कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ लवकरच प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

एक नजर

  • ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम चा ‘भोवनी’ चित्रपट लवकरच.
  • नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची निर्मिती
  • अजित खाडे चित्रपटाचे निर्माते
  • कोकणातल्या कलाकारांचा चित्रपटात समावेश

रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला अकादमीने चित्रपटासाठी स्थानिक संयोजनातून येथील कलाकारांना नवी दिशा दिली आहे.

येथील एका छोट्या गावातील वाडीतल्या तरुण खलाशाची आदर्श शिक्षक बनण्याची धडपड व प्रेयसीला मुंबईत काम मिळवून देण्यासाठी केलेल्या तडजोडीची ही गोष्ट आहे. यातूनच समाजव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, राजकीय भ्रष्ट व्यवस्था तसेच कोकणातील वाड्यांमधील वास्तवावर हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटाचा बाज फेस्टीव्हल मुव्ही, आर्ट मुव्हीकडे कलणारा असला तरी सामान्य प्रेक्षकांनाही भुरळ पाडेल, 
अशीच कथा आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप शिवगण, सहदिग्दर्शन ऋषीकेश लांजेकर तर छायाचित्रण सचिन सावंत, अविनाश लोहार यांनी केले आहे. वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. नितीन चव्हाण यांनी मदत केली. चित्रपट निर्मितीसाठी आजही मुंबई, पुणे, कोल्हापूरांवर अवलंबून आहेत. 

पण हा चित्रपट सर्व तांत्रिक अंगाने परिपूर्ण असून कोकणात केला आहे. यासाठी लागणारे बरेच साहित्य (उदा रिफ्लेक्‍टर आणि बॉक्‍सेस) आम्ही इथेच तयार केले. सध्या चित्रपटाचं डबिंग, एडिटिंग रत्नागिरीतच सुरू आहे. दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील अनेक लोकांनी संस्थांनी, पोलिस प्रशासन, पालिका, गीताभवन मंडळ, या सर्वांनी यासाठी खूप सहकार्य केले आहे. 

रत्नागिरीत फिल्म इंडस्ट्री सुरू व्हावी...
कोकणातल्या स्थानिक कलाकारांना प्रेरणा मिळावी आणि हळूहळू विशेषतः रत्नागिरीतच एक छोटी फिल्म इंडस्ट्री सुरू व्हावी. बाहेरच्या निर्मात्या दिग्दर्शकांनी इथं येऊन चित्रपट बनवावा. अशा सर्व तांत्रिक सोयी इथ निर्माण व्हाव्यात, असे एक स्वप्न घेऊन ही कलाकृती निर्माण केली असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप शिवगण यांनी सांगितले.

रत्नागिरीतच ९० टक्के काम
या चित्रपटाचे ९० टक्के काम रत्नागिरीतच झाले आहे. याची संपूर्ण तांत्रिक टीम, प्रॉडक्‍शन टीम ही कीर कला अकादमीचे विद्यार्थीच करत आहेत. जयगड, जाकादेवी, आगरनरळ, चवे, ओलपाटवाडी, रत्नागिरी, काळबादेवी आदी ठिकाणी शूटिंग झाले आहे. स्थानिक कलाकार, ज्येष्ठ रंगकर्मीनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhovani of Konkan artists will release soon