esakal | ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानला मोठा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan khan

ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानला मोठा दिलासा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यनला Aryan Khan मोठा दिलासा मिळाला आहे. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्जप्रकरणी आर्यनची पुढील कोठडी मागणार नाही, असं केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी स्पष्ट केलं आहे. 'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार, ज्या क्षणी आर्यनला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली जाईल, त्याचे वकील त्याच्या जामिनासाठी अर्ज करतील. प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली.

मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीने शनिवारी (ता. २) रंगलेल्या पार्टीदरम्यान छापा टाकून प्रतिबंधक अमली पदार्थांचा साठा जप्त केला. रात्री उशिरा झालेल्या कारवाईत एनसीबीने आठ संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर तीन जणांना एनसीबीने अटक केली. आर्यन खान याला मेट्रोपॉलिटन दंडाधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. आर्यनसोबत अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धमेचा यांनाही कोठडी देण्यात आली. ॲड. सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खानच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला. एनसीबीने पाच ऑक्टोबरपर्यंत या तिघांच्या एनसीबी कोठडीची मागणी केली होती. त्यावर हा जामीनपात्र गुन्हा असून, तिघांकडे प्रतिबंधित पदार्थ सापडले नसल्याचा युक्तिवाद ॲड. मानशिंदे यांनी केला.

हेही वाचा: ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानच्या अटकेनंतर जया बच्चन का होतायत ट्रोल?

ड्रग्स आणण्यासाठी युक्ती

कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमएसारखे ड्रग्ज क्रूझवर आणण्यासाठी या पार्टीला आलेल्या प्रत्येकाने शक्कल लढविल्याचे तपासात उघडकीस आले. यात शाहरूख खानचा मुलगा आर्यन याने तर डोळ्याच्या लेन्सच्या डब्यातून ड्रग्ज नेल्याचे समोर आले, तर कुणी कंबरपट्टा, अंतर्वस्त्र आदींचा वापर केल्याचे एनसीबीच्या सूत्रांकडून समजते. पुरुषांच्या शर्टाची कॉलर, हाताच्या बाह्या, पॅन्टच्या कमरपट्ट्याजवळील शिलाई उसवून, महिलांच्या हँडबॅगच्या हँडलमध्ये लपवून अमली पदार्थ आणले होते.

सोशल मीडियावर जाहिरात

तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी क्रूझवर पार्टीचे आयोजन केले होते. सोशल मीडियावर जाहिरात केलेल्या क्रूझ पार्टीमुळे एनसीबी दक्ष झाली. त्यांनी त्या क्रूझवर बुकिंग केले. या पार्टीसाठी ८० हजार ते ५ लाख रुपयांची एंट्री फी ठेवल्याने एनसीबीला अधिकच संशय बळावला. इन्स्टाग्रामवरून पार्टीचे निमंत्रण दिले होते. या पार्टीला दिल्लीतल्या तरुणांचाही सहभाग होता. विमानाने मुंबई गाठून ते क्रूझवर पोहचले होते. अरबाज नावाचा व्यक्ती शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवर घेऊन आला होता. अरबाजच्या बुटांमधून ड्रग्ज जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीकडून तब्बल सात तास कारवाई सुरू होती.

loading image
go to top