सुपरमार्केटमध्ये रेंगाळायला आवडतं : सखी गोखले

sakheeGokhale
sakheeGokhale

लंडन कॉलिंग

मला कोणी विचारलं, की मला खरेदी करायला कुठं सगळ्यात जास्त आवडतं, तर मी विचारही न करता म्हणेन, सुपरमार्केट. मला धान्य खरेदी करायला खूप आवडतं. मी आरामात काही तास घालवू शकते, अगदी जगातल्या कुठल्याही सुपरमार्केटमध्ये! 

लंडनमध्ये विविध प्रकारचे मार्केट आहेत. काही पूर्णपणे ऑरगॅनिक वस्तू विकतात, तर काही चार मजली कमर्शिअल इमारतीमध्ये जगभरातले पदार्थ विकतात. अनेकदा एक रांग एका देशासाठी असते. अगदी कॅनडाच्या मॅपल सिरपपासून ते व्हिएतनामच्या नुडल्सपर्यंत अक्षरशः सगळं मिळतं. मला या सुपरमार्केटमध्ये रेंगाळायला आवडतं. या मार्केटमध्ये आलेले पदार्थ सहसा जास्त खाल्ले जात असावेत, असा अंदाज बांधत मी वेगवेगळ्या देशांच्या रांगांमध्ये चालते. भारतीय सेक्‍शन असतोच. इथे राहणाऱ्या लोकांना भारतीय जेवण खूप आवडतं, माझे अनेक मित्र मला त्यांच्या सुपरमार्केटमधून फोन करून एखाद्या पदार्थाची चव कशी असेल किंवा हे त्यांना बनवता येईल का, असे प्रश्‍न विचारतात. घरी जेवायला आल्यावर, कॉलेजमध्ये माझ्या डब्यातलं खाऊन आवर्जून रेसिपी मागतात.
मी मात्र भारतीय सेक्‍शनमध्ये, आपल्या देशातलं नक्की काय सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे किंवा कशाचा खप जास्त होतो, हे पाहायला आवडतं.

डोळ्यांसमोर घराखालच्या वाण्याचं दुकान येत राहतं. आमचे वाणी आणि आम्ही बहुधा एकत्र आमच्या इमारतीत आलो. लहानपणापासून त्यांच्याकडं आमचं खातं आहे. दर महिन्याला तो हिशेब करायचा. काउंटरवर असणारे, हिशेब करणारे मुख्य वाणी काका मात्र काही वर्षांनी बदलत राहत. मी अजूनही माझ्या विशीत आहे; पण त्यांच्या मी अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. ते फारच लवकर मोठे होत असावेत किंवा आम्ही खूपच मागे पडलोय!
आई सांगते, पहिल्यांदा मी एकटी घराबाहेर पडली ते खालच्या दुकानातून ब्रेड आणायला. सतत वर बघत खिडकीतून कोणी लक्ष ठेवून नाहीये ना, हे बघत हळूहळू पोचले (घरातले सगळे लपून बघत होतेच). त्यानंतर वर्षानुवर्षं त्यांच्याकडून घरचं सामान आणलंय. आम्ही घरी नसताना आमची पत्रं, पार्सल, कधीकधी पासपोर्टसुद्धा ते आमच्या वतीने घेतात.

नुकतंच त्यांनी त्यांचं दुकान अगदी मॉडर्न केलंय. शेजारचा गाळाही विकत घेतला आणि दुकान मोठं केलं. आता आवडीचा बिस्किटांचा पुडा न शोधता मिळतो आणि त्यांची हिशेबाची फाटकी आणि मळलेली छोटी वही आता रजिस्टर झाली आहे. मला भेटले की माझं कौतुक करतात, नसताना विचारपूस करतात. मी मात्र बास्केटमध्ये थाय ग्रीन करी आणि एवॅकॅडोज्‌ घेऊन या आठवणींमध्ये रमत लंडनमधल्या सुपरमार्केटमधून बाहेर पडते...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com