
'या' कारणामुळे 'तारक मेहता' मधून गायब आहेत शैलेश लोढा,शूटिंगही थांबवलय
गेल्या काही दिवसांपासून बातमी होती की तारक मेहता का उल्टा चष्मा(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये 'तारक मेहताची' भूमिका करणारे शैलेश लोढा(Sailesh Lodha) यांनी मालिकेला रामराम केला आहे. शैलेश लोढा हे मालिकेतील आपल्या ट्रॅकविषयी खूश नाहीत असं कारण त्यावेळी सांगितलं गेलं होतं. शूटिंगच्या तारखा आणि कामाचे तास यावरनं देखील प्रॉडक्शन हाऊस सोबत त्यांचा वाद सुरु असल्याची चर्चा होती. पण आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी शैलेश लोढा यांच्या मालिका सोडण्याच्या बातमीत काही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. तरी दुसरीकडे मालिकेची इत्तंभूत आतली-बाहेरची माहिती ठेवणाऱ्या सूत्रांचं मात्र भलतंच सांगणं आहे.
एका सूत्राच्या म्हणण्यानुसार,शैलेश लोढा यांचे काही वाद सुरु आहेत ज्याच्यातून मार्ग काढण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. सुरुवातीला आपण जाणून घेऊया यासंदर्भात मालिकेचे निर्माते असित मोदी यांचं काय म्हणणं आहे. असित मोदी यांनी 'शैलेश लोढा यांचा मालिकेला रामराम' या बातमीसंदर्भात एका इंग्रजी वेबसाईटशी बातचीत करताना स्पष्ट केलं आहे की,''माझ्या मालिकेत सगळे कलाकार गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहेत. आणि शैलेश लोढा मालिका सोडत आहेत असं मला सांगितलं गेलेलं नाही किंवा अशी बातमी माझ्या कानावर देखील आलेली नाही. जर मला याविषयी काही कळालं तर मी नक्कीच सांगेन. सध्या आम्ही फक्त आमची मालिका प्रेक्षकांना अधिकधिक कशी आवडेल यावर लक्ष्य केंद्रित करीत आहोत''.
तर शैलेश लोढा यांच्या मालिकेला सोडण्याच्या बातमी संदर्भात एका सूत्राकडून कळत आहे की,''गेल्या काही आठवड्यांपासून शैलेश लोढा यांच्यावर एकही ट्रॅक मालिकेत दिसला नाही. कारण त्यांनी काही दिवसांपासून मालिकेसाठी शूटिंग करणं थांबवलं आहे. पण यावरनं हे कन्फर्म सांगू शकत नाही की ते मालिका सोडत आहेत की नाही. हो,काही वाद मात्र सुरु आहेत शैलेश लोढा आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये. ज्यावर शांतपणे बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा तुम्ही एकाच मालिकेत १० वर्ष काम करता तेव्हा मतभेद होतातच. आणि ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते मतभेद संपणार नाहीत''.
याआधी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांनी मालकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. दयाबेन ही गाजलेली व्यक्तिरेखा साकारणारी दिशा वकानीपासून ते नेहा मेहता अशा कलाकारांच्या नावांचा यात समावेश आहे. नेहा मेहता ही 'मिसेस.तारक मेहता'ची भूमिका साकारत होती. सूत्रांच्या माहितीनुसार,दिशा वकानी आणि नेहा मेहता यांनीदेखील प्रॉडक्शन हाऊसोबतच्या मतभेदांमुळेच मालिका सोडल्याचं कारण समोर आलं होतं.