अभिनेता इरफान खानचं वयाच्या ५४ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

इरफानची तब्येत अधिकंच खालावल्याने त्याला आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं..मात्र अखेर कॅन्सरशी लढता लढता त्याचं आज निधन झालं. 

मुंबई- बॉलीवूड अभिनेता इरफान खानचं वयाच्या ५४ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं.  २८ एप्रिल रोजी अचानक प्रकृती खालावल्याने तो मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात दाखल झाला होता. इरफानची तब्येत अधिकंच खालावल्याने त्याला आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं..मात्र अखेर कॅन्सरशी लढता लढता त्याचं आज निधन झालं. 

दिग्दर्शक सुजीत सरकार यांनी ट्वीट करुन इरफानला श्रद्धांजली वाहिली. सुजित यांनी ट्वीट करत लिहिलंय, माझा जवळचा मित्र इरफान खान. तु लढलास, लढलास आणि शेवटपर्यंत लढत राहिलास. मला तुझा गर्व आहे. सुतापा आणि बबील यांना आधार. तुम्ही सुद्धा लढा. सुतापा तु त्याच्या या लढ्यात जे शक्य होईल ते केलंस. इरफान तुला माझा सलाम.

सुत्रांच्या माहीतीनुसार मंगळवारी सकाळी इरफान बाथरुममध्ये पडला होता. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता तसंच अचानक अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार त्याने केली होती. म्हणूनंच त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच इरफानची आई सईदा बेगम यांच जयपूरमध्ये निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे आणि प्रकृती ठीक नसल्याने इरफान जयपूरला जाऊ शकला नाही. इरफानने व्हिडिओ कॉलवरंच त्याच्या आईचं अंतिम दर्शन घेतलं आणि त्याच्या नातेवाईकांशी तो बोलला. 

२ वर्षांपूर्वी इरफानला त्याच्या आजाराविषयी कळालं होतं

दोन वर्षांपूर्वी मार्च २०१८ मध्ये इरफानला त्याच्या आजारपणाविषयी कळालं होतं. त्याने स्वतः त्याच्या चाहत्यांना ही बातमी सोशल मिडीयाद्वारे दिली होती. इरफानने ट्वीट करत लिहिलं होतं, ''आयुष्यात अचानक असं काही होतं जो तुम्हाला खुप पुढे घेऊन जातं. माझ्या आयुष्यात गेले काही दिवस असंच काहीसं सुरु आहे. मला न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा आजार झाला आहे. मात्र माझ्याजवळ असलेल्या लोकांचं प्रेम आणि ताकदीने माझ्यात नवी उमेद जागी केली आहे.''

इरफानला त्याच्या आजारपणाचं कारण कळताच तो त्यावर उपचार घेण्यासाठी लंडनला गेला होता. तिथे त्याने एक वर्ष उपचार केल्यानंतर २०१९मध्ये तो भारतात परत आला होता. 

२०१९मध्ये उपचार करुन भारतात परतेला इरफान

लंडनवरुन उपचार करुन आल्यानंतर इरफान अंग्रेजी मिडीयम सिनेमाच्या शूटसाठी राजस्थानमध्ये गेला होता आणि त्याच्या पुढच्या शेड्युलसाठी लंडनला गेला आणि तिथे गेल्यानंतर तो डॉक्टरांच्या संपर्कात देखील होता. मात्र लॉकडाऊन जाहीर करण्याच्या दोन दिवस आधीच सिनेमा रिलीज झाल्याने बॉक्स ऑफीसवर कमाई करु शकला नाही. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्याआधी इरफानने हा सिनेमा त्याच्यासाठी खूप खास असल्याचं म्हटलं होतं.

bollywood actor irrfan khan dies at the age of 54 due to cancer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actor irrfan khan dies at the age of 54 due to cancer