
दूरदर्शनच्या जमान्यात मालिका पाहण्याची सवय लागेलेल्या प्रेक्षकांना आताच्या डेली सोप्सचा काळ फारसा मानवत नाही. ऐंशी व नव्वदच्या दशकात मालिकांबद्दलचे काही नियम ठरले होते. कोणतीही मालिका काही अपवाद सोडल्यास फक्त १३ भागांची असायची. त्यामुळं मालिका संपल्यावर प्रचंड हुरहूर जाणवायची. ‘बुनियाद’, ‘हमलोग’, ‘नुक्कड’, ‘यह जो जिंदगी’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या मालिकांवर प्रेक्षकांनी अपार प्रेम केलं.
दूरदर्शनच्या जमान्यात मालिका पाहण्याची सवय लागेलेल्या प्रेक्षकांना आताच्या डेली सोप्सचा काळ फारसा मानवत नाही. ऐंशी व नव्वदच्या दशकात मालिकांबद्दलचे काही नियम ठरले होते. कोणतीही मालिका काही अपवाद सोडल्यास फक्त १३ भागांची असायची. त्यामुळं मालिका संपल्यावर प्रचंड हुरहूर जाणवायची. ‘बुनियाद’, ‘हमलोग’, ‘नुक्कड’, ‘यह जो जिंदगी’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या मालिकांवर प्रेक्षकांनी अपार प्रेम केलं. मालिकेचा दिवस आणि वेळ ठरलेली असायची आणि त्याच वेळांत ही मालिक पाहावी लागायची. दिवसातून तीनदा आणि आठवड्यातील प्रत्येक दिवशी हे भाग प्रदर्शित करण्याची ‘कमर्शिअल’ पद्धत त्याकाळी अस्तित्वात नव्हती.
‘बुनियाद’मधलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या ओळखीचं असायचं, तर ‘हमलोग’च्या शेवटी ज्येष्ठ अभिनेते अशोककुमार त्या भागाचं करीत असलेलं विश्लेषण आणि पुढच्या भागात काय होणार याची तोंडओळख डोळ्यांत प्राण आणून ऐकली जायची. ‘यह जो जिंदगी’मधला मध्यमवर्गीय विनोद प्रत्येकाला आपला वाटायचा, तर ‘नुक्कड’ पाहताना आपल्याच गावातील कट्ट्यावरचे लोक पाहत असल्याचा भास व्हायचा. ‘वागले की दुनिया’ या मालिकेचं लिखाण आणि त्यातील अंजन श्रीवास्तव आणि भारती आचरेकरांचा अभिनय ती पिढी अद्याप विसरलेली नाही. या मालिकांचं लेखन, दिग्दर्शन, संकलन या गोष्टी अतिशय नेटक्या, तज्ज्ञांनी केलेल्या असायच्या व त्यामुळं कुठंही चुका, आक्रस्ताळेपणा दिसायचा नाही. (सोशल मीडियावर एक जोक मागच्या आठवड्यात फिरत होता. दशरथाला मुलं होऊन ती मोठी झाली तरी बबड्या अजून थालीपीठच खातोय!) या मालिकांचं हेच मोठं वैशिष्ट्य होतं.
‘तमस’सारखी गोविंद निहलानीसारख्या ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शकाची मालिका संपूर्ण देशाला विचार करण्यास भाग पाडायची. हिंदी-मुस्लीम दंग्यांचं चित्रणही अत्यंत संयतपणे व डोळ्यात अंजन घालत केल्यानं प्रेक्षक अशा मालिकांमधून अनेक गोष्टी शिकत. त्या काळातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली भावुक प्रेमकथा ‘फिर वही तलाश’ प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे, तर ‘गुल गुलशन गुलफाम’सारखी मालिका काश्मीरच्या प्रश्नावर वेगळंच भाष्य करून जायची. ज्येष्ठ दिग्दर्शिका कल्पना लाज्मी यांची ‘लोहित किनारे’सारखी मालिका आणि त्यातील भूपेन हजारिका यांचं संगीत तुम्हाला मंत्रमुग्ध करून जायचं. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’सारख्या बड्या निर्मितीसंस्थांच्या मालिकांनी तर इतिहासच घडवला. खासगी वाहिन्या सुरू झाल्यावर दूरदर्शनचं महत्त्व संपलं आणि मालिका कमर्शिअल झाल्या. मागील काही पिढ्यांच्या स्मरणात आणखीनही काही मालिका नक्कीच असतील. मात्र, मनोरंजनाच्या जोडीला संस्कार आणि संस्कृतीची मुल्यं नेटानं जपणाऱ्या अशा मालिका पुन्हा होणे नाही, हे नक्की.