Bigg Boss Marathi 4: बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का? महेश मांजरेकर म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss marathi 4 mahesh manjrekar said bigg boss marathi scripted or not

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का? महेश मांजरेकर म्हणाले..

bigg boss marathi 4 : ‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाची उत्कंठा संपली असून येत्या २ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याने अधिकच उत्सुकता आहे. वाद, भांडण, दंगा, प्रेम याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा खेळ बराच लोकप्रिय आहे. पण वीस मिनिटांची मालिका स्क्रिप्टेड असते तर 100 दिवस आणि 24 तास चालणारा हा खेळ स्क्रिप्टेड असेल कि नाही असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. हे सगळं पूर्व नियोजित आहे असेही बोलले जाते पण हे स्क्रिप्टेड आहे की नाही याविषयी स्वतः महेश मांजरेकर यांनीच खुलासा केला आहे. (bigg boss marathi 4 mahesh manjrekar said bigg boss marathi scripted or not)

‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व लवकरच सुरू होणार आहे. यंदा ‘ALL IS WELL’ अशी थीम असणार आहे. त्यामुळे काय विशेष असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिवाय यंदाही महेश मांजरेकर सूत्रसंचालन करणार असल्याने कुणाची आणि कशी शाळा लागणार हे पाहण्याची उत्सुकता आहे. शिवाय यंदा स्पर्धक कोण असणार आणि खेळ कोणते असतं, टास्क कसे असतील हेही अजून गुलदस्त्यात आहे. पण ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड आहे अशी टीका वारंवार केली जाते. नुकतंच या टीकांवर महेश मांजरेकरांनी उत्तर दिले आहे.

मांजरेकर म्हणाले, ''मी ‘बिग बॉस’साठी काहीही तयारी केलेली नाही. हीच माझी तयारी असते. मी ठरवून काहीच करत नाही. स्पर्धक जसे वागतात त्यावरच माझी रिअॅक्शन असते. ‘बिग बॉस’चा होस्ट म्हणून अनुभव फारच चांगला आहे. माझ्यासाठी ‘बिग बॉस’ची ती संपूर्ण प्रक्रिया फार आनंद देणारी असते. मला ‘बिग बॉस’ हा शो भयंकर आवडतो. मी ‘बिग बॉस’ होस्ट करेपर्यंत कधीही ‘बिग बॉस’ पाहिला नव्हता. त्यानंतर मी तो होस्ट करायचं म्हणून तो पाहिला. हा फारच चांगला शो आहे.''

पुढे ते म्हणाले ''लोक मला येऊन विचारतात की हा शो स्क्रिप्टेड असतो का? त्यावर मी त्यांना सांगू इच्छितो की, एखादे नाटक करताना आम्ही महिनाभर सराव करतो. इथे २४ तास आणि १०० दिवस…. म्हणजे किती महिने सराव करावा लागेल. बरं मला कितीतरी स्पर्धकांनी सांगितलंय की आम्ही असं वागायचं, हे करायचं असे ठरवून जातो, पण ते होत नाही. त्याचं कारण म्हणजे ज्या काही घटना आत घडतात, त्यावर तिकडे प्रतिक्रिया उमटते. मी पूर्ण आठवडा तो शो पाहतो आणि त्यानंतर मला समजतं की कोणाची काय वाजवायची असते.''