपर्यंत पोहोचणं अगदी सोपं झालंय. अनेक टॅलेंटेड गायकही असतात, त्यामुळे स्पर्धा नक्कीच वाढलीय. पण एक गोष्ट सांगू इच्छितो, या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची बॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक बनण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येक स्पर्धकाचं हे स्वप्न पूर्ण होईलंच, असं नाही. एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये तुम्ही सहभागी झालात तर सुप्रसिद्ध गायक व्हाल याची हमी कोणाकडूनच दिली जात नाही. मात्र हार न मानता तुम्ही तुमची मेहनत आणि गायनाचा सराव सुरू ठेवला पाहिजे, असं मी म्हणेन. 

गायन विश्‍वातील विराट कोहली अशीही तुझी ओळख झालीय. हे फेम आणि प्रसिद्धी तू कसं सांभाळतोस?
- मला कमी वयातच एवढी प्रसिद्धी आणि चाहत्यांचं उदंड प्रेम अनुभवायला मिळतंय. याबाबत स्वत:ला मी फारच नशीबवान समजतोय. जेव्हा तुम्हाला जास्त प्रसिद्धी मिळते तेव्हा तुमचं इंडस्ट्रीमध्ये एक नाव होतं. तेव्हा लोकं पेचात पडतात की, हे सगळं हा सांभाळणार कसं? पण मला या सगळ्या गोष्टींचं कधी ओझं जाणवत नाही. मी खूप सोप्या पद्धतीने हे सगळं सांभाळतोय. माझा चाहतावर्ग म्हणजे मित्रमंडळीच आहेत. माझा आवाज आज लोकांपर्यंत पोहोचतोय आणि प्रेक्षकही माझ्यावर भरभरून प्रेम करताहेत. त्यातच मी फार खूश आहे. इतकी प्रसिद्धी मिळूनदेखील माझे पाय जमिनीवरच आहेत आणि हे कायम असंच राहणार. 

तुझा भाऊ अमाल मलिकचीही सुपरहिट गाणी आम्ही ऐकलीत. मात्र, तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल नातं कसं आहे?
- आमच्या दोघांमधील नातं नेहमी खूप मस्त असतं. स्टुडिओमध्ये आम्ही दोघं भांडतो. बऱ्याचदा आमचा एकमेकांवर आवाजही चढतो. पण मला असं वाटतं, की आपण जेवढे एखाद्याशी भांडतो तेवढंच प्रेमही वाढतं. अमालचं आणि माझं नातंदेखील अगदी तसंच असत. पण जेव्हा आम्ही दोघं जास्त भांडतो तेव्हा आमचं गाणं अधिक हिट होतं. त्यामुळे स्टुडिओमध्ये आमच्या दोघांमधली भांडणं सुरूच असतात.

‘घर से निकलते ही’ गाण्याला आतापर्यंत ६० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. यानंतर चाहत्यांच्याही तुझ्याकडून अपेक्षा वाढल्यात. त्यामुळे तुला अजून कोणत्या प्रकारची गाणी गायला आवडतील?
- मी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातो. आतापर्यंत माझी रोमॅंटिक गाणी फारच हिट झालीत. माझ्या तोंडून रोमॅंटिक गाणी ऐकणं प्रेक्षकांनी आजवर पसंत केलंय. जर मी काही वेगळं गाण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षकांना ते आवडेल की नाही माहीत नाही. पण नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या मी प्रयत्नात असतो. म्हणूनच मध्यंतरी मी ‘आजा ना फरारी मैं’ हे एक हटके गाणं केलं होतं. हे गाणं केल्यानंतर मला वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी तर मला फक्त रोमॅंटिक गाणी गाण्याचा सल्ला दिला; तर काही माझा नवा लूक पाहून भारावून गेले. सतत तुम्ही नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. प्रेक्षकांना ते नक्की आवडेल. 

‘मैं हूँ हिरो तेरा’ गाणं गाताच तुझ्या डोळ्यांसमोर कोणाचा चेहरा उभा राहतो? 
- मी हे गाणं गातो तेव्हा असा कोणताच चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत नाही. पण जेव्हा कधी मी माझ्या चाहत्यांना भेटतो, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहतो तेव्हा माझ्या तोंडून आपसूकच ‘ मैं हूँ हिरो तेरा’ हे गाणं येतं. मी माझ्या चाहत्यांचा हिरो आहे. हे गाणं गाताना असंख्य चाहत्यांचे चेहरे माझ्या डोळ्यांसमोर उभे राहतात.

यापुढे कोणती गाणी ऐकायला मिळतील? 
- माझे खूप प्रोजेक्‍ट्‌स सध्या सुरू आहेत. ‘घर से निकलते ही’ गाणंही प्रदर्शित झालंय. माझं अजून एक सिंगल गाणंही येतयं. त्या गाण्याच्या व्हिडीओमध्येही मी प्रेक्षकांना पाहायला मिळेन. तसंच काही चित्रपटांचे प्रोजेक्‍ट्‌सही माझ्याकडे आहेत. जे सप्टेंबर किंवा ऑक्‍टोबरदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येतील. याबाबत मी सध्या काही सांगू शकत नाही; पण या प्रोजेक्‍ट्‌ससाठी मी फार उत्सुक असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: armaan malik interview