कधीकाळी चक्क 'या' अभिनेत्यानं देवालाही घातलेल्या शिव्या, माझ्याच वाट्याला का हे दुःख म्हणून झालेला उद्विग्न!

देवाने त्याला छोटं केलं नाही, तर ‘स्पेशल’ केलं आहे. आज त्याची उंची हीच त्याची ओळख आहे.
Actor Mahesh Jadhav
Actor Mahesh Jadhavesakal
Summary

लोकांनी हिणवलं नसतं तर आज माझ्यातून माझं बेस्ट बाहेर पडलं नसतं म्हणून तो लोकांचे आभार मानतो. देवाने त्याला ‘स्पेशल’ केलं म्हणून तो देवाचेही आभार मानतो.

कधीकाळी चक्क त्याने देवालाही (God) शिव्या घातलेल्या.. माझ्याच वाट्याला हे दुःख का म्हणून तो उद्विग्न झालेला.. त्याला त्याच्या उंचीनं कॉम्प्लेक्स दिलेला. मात्र, त्याला माहीत नव्हतं, की ही देवाचीच योजना होती. संघर्ष जितका मोठा असतो तितकाच विजय शानदार असतो. त्यानं त्याच्या अभिनयाच्या उंचीनं चक्क आभाळाला स्पर्श केला. त्याला हिणवलेल्या प्रत्येक शब्दाच्या त्याने शिड्या केल्या. त्याची उंची मोजायला जगातलं कुठलंही परिमाण अपुरे पडेल इतका तो माणूस म्हणून मोठा आहे. देवाने त्याला छोटं केलं नाही, तर ‘स्पेशल’ केलं आहे. आज त्याची उंची हीच त्याची ओळख आहे. एव्हाना तुम्ही ओळखलं असेल की हा कोण आहे. साताऱ्यामध्ये (Satara) टॅलेंटची कमी नाही; पण ‘टॅलेंट’ या नावाने एकच व्यक्ती ओळखला जातो तो म्हणजे आपला महेश जाधव (Mahesh Jadhav).

पडद्यावर त्यांनं विलन साकारला; पण दुश्मनाच्याही वाट्याला येऊ नये, इतकं दुःख आयुष्यात त्याच्या वाट्याला आलं. वयाच्या अवघ्या आठव्या महिन्यात वडिलांचं छत्र हरपलं. छोट्या महेशला घेऊन त्याची आई वाघोलीसारख्या छोट्या खेड्यात महेशच्या आजोळला राहायला आली. मामानं आधार दिला. गावाकडच्या कुठल्याही पोराच्या वाट्याला यावीत, तीच कामं, कष्ट महेशच्याही वाट्याला आले. अवघा तिसरी चौथीत असताना तो गुरं सांभाळायला जायचा. आई शेती करायची. एवढासा पोरगा रस्त्याने चालू लागला, की लोक त्याला हसायचे. आपण कुणीतरी वेगळे आहोत, ही भयाण जाणीव त्याला इतक्या लहान वयात झाली.

Actor Mahesh Jadhav
Sumeet Pusavale: "सिरीयलच्या सेटवर योगायोगाने गेलो होतो तो दिवस ..."; बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेनं शेअर केली पोस्ट

लौकिक अर्थाने तो लहान वयातच मोठा झाला. मात्र, त्याच्या उंचीमुळे त्याला कुणीच मोठेपणा दिला नाही. पावला- पावलाला अपमान, क्षणोक्षणी निर्भत्सना.. वाटायचं, हे आपल्याच नशिबात का? तो देवाला शिव्या द्यायचा. ढसढसून रडायचा. वर्गात मुलं चिडवायची. दुपारच्या सुटीत बाहेर पडलं तरी चिडवायची. मग तो वर्गातच स्वतःला कोंडून घ्यायचा. अशा अवस्थेत त्याचं पाचवीपर्यंत वाघोलीला शिक्षण झालं. त्यानंतर बिभवी इथं हायस्कूल झालं. महेश मूळचाच टॅलेंटेड होता. तो पहिल्या, दुसऱ्या नंबरात राहायचा. आपल्याला देवानं उंची दिली नाही, तर त्याची कसर अभ्यास करून भरून काढावी म्हणून तो झपाटून अभ्यास करायचा. आई अफाट कष्टातून त्याला वाढवत होती. मुलाने बँकेत नोकरी करावी, अशी तिची इच्छा होती.

मुधोजी महाविद्यालय फलटण (Mudhoji College Phaltan) इथं त्यांनं बीकॉमला (B.Com) प्रवेश घेतला. अभ्यास सुरू केला. घरी वारकरी संप्रदायाची परंपरा होती. त्याला गायला आवडायचं. विशेषत: अभंग आवडायचे. महाविद्यालयाच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षाला युथसाठी त्यानं नाव नोंदवलं. मात्र, दोन्ही वर्षे त्याचं सिलेक्शन झालं नाही. तो हताश झाला. अनेक ठिकाणी दार बंद असताना एक खिडकी उघडली. एका मुलांच्या ग्रुपनं त्याला स्कीटसाठी विचारलं. त्याला ते भयंकर आवडलं आणि एका अभिनेत्याला दारं उघडी झाली.

महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षात एकांकिकेत त्याला अभिनय करायला मिळाला नाही. त्यानं म्युझिक केलं. मात्र, लास्ट इयरला संदीप जंगम यांनी त्याला मध्यवर्ती ठेवून केलेली ‘ऑपरेशन दगड’ हे एकांकिका भाव खाऊन गेली. तो कल्चरलचा सेक्रेटरी झाला आणि डिस्टिंक्शन मिळवून पदवीधर झाला. पुढे करायचं काय? हा प्रश्न होताच एक-दीड वर्ष मोबाईलच्या दुकानात, कुठं सीएकडं, असं महिना हजारभर रुपये पगारात पडेल ते काम केलं. दरम्यान, अभिनय सुरूच होता. २०१७ च्या एप्रिल महिन्यात धोंडिबा कारंडे यांनी त्याला ‘लागिरं झालं जी’च्या ऑडिशनला पाठवलं आणि तेजपाल वाघांनी त्याच्यासाठी स्पेशल रोल लिहिला. महाराष्ट्राला ‘टॅलेंट’ मिळाला.

Actor Mahesh Jadhav
Manisha Rani: मनीषा राणी ठरली 'झलक दिखला जा 11'ची विजेती! ट्रॉफीसह मिळाले लाखोंचे बक्षीस

खलनायक भय्याला सल्ला देणारा मास्टरमाइंड टॅलेंट. त्यानंतर महेश थांबलाच नाही. या कष्टाळू पोरानं त्याची उंची इतकी वाढवली की त्याच्या अभिनयाची चक्क बॉलीवूडलाही भुरळ पडली आहे. ‘लागिरं झालं जी’नंतर ‘प्लॅंचेट’ हे देवेंद्र प्रेम यांचं व्यावसायिक नाटक, ‘टोटल हुबलाक’मधला ‘मायकल’ ‘कारभारी लय भारीतला’ जग्गू दादा. असे दमदार रोल त्याच्या वाट्याला आले. विशाल शिंदे दिग्दर्शित ‘क्वार्टर’ या त्याच्या लघुपटाने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारितोषिकांवर मोहर उमटवली आहे. झी नाट्य गौरव, झी चित्र गौरव, अशा मोठमोठ्या शोजमधून महेश दिसत राहिला. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेलिब्रिटी पर्वात तो झळकला. ‘हे तर काहीच नाही’ हा रिॲलिटी शो त्यानं सिद्धार्थ जाधवसारख्या सेलिब्रिटीसोबत केला.

सिद्धार्थला तो त्याचा प्रेरणास्रोत मानतो. तो स्वतःला सिद्धार्थमध्ये पाहतो. रंग, रूप, देहयष्टी याच्या पलीकडे जाऊन ज्यांनी स्वतःला सिद्ध केलं, त्या सिद्धार्थ जाधवांसारख्या अभिनेत्यांना तो आपलं रोल मॉडेल मानतो. सिद्धार्थ त्याच्या भावासारखा पाठीशी उभा आहे. केवळ छोट्याच नाही, तर मोठ्या पडद्यावरही महेशने आपली छाप उमटवली आहे. त्याचा ‘फकाट’ हा सिनेमा रिलीज होत आहे. चार-पाच मराठी सिनेमे प्रतीक्षेत आहेत. एवढेच नाही तर पॕरा पॉवरलिफ्टिंग या मानाच्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत तो चक्क गोल्ड मेडलिस्ट आहे. ही सातारकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

Actor Mahesh Jadhav
Vyjayanthimala: वय हा केवळ आकडा! 90 व्या वर्षी वैजयंतीमाला यांचा अयोध्येत खास परफॉर्मन्स

लोकांनी हिणवलं नसतं तर आज माझ्यातून माझं बेस्ट बाहेर पडलं नसतं म्हणून तो लोकांचे आभार मानतो. देवाने त्याला ‘स्पेशल’ केलं म्हणून तो देवाचेही आभार मानतो. अवतीभवतीच्या बुटक्यांच्या जगात आपल्या अभिनयाने आभाळाची उंची गाठलेला महेश जाधव अर्थात ‘टॅलेंट’ साताऱ्याची शान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com