esakal | सुशांतला आत्महत्या करायला भाग पाडलं? बॉलिवूडची काळी बाजू येतेय समोर
sakal

बोलून बातमी शोधा

sushant rajput

सुशांतच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील कलाकार आणि इतर मंडळींनी आम्ही त्याच्या संपर्कात रहायला हवं होतं पण ते करता आलं नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुशांतला आत्महत्या करायला भाग पाडलं? बॉलिवूडची काळी बाजू येतेय समोर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरीच उलट सुलट चर्चा सुरु आहे. अनेक दिग्गजांनी आपण सुशांतच्या संपर्कात नसल्याचं खुलेआम मान्य केलं आहे. यामुळं फिल्म इंडस्ट्रीची काळी बाजूच समोर आली आहे. आता यावरही काहींनी टीका केली आहे. सुशांतच्या अचानक जाण्याने धक्का बसल्याचं काहींनी म्हटलं.

अभिनेत्री श्रद्धा दास म्हणाली की, जे लोक म्हणतात की आम्हाला धक्का बसला आहे, त्याला भेटलो असतो तर... अशा प्रकारची बडबड... खरंतर हे खोटे लोक आहेत. तुम्ही का प्रार्थना करत आहात? तुम्ही भेटायला पाहिजे होतात? प्रत्येकवेळी अशा प्रकारच्या चर्चेचा अर्थ काय असतो. तुम्हाला अनेकदा जाणीवही होत नाही की यासाठी तुम्ही जबाबदार आहात.

रविवारची दुपार बॉलिवूडसह सर्वांनाच धक्का देणारी होती. अचानक सुशांत सिंग राजपूत गेल्याची बातमी धडकली. अनेकांचा विश्वास बसला नाही. हसत खेळत असलेला हा अभिनेता अचानक असा निर्णय घेण्यापर्यंत कसा पोहोचला असा प्रश्न सर्वांनाच पडला. अत्यंत हुशार असलेल्या सुशांतने AIEEE ची परीक्षा उत्तीर्ण होऊन सातवी रँक मिळवली होती. अभिनयात त्यानं लहानशा कारकिर्दीत बरेच चढ उतार अनुभवले. कमी काळात अनेक हिट चित्रपट दिले आणि वेगळी छाप उमटवली. मात्र त्याच्या आत्महत्येनंतर आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यानं आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

गेल्या काही काळापासून निराशेचा सामना करत होता अशी माहिती समोर येत आहे. त्याच्यावर उपचारही सुरु होते. मात्र गेल्या आठवड्या भरात त्यानं औषधंही वेळेवर घेतली नव्हती. बॉलिवूडच्या लहानशा करिअरमध्ये त्याचे काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप. त्याचा शेवटचा चित्रपट छिछोरे हा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला होता. आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश देणाऱ्या सुशांतनेच आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. 

बॉलिवूड अभिनेता शेखर कपूर यांनी केलेल्या ट्विटवरून वेगवेगळी चर्चा होत आहे. त्यांनी म्हटलं की, मला माहिती आहे तु असं का केलंस. हे त्या लोकांच्या कर्माचे फळ आहे. तु माझ्याशी बोलू शकला असतातस तर बरं झालं असतं असंही ते म्हणाले. त्यांचा रोख कोणाकडे होता हे मात्र समजले नाही. 

अभिनेता निखिल द्विवेदी यांनीही फिल्म इंडस्ट्रीवर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, अनेकदा फिल्म इंडस्ट्री जो ढोंगीपणा करते त्याचा राग योतो. लोक म्हणत आहेत की सुशांतच्या संपर्कात रहायला हवं होतं. पण तुम्ही तसं करत नाही कारण त्याची कारकिर्द उतरतीला लागली होती. त्यामुळे तुमचं हे ढोंग थांबवा आणि तोंड बंदच ठेवा. तुम्ही इम्रान खान, अभय देओल किंवा इतर लोकांच्या संपर्कात आहात का? नाही. जोपर्यंत त्यांचा गवगवा होता तोपर्यंतच तुम्ही संपर्कात होतात असंही द्विवेदी यांनी म्हटलं आहे. 

सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर लोकांनी डिप्रेशनबाबत जनजागृतीच सुरु केली आहे. लोकांनी एकमेकांशी बोलायला हवं. ज्यांना एकटं वाटतंय त्यांना साथ द्यायला हवी. त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं असं म्हटलं. बॉलिवूडमध्ये अनेकांनी सुशांतशी आपण बोलायला हवं होतं असं म्हटलं. मात्र तो गेल्यानंतर या सर्वांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. हयात असताना सुशांतने त्याच्या अडचणी सांगितल्या नसतील का? तेव्हा त्याच्याशी कोणी का बोललं नाही?  जर तो नैराश्याचा सामना करतोय हे माहिती होतं तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न कोणीच कसा नाही केला? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांमधून आणि ज्या पद्धतीने सुशांतच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीने सूर लावला आहे की आम्ही त्याच्या संपर्कात रहायला हवं होतं पण ते करता आलं नाही त्यामधून बॉलिवूडची काळी बाजूच समोर येत आहे.

loading image