
'अबोली'मध्ये होणार 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची एण्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली (Aboli) मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. सोनियाच्या खुनाच्या तपासात इन्सपेक्टर अंकुश आणि अबोली एकत्र लढत आहेत. या तपासात अबोली ही महत्वाची साक्षीदार आहे. त्यामुळे सोनियाचा खुनी अर्थातच विश्वासची अटक ही निश्चित झालीय. यातून पळवाट शोधण्यासाठी आता विश्वासने एका वकिलाची मदत घेण्याचं ठरवलं आहे. विजया राजाध्यक्ष असं या वकिलाचं नाव असून बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रेशम टिपणीस (Resham Tipnis) ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
अबोली मालिकेतील या व्यक्तिरेखेविषयी सांगताना रेशम टिपणीस म्हणाली, ‘अबोली मालिकेच्या निमित्ताने मी खूप दिवसांनंतर मराठी मालिकेत काम करतेय. जेव्हा या भूमिकेसाठी मला विचारणा झाली तेव्हा हे पात्र मला खूप आवडलं त्यामुळे मी लगेच होकार दिला. विजया राजाध्यक्ष पेशाने वकिल आहे. तिला तिच्या शिक्षणाचा खूप गर्व आहे. कोणतीही केस लढवताना पैसे मिळवणं हा एकच हेतू तिच्या मनात असतो. विजयाच्या एण्ट्रीने मालिकेत नवं नाट्य घडणार आहे.'
हेही वाचा: अभिनेत्रीच्या चार महिन्यांच्या मुलाला कोरोना; सांगितला हृदयद्रावक अनुभव

अबोली या मालिकेत अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची कथा दाखविण्यात येत आहे. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारतेय. याशिवाय मालिकेत सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी दमदार कलाकारांची फौज आहे. अबोली दररोज रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
Web Title: Bigg Boss Marathi Fame Actress To Enter In Aboli Serial
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..