esakal | प्रसिध्द अभिनेते रणधीर कपूर रुग्णालयात

बोलून बातमी शोधा

 bollywood actor Randhir Kapoor
प्रसिध्द अभिनेते रणधीर कपूर रुग्णालयात
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - देशभरात कोरोना हाहाकार पाहायला मिळत आहे. अशावेळी कोरोनाला कशाप्रकारे सामोरं जाव असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शासकीय यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. देशात व्हॅक्सिनेशनचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. तरीही कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही. बॉलीवूडमध्येही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे. अनेकांनी घरीच क्वॉरंनटाईन होणं पसंद केलं आहे. तर काही सेलिब्रेटी रुग्णालयात उपचार घेत आहे. यापूर्वी जे सेलिब्रेटी कोविडच्या उपचारासाठी दाखल झाले होते त्यांनी रुग्णालयात जाणवलेल्या परिस्थितीविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या.

आता बॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रणधीर कपूर हे 74 वर्षांचे आहेत. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रणधीर यांना रुग्णलयात दाखल करावे लागल्यानं कपूर कुटुंबियांची आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे. इटी टाइम्सनं सांगितल्यानुसार, कोकिलाबेन रुग्णालयाचे सीइओ संतोष शेट्टी यांनी सांगितले की, रणधीर कपूर हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. काल रात्रीपासून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.

दीड वर्षांपूर्वी दिवंगत अभिनेता राज कपूर यांच्या पाच मुलांपैकी तीन जणांचे निधन झाले आहे. रणधीर यांचा भाऊ ऋषी कपूर यांची कॅन्सर बरोबर चाललेली झुंज अपयशी ठरली. 30 एप्रिल 2020 रोजी त्यांचे निधन झाले. तर 9 फेब्रुवारीला राजीव यांना देवाज्ञा झाली. यापूर्वी त्यांची बहिण ऋतु नंदा यांचेही 14 जानेवारी 2020 मध्ये निधन झाले होते.

रणधीर कपूर यांनी श्री 420 या चित्रपटातून एक बाल कलाकार म्हणून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर रणधीर यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. कल, आज और कल, जवानी दिवानी, रामपूर का लक्ष्मण आणि चाचा भतीजा चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.