"बुधा'मुळे निसर्गाशी नव्याने मैत्री 

budha marathi movie review
budha marathi movie review

आतापर्यंत कित्येक गाजलेल्या कादंबरींवर मराठी चित्रपट बनलेले आहेत. त्यातील काही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे. आता ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या "माचीवरला बुधा' या अजरामर साहित्यकृतीवर चित्रपट आला आहे. मानव आणि निसर्गाचे अद्वैत अधोरेखित करणाऱ्या या कादंबरीवर दिग्दर्शक विजय दत्त यांनी "माचीवरला बुधा' हा चित्रपट आणलेला आहे. गोनीदांनी या कादंबरीत निसर्गाचे अतुलनीय वर्णन केले आहे. माणूस आणि निसर्ग यांचे नाते अधोरेखित केले आहे.

दिग्दर्शक विजय दत्त यांनी कादंबरीच्या मूळ आकृतिबंधाला धक्का न लावता चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे त्यांना चांगली साथ पटकथा लेखक प्रताप गंगावणे यांची लाभलेली आहे. कारण मुळात एखाद्या कादंबरीवर चित्रपट काढणे मोठे जिकिरीचे आणि कौशल्याचे काम असते; परंतु दिग्दर्शक विजय दत्त आणि प्रताप गंगावणे यांनी हे शिवधनुष्य चांगलेच पेललेले दिसते. मुंबईतील धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेला बुधा चऱ्हाटे (सुहास पळशीकर) राजमाची येथे येऊन निसर्गाच्या कुशीत राहत असतो. तेथे तो एकटाच राहत असतो. हळूहळू त्याचे प्राणी आणि पक्ष्यांशी अनोखे नाते निर्माण होते. निसर्ग, प्राणी आणि पक्षी हेच काही आपले जीवन आहे, असे तो मानतो. झाडांना तो झाडोबा म्हणतो. तो आवळीचे झाड लावतो. त्याला आपल्या मुलीसारखे वागवतो; तर टीप्या या पाळीव कुत्र्याला मुलासारखे वागवतो. निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवनाचा खरा आनंद काय असतो, हे त्याला कळते. शेवटच्या श्‍वासापर्यंत तो प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत असतो. निसर्ग आणि माणसाचे नाते किती सुंदर असू शकते हे तो दाखवून देतो. बुधाचे एकूणच हे जीवन तसेच पक्षी आणि प्राणी यांच्याबद्दल त्याला असलेले प्रेम, निसर्गाचा ऱ्हास होऊ नये म्हणून त्याची चाललेली धडपड वगैरे गोष्टी दिग्दर्शक विजय दत्त यांनी छान टिपल्या आहेत आणि योग्य असा संदेशही दिला आहे. राजमाचीच्या गडावर तसेच आजूबाजूच्या परिसरात जाऊन चित्रीकरण करणे अवघड बाब होती. त्यातच पाऊस आणि वाऱ्याचा सामना करून चित्रीकरण करणे म्हणजे खूप कठीण बाब होती; परंतु विजय दत्त यांनी सर्व गोष्टींवर मोठ्या हिमतीने मात करून चित्रीकरण केले. चित्रपटाची एकूणच कथा आणि त्याला दिलेली ट्रीटमेंट नक्कीच चांगली आहे. सुहास पुळशीकर हे मुरब्बी आणि तितकेच अनुभवी अभिनेते आहेत. त्यांनी बुधाच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. भूमिकेच्या अंतरंगात कसे शिरायचे हे कुणीही त्यांच्याकडून शिकावे असेच हा चित्रपट पाहिल्यानंतर वाटते. 

स्मिता गोंदकर, भगवान पाचोरे, नितीन कुलकर्णी आणि बालकलाकार कृष्णा दत्त यांची कामेही चोख आहेत. चित्रपटातील लोकेशन्स अप्रतिम आणि मनाला भुरळ घालणारी आहेत. राजमाची परिसराची सुंदरता सिनेमॅटोग्राफर अनिकेत खंडागळे आणि योगेश कोळी यांनी पडद्यावर अप्रतिम रेखाटली आहेत. अनिल गांधी यांनी संकलनाची जबाबदारी छान सांभाळली आहे. आतापर्यंत आपण नायक आणि नायिकांनी गायलेली गाणी ऐकत आणि पाहत आलो आहोत; परंतु या चित्रपटात पक्ष्यांनी गायलेले गाणे हा एक वेगळा प्रयोग आहे. त्याबद्दल निर्मात्या दीपिका दत्त आणि योगिनी आडकर यांचे कौतुक. या चित्रपटाला साऊंड डिझायनिंगची उत्तम जोड लाभलेली आहे; मात्र चित्रपटाची लांबी काही अंशी कमी करणे आवश्‍यक होते. त्याबाबतीत विचार झालेला दिसत नाही. तसेच फुला (स्मिता गोंदकर) ही व्यक्तिरेखा मूळ कादंबरीत नसली तरीही दिग्दर्शकाने त्या व्यक्तिरेखेवर अधिक काम करणे आवश्‍यक होते असे वाटते. तरीही खिळवून ठेवणारा आणि निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणारा हा चित्रपट आहे. निसर्ग आणि माणसातील नाते अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com