मोरुच्या मावशीचा 'विजय' असो!

हेमंत जुवेकर
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकप्रिय झालेल्या विजय चव्हाणांना सुरुवातीला अभिनयाबद्दल नावडच होती. खुद्द त्यांनीच हे एका मुलाखतीत सांगून टाकलंय.

फार वर्षांपूर्वी दूरदर्शनवर किलबिल नावाचा मुलांसाठी एक कार्यक्रम असे. त्यात एक कार्यक्रम होता, छोट्या छोट्या नाटिकांचा. मुक्तनाट्याच्या स्वरुपात तिथे केल्या जाणाऱ्या त्या कार्यक्रमाचं संचालन धनंजय गोरे आणि विजय चव्हाण करीत. हे दोघे मिळून मस्त धमाल करत. विजय चव्हाणांची विनोदाची शैली संयत. पण टायमिंग अफाट. त्यामुळे ते हक्काने हसे वसूल करत. त्यांची संयत शैली तेव्हापासूनच अनेकांना भावली होती.

टुरटुर, हयवदन अशा काही नाटकांमध्ये विजय चव्हाण दिसले असले तरी मोरुची मावशी म्हणून ते थेट रसिकांच्या मनातच जाऊन बसले! प्रदिप पटवर्धन, प्रशांत दामले या त्यावेळच्या नव्या कलाकारांना सोबत घेऊन केलेला हा मोरुच्या मावशीचा प्रयोग तुफान गाजला. यातली विजय चव्हाणांनी साकारलेली मावशी दिसायला तितकी गोड नसली तरी आपल्या अभिनयाने त्यांनी ती लव्हेबल केली. 

आचार्य अत्र्यांच्या या नाटकात सुरुवातीच्या प्रयोगात मोरुची मावशी साकारली होती ती बापुराव माने या त्यावेळच्या प्रसिद्ध स्त्री पार्टी अभिनेत्यांनी. 

हे नवे प्रयोग पाहिलेल्या काही ज्येष्ठ प्रेक्षकांनी बापुरावांची मावशी जास्त गोड असल्याची प्रतिक्रिया दिली होती. ही मावशी दर पाच मिनिटाला बाईपणाचं बेअरिंग सोडते अशासारखी टीकाही झाली. पण, पुण्यात झालेला प्रयोग पाहिल्यावर खुद्द बापुरावांनी विजय चव्हाणांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. स्त्री वेशाचं अोझं झालेली मावशी दाखवणं जास्त वास्तविक आहे, कारण तो मुळात पुरुष आहे, ते विजयने खूप छान दाखवलंय असं म्हणत त्यांनी चव्हाणांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. ते खरंच होतं. ते मावशीचं तोंड लपवून, खांदे घुसळत हसणं, आणि नव्याने नाटकात आणलेल्या गाण्यावर नाचणं प्रेक्षकांनी फारच एन्जाॅय केलं. 

आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकप्रिय झालेल्या विजय चव्हाणांना सुरुवातीला अभिनयाबद्दल नावडच होती. खुद्द त्यांनीच हे एका मुलाखतीत सांगून टाकलंय. खरंतर त्यांचे वडिल अभिनयाशी संबधित होते, पण 'तोंडावर रंग लावून रंगमंचावर काय नाचायचं' असं त्यांना वाटे. पण काॅलेजमधल्या नाटकात मुख्य भुमिका करणारा एक मुलगा आजारी पडला आणि त्यांना जबरदस्तीने रंगभूमीवर त्या मुलाच्या जागी उभं रहावं लागलं. पण ती भtमिका इतकी उत्तम केली त्यांनी की चक्क बक्षिसपात्र ठरली आणि मग रंगभूमीला विजय चव्हाण या अभिनेत्याचं बक्षीस मिळालं. 

विजय चव्हाणही नंतर रंगभूमीवर, अभिनयात मनापासून रमले. रसिकांना त्यांनी मनापासून हसवलं. पण हसवण्यासाठी त्यांनी कधीही अंगविक्षेप नाही केले. 'सहजतेने व्यक्त होईल आणि तरीही त्यातून समोरच्याला हसू येईल, तो खरा विनोद' अशी त्यांची विनोदाची सहजसोपी व्याख्या होती. त्यांच्या या व्याखेसारखाच त्यांचा स्वभावही होता. साधा सरळ. 

आपलं काम उत्तम होतंय याचं श्रेयही ते सहकलाकारांना देत. आताच्या तरुण कलाकारांचा वेग आणि टायमिंगचं कौतुक करताना मी त्यांच्याकडून ते शिकतोय असं ते सांगत तेव्हा तो नाटकीपणा नसे. पण त्या कलाकारांच्या एनर्जीला मॅच करणारी कामगिरी ते करुन दाखवतच. (तेही त्यांचं शरीर तेवढं साथ देत नसताना...)

गेल्या काही वर्षांत आजारपणामुळे अलिकडे त्यांचा जिंदादिल अभिनय फार पहाता आला नसला, तरी त्यांनी यापुर्वी करुन ठेवलंल काम त्यांच्यातल्या अभिनेत्याची उंची जाणवून देतंच. त्याचबरोबर त्यांच्या निगर्वी वागणुकीमुळे त्यांनी जोडलेल्या माणसांतून त्यांची `श्रीमंती` कळतेच.  

त्यांच्या आठवणी, यापुढची अनेक वर्षे अनेकांची मनं समृद्ध करत रहातीलच. मग ते रसिक असोत की त्यांच्या संपर्कात आलेले कलाकार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on actor vijay chavan by hemant juwekar