फसवणुकीचा ‘जामतारा’ पॅटर्न

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

आताच्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट ऑनलाइन झाली आहे आणि विशेषतः ऑनलाइन बॅंकिंगचा अनुभव नसणारे फसवले जाण्याचं प्रमाण खूपच अधिक आहे. तरीही फसवणूक झालेल्यांत डॉक्टर, वकील व पोलिसांचाही समावेश होता.

‘‘मैं   .... बॅंकसे बात कर रही हूँ, आपका क्रेडिट कार्ड एक्सपायर हो गया है...कृपया आपके कार्ड का नंबर और पीछे दिया हुआ थ्री डिजिट नंबर दीजिए... अब फोनपे आया हुआ ओटीपी भी भेज दीजिए...’’ अशा प्रकारचे कॉल्स तुम्हाला कधीतरी नक्कीच आले असतील. कार्डची माहिती घेऊन तुम्हाला मोठा आर्थिक गंडा घालण्याचा हा फंडा. असे धंदे शहरातील गुन्हेगारांकडून होत असावेत, असा आपला समज... मात्र, असे गुन्हे खेड्यातील बेरोजगार तरुणांकडून होत असल्यानं पोलिसही चक्रावून गेले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘जामतारा’ नावाची सत्यघटनेवर आधारित वेबसीरिज तुमच्या पाहण्यात आली असल्यास तुम्हाला चटकन सगळा उलगडा होईल...

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जामतारा हे झारखंड राज्यातील एक छोटंसं गाव. या गावातील काही युवकांना फसवणुकीचा हा नवा व्यवसाय सापडला. भरपूर कार्ड खरेदी करायचे, बकरे शोधून त्यांना फोन करायचे आणि बॅंकेचं अकाउंट साफ करायचं ही त्यांची गुन्ह्यांची पद्धत. ही सगळी मुलं १८ वर्षांच्या आतील, त्यामुळं कोणाचंही बॅंकेत अकाउंट नाही. त्यामुळं गावातील एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या नावानं अकाउंट सुरू करायचं आणि त्या खात्यात पैसे जमा करीत राहायचं ही पद्धत. सायबर पोलिसांनी बराच खटाटोप केल्यानंतर त्यांना जामतारा या गावातून सर्वाधिक फेक कॉल्स होतात व तिथूनच अधिक फसवणुकीचे प्रकार घडतात हे लक्षात आलं. ही मुलं चक्क मुलींचे आवाज काढून, ग्राहकांशी गोड बोलून त्याला फसवायचे. अधिक चौकशी केल्यावर या अशिक्षित मुलांचा आणखी एक पॅटर्न पोलिसांसमोर आला. हे युवक आपल्यापेक्षा मोठ्या, सुशिक्षित, इंग्रजी बोलू शकणाऱ्या व अत्यंत गरीब घरांतील मुलींना गाठायचे. या मुली दुसऱ्या राज्यातील किंवा जवळच्या नेपाळमधीलही असत. ही मुलंच त्यांना ५ ते १० लाख रुपये हुंडा देऊन त्यांच्याशी लग्न करत! लग्नानंतर या मुलीचं एकमेव काम म्हणजे इंग्रजीमध्ये बोलत माश्‍यांना जाळ्यात अडकवायचं. अर्थात, असे व्यवहार करताना स्पर्धा, त्यातून गुन्हेगारी, खूनखराबाही होणारच. जामतारामध्ये शेवटी असंच झालं आणि मोठी गुन्हेगारांची मोठी साखळी उघड झाली. मात्र, त्याआधी या युवकांनी बॅंक ग्राहकांना लाखो रुपयांचा गंडा घातला होता...

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आताच्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट ऑनलाइन झाली आहे आणि विशेषतः ऑनलाइन बॅंकिंगचा अनुभव नसणारे फसवले जाण्याचं प्रमाण खूपच अधिक आहे. तरीही फसवणूक झालेल्यांत डॉक्टर, वकील व पोलिसांचाही समावेश होता. देशात असे अनेक ‘जामतारा’ असणार, जिथं हाताला काम नसणारे युवक या प्रकारच्या गुन्ह्यांत ओढले जात असतील. मात्र, कोणताही गुन्हेगार फार काळासाठी मोकाट राहू शकत नाही, एखादा ‘सुराग’ तो नक्कीच मागं ठेवतो आणि पकडला जातो. ही बेवसिरीज पाहिल्यावर ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी समज मिळतेच, त्याचबरोबर अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचा शेवटही तेवढाच भयावह असतो, हेही समजते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about OTT platform jamtara web series