'आर्यनने जे भोगलं त्याची भरपाई कोण करणार?'; दिग्दर्शकाचा सवाल | Aryan Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan

'आर्यनने जे भोगलं त्याची भरपाई कोण करणार?'; दिग्दर्शकाचा सवाल

क्रुझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खान Aryan Khan, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत फौजदारी षड्यंत्र रचल्याचा कुठलाही सकारात्मक पुरावा सकृतदर्शनी दिसत नसल्याचं मत उच्च न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर करताना नोंदवलं आहे. आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काहीच आक्षेपार्ह नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं. यावर आता काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'आर्यन आणि त्याच्या कुटुंबीयांनी जे काही भोगलं त्याची भरपाई कोण करणार', असा सवाल दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी केला.

'तर आर्यन खान हा निर्दोष आहे आणि होता असं मुंबई उच्च न्यायालय म्हणतेय. मग त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी जे काही भोगलं त्याची भरपाई कोण करणार', असं ट्विट संजय गुप्ता यांनी केलं. ज्वेलरी डिझायनर फराह अली खानने ट्विट करत लिहिलं, 'शाहरुख, गौरीसाठी मी खूश आहे. देव दयाळू आहे.' आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दिला होता.

आर्यन आणि अन्य दोघांना न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी १४ अटी घालून २९ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आर्यनची आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती. आर्यन आणि अन्य दोन आरोपींना जामीन मंजूर करण्याच्या न्यायमूर्ती सांब्रे यांच्या तपशीलवार आदेशाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. आतापर्यंतच्या तपासातून आर्यन आणि अरबाज मर्चंट यांनी मुनमुन धमेचाबरोबर नव्हे तर स्वतंत्रपणे प्रवास केल्याचं तसंच त्यांची तिच्याशी भेट झाली नसल्याचं पुढे आल्याचं न्यायमूर्ती सांब्रे यांनी आपल्या १४ पानी आदेशान म्हटलं आहे. त्याचप्रमाणे या आरोपींनी षड्यंत्राचा भाग म्हणून व्यावसायिक प्रमाणात ड्रग्ज बाळगून अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हेतुत: गुन्हा केल्याचं मानलं जावं हे एनसीबीचं म्हणणं मान्य करण्यासही न्यायालयाने नकार दिला.

loading image
go to top