भाई - व्यक्ती की वल्ली (परिक्षण)

Bhai
Bhai

...फक्त आनंदच आनंद!

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे ऊर्फ भाईंच्या लग्नाचा प्रसंग. सुनीताबाईंबरोबरचा त्यांचा विवाह अगदीच घरच्या घरी आणि वकिलाला सह्या घेण्यासाठी वेळ नसल्यानं मुहूर्ताच्या एक दिवस आधीच अगदी साधेपणानं साजरा होत असतो. काही क्षणांत हा विवाह सोहळा आटपतो. पुल आपल्या भावाला, उमाकांतला म्हणतात, "अरे आपल्या सख्ख्या भावाच्या लग्नातही तू उघडाच आला का रे...' त्यावर उमाकांतही केवळ पायजमा आणि बनिअनवर लग्नाचं सोपस्कार उरकलेल्या भाईंना म्हणतो, "नवरा मुलगा तरी कुठं सुटाबुटात आहे तो...' महेश मांजरेकर दिग्दर्शक "भाई ः व्यक्ती की वल्ली' या चित्रपटातील हा प्रसंग तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवतो आणि चित्रपटभर अशाच प्रसंगांची मालिका असलेला हा चित्रपट पुलंच्या भाषेत सांगायचं तर "...फक्त आनंदच आनंद' देत राहतो.

पुलंवर चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य पेलण्याइतकंच अवघड होतं, कारण या अफाट व्यक्तिमत्त्वाच्या एकेका गुणावर एखादा चित्रपट निघू शकतो. पुन्हा कथित अर्थानं त्यांच्या आयुष्यात मोठी नाट्यमयता किंवा अनोखा संघर्ष नाही. त्यामुळं दिग्दर्शक पुलंना चित्रपटाच्या चौकटीत कसं बसवणार याबाबत मोठी उत्सुकता होती. दिग्दर्शकानं या आघाडीवर पैकीच्या पैकी मार्क मिळवले आहेत. भाई पुण्यातील प्रयाग हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्‍वास घेत असल्याच्या प्रसंगापासून चित्रपटाची सुरवात होते आणि सुनीताबाईंच्या आठवणींतून कथा पुढं सरकते. पुलंचं बालपण, त्यांचा खट्याळपणा, वडिलांनी ओळखलेले पुरुषोत्तमातील गुण व त्याला दिलेलं उत्तेजन, त्याचं पहिलं प्रेम आणि पत्नीचं तिचं निधन हा तसा फारसा ज्ञात नसलेला भाग सुरवातीच्या टप्प्यात समोर येतो. पुलंची सुनीताबाईंबरोबर ओळख होते, त्याचं प्रेम फुलतं आणि लग्नगाठ बांधली जाते हा भाग छान रंगतो. भाईंचा वेंधळेपणा, काम आणि काम यांमुळं आई आणि पत्नीकडं होणारं दुर्लक्ष, त्यांना सुनीताबाईंचा शिस्त लावण्याचा प्रयत्न यांतून कथा पुढं सरकते. भाईंच्या संसारातील दुर्लक्षामुळं सुनीताबाईंना मुलाबाळांसंदर्भात घ्यावा लागलेला कठोर निर्णय, त्यांनी लिहितं राहावं यासाठी मोजलेली किंमत हा चित्रपटातील भाग खूपच हळवा आहे. या प्रसंगांनंतर पुन्हा हास्यकल्लोळ सुरू होतो. पुलंचे वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांच्याबरोबरचे जिव्हाळ्याचे संबंध, त्यांच्या रंगणाऱ्या मैफली, तिथं घडणारं विनोद आणि गायनाचा अविस्मरणीय अनुभव देत "भाई' मालिकेतील पहिला भाग दुसऱ्या भागाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण करीत संपतो.

पुलंचा जीवनपट साकारताना पुलंच्या मुलाखती, त्यांनी लिहिलेली नाथा कामत किंवा रावसाहेबसारखी पात्रं यांचा उपयोग करण्यात आला आहे. मात्र, सर्वाधिक वापर सुनीताबाईंच्या "आहे मनोहर तरी' या आत्मचरित्राचाच झाल्याचं स्पष्ट दिसतं. फ्लॅशबॅक आणि पुलंच्या सुहृदांच्या आठवणींच्या माध्यमातून कथा पुढं नेण्याची कल्पना यशस्वी ठरली आहे. पुलंची प्रत्येक गोष्टीत विनोद शोधण्याची व कोट्या करण्याची हातोटी, पेटी वादन, संगीताचा कान या गोष्टी छान प्रसंगांच्या मदतीनं अधोरेखित करण्यात आल्या आहेत. प्रेक्षक सातत्यानं हसत राहील याची काळजी घेण्यात आली आहे. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी व वसंतराव देशपांडे यांचं गायन आणि त्याला पुलंच्या पेटीची साथ असलेला मैफलीचा प्रसंग या भागाचा कळससाध्य ठरला आहे. या प्रसंगाला सर्वच स्तरातील प्रेक्षक जोरदार दाद देत उभ्या राहून टाळ्या वाजवतात, हे मोठं यश म्हणायला हवं.

सागर देशमुखनं भाईंची अवघड भूमिका छान पेलली आहे. त्यानं पुलंची देहबोली, संवादफेक व चेहऱ्यावरचे हावभाव साकारण्यासाठी केलेला रियाज व घेतलेले कष्ट दिसतात. तारुण्यातील सुनीताबाईंच्या भूमिकेत इरावती हर्षे एकदम परफेक्‍ट. त्यांचा करारी स्वभाव आणि भाईंवरचं प्रेम त्यांनी छान साकारलं आहे. वृद्धापकाळातील सुनीताबाईंच्या भूमिकेत शुभांगी दामले यांनी संयत अभिनयानं भूमिकेत रंग भरले आहेत. सचिन खेडेकर, सतीश आळेकर, स्वानंद किरकिरे, मृणाल देशपांडे, पद्मनाथ बिंड, अजय पूरकर, वीणा जामकर, सुनील बर्वे, सक्षम कुलकर्णी आदींनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

एकंदरीतच, पु. ल. देशपांडे या "अष्टपैलू खेळिया'च्या प्रवासाचा पहिला भाग छानच रंगला आहे. पहिल्या प्रसंगापासून चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवत चित्रपट या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची नेमकी ओळख करून देतो व त्याचबरोबर दुसऱ्या भागाबद्दल मोठ्या अपेक्षाही निर्माण करतो. आजूबाजूला अनेक नकारात्मक घटना घडत असताना तुम्हाला फक्त आनंद आणि आनंदच घ्यायचा असल्यास हा चित्रपट पाहायलाच हवा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com