अशोक मामांनी मुंबई पोलिसांसाठी आखला खास आमरस पुरीचा बेत..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

योद्धांचं कौतुक करण्यासाठी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी एक उत्तम बेत जमवून आणला आहे.

मुंबई- नैसर्गिक आपत्ती असो किंवा मग कोणाचं आंदोलन पोलिस नेहमीच स्वतःच्या जीवाची बाजी लावून लोकांच्या रक्षणासाठी तत्पर असतात.सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. अशा जागतिक संकटात देखील पोलिस त्यांच्या जीवाची बाजी लावत आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. लॉकडाऊनमध्ये प्रत्येक शहरातील पोलिसांवर जास्त जबाबदारी आहे. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता ते रस्त्यावर उतरले आहेत.  पाऊस असो किंवा मग रणरणतं उन, ते त्यांच्या कर्तव्य बजावत असतात. कोरोना व्हायरसच्या या संकटात अनेक पोलिस अधिका-यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. या योद्धांचं कौतुक करण्यासाठी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी एक उत्तम बेत जमवून आणला आहे.

हे ही वाचा: मलंगच्या सिक्वेलसाठी व्हा तयार..निर्मात्यांनी केली घोषणा

अशोक सराफ आणि पत्नी निवेदिता अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये राहतात. ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारा हा भाग असल्याने सराफ दाम्पत्यांने ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्याशी संपर्क साधला. आणि या जोडीने पोलिस कर्मचा-यांना आमरस पुरीचं जेवण देण्याची इच्छा व्यक्त केली.

पोलिसांकडून परवानगी मिळाल्यावर त्यांनी हा बेत तयार करत स्वतः निवेदता सराफ पोलिस ठाण्यात आमरस पुरी घेऊन आल्या होत्या. सध्याच्या या कठीण परिस्थितीत तुम्ही जे कार्य करत आहात तै कौतुकास्पद आहे. तुमच्याबद्दल मनात कायम आदर आहे आणि तसाच राहिल अशा शब्दांत सराफ दाम्पत्याने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. सोशल मिडियावर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मुंबई पोलिसांसाठी दाखवलेल्या या प्रेमाचं भरभरुन कौतुक होतंय.   

ashok saraf and his wife nivedita saraf prepare special aamras puri for mumbai police  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashok saraf and his wife nivedita saraf prepare special aamras puri for mumbai police