#BalaTrailer : पुरुषांच्या चिंतेच्या विषयावर आयुष्मान घेऊन आलाय नवा सिनेमा; ट्रेलर पाहाच!

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

'ड्रिम गर्ल' च्या घवघवीत यशानंतर आयुष्मान खुरानाचा आणखी एक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बाला' असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

मुंबई : बॉलिवूडचा टॅलेंटेड अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा नव्या चित्रपटासह सज्ज झाला आहे. 'ड्रिम गर्ल' च्या घवघवीत यशानंतर त्याचा आणखी एक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बाला' असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा अनोख्या अंदाजात तो प्रेक्षकांसमोर आला असून ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काही वेळातच त्याला लाखो व्ह्युज मिळाले. प्रेक्षकांनी ट्रेलरला  सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याआधी हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट 7 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना खुशखबर देऊन दिग्दर्शकांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. या सिनेमात आयुष्मान केस गळतीच्या समस्येला तोंड देताना दिसणार आहे. एकुण ही गंभीर परिस्थिती दिग्दर्शकाने कॉमेडीच्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आणली आहे. टक्कल पडल्यामुळे चित्रपटात आयुष्मान सर्व प्रकारचे उपाय करुन बघतो. पण या समस्येचा जालीम उपाय त्याला मिळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी तो काही करण्यास तयार असतो. खरी मजा तर तेव्हा सुरु होते जेव्हा लग्नानंतर बायकोपासून तो टक्कल लपवतो. 

सिनेमात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत भूमि पेडणेकर, यामी गौतम, सीमा भार्गव, अभिनेता सौरभ शुक्ला आणि मनोज पहवा ही मंडळीदेखील दिसणार आहेत. 'दम लगाके हैशा' या चित्रपटानंतर भूमी आणि आयुष्मान पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. चित्रपटाचे दमदार डायलॉग आणि गंभीर समस्येसह उत्तमरित्य़ा सांभाळलेली कॉमेडीची बाजू कौतुकास्पद आहे. 

अमर कौशिक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी अमर यांनी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यासह 'स्त्री' हा चित्रपट केला. त्या चित्रपटामध्येही एका गंभीर समस्येला त्यांनी कॉमेडीसह प्रेक्षकांसमोर आणलं होतं. अमर यांच्या दिग्दर्शनाची ही दादच म्हणावी लागेल की, ते सामाजिक समस्यांना कॉमेडीसह प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करतात. 
'प्यार का पंचनामा 2' आणि 'सोनु के टिट्टू की स्वीटी' मध्ये झळकलेला अभिनेता सनी सिंह याचा आगामी चित्रपट 'उजडा चमन' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट आणि 'बाला' दोन्ही एक सारख्या समस्येवर आधारित आहेत. 'उजडा चमन' मध्येही केसगळतीची समस्या दाखविण्यात आली आहे. 'बाला' हा चित्रपट 'उजडा चमन' च्या एक दिवस आधी प्रदर्शित होणार आहे. सुपर कॉमेडी असलेल्या या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता सिनेमा बॉक्सऑफिसवर बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bala trailer Ayushmann Khurrana promises a laughter riot with his balding story