सेलिब्रेटी बाप्पा! शेवटी आपली भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची... - शंकर महादेवन

संतोष भिंगार्डे
Wednesday, 12 August 2020

दरवर्षी आम्ही ट्रकवर मूर्ती ठेवून वाजतगाजत मिरवणुकीने तिचे विसर्जन करीत असतो. यंदा तसे काही करता येणार नाही. आम्ही आमच्या बंगल्यातच एका मोठ्या पिंपात मूर्तीचे विसर्जन करणार आहोत.

संकटहारक, विघ्ननाशक गणरायाच्या आगमनास महामुंबई सज्ज झाली आहे. यंदाचा हा काळ तसा संकटाचा, पण विघ्नहर्त्याच्या भक्तीपुढे या विघ्नांचा काय पाड? तमाम भक्तमंडळी मोठ्या आतुरतेने विनायकाची प्रतीक्षा करीत आहे, उत्सवाच्या तयारीला लागली आहे. यंदाच्या या कोरोनाकाळात ते कसा साजरा करणार आहेत गणेशोत्सव... वाचा त्यांच्याच शब्दांत. 

--------------------------------

शंकर महादेवन

गणेशोत्सवाचे दहा दिवस आमचे घर कसे गजबजलेले असते. माझ्या कुटुंबातील सर्वच जण गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात. माझी दोन्ही मुले उत्सवाची जोरदार तयारी करतात. आम्ही नेहमी पेणहून मूर्ती आणतो. आमची मूर्ती साधारण पाच किंवा सहा फुटांची असते, पण यंदा सरकारी निर्बंधाचा आदर करीत आम्ही दोन फुटांचीच मूर्ती ऑनलाईनवरून मागवली आहे. एका वेबसाईटवर शाडूची माती आणि पेपर मिक्‍स अशा आकाराची मूर्ती मला दिसली. आमच्या सगळ्यांच्या ती पसंतीस पडली आणि आम्ही ती बुक केली. मूर्तीची थोडीफार सजावट करण्यासाठी आम्ही खास पेणहून एका कारागिराला बोलाविले आहे. तो येईल आणि रंगरंगोटी करील.

सेलिब्रेटी बाप्पा! मंगेशकर कुटूंबियांना विघ्नहर्त्यांच्या आगमनाची उत्सुकता...

त्यानंतर मात्र आमच्या बंगल्यात कोणालाच प्रवेश नसेल. आमच्या परिवारातील सदस्यच गणेशोत्सव साजरा करू. घरी पूजा-अर्चा वगैरे आमची आम्हीच करतो. उत्सवाचे दहा दिवस आमच्यासाठी मंगलमय असतात. पहिल्याच दिवशी दुपारी आरती आणि नैवेद्य झाल्यानंतर संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी भजनाची सुरेल मैफल रंगते. आमच्या घरी उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये सातशे ते आठशे माणसे गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दहा दिवसांत नेहमीच आमचा बंगला गजबजलेला असतो. मात्र, यंदाची परिस्थिती खूप निराळी आहे. कोरोना संकटामुळे यंदाचे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत वाईट अन्‌ घातक आहे. गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवही आपल्याला साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. सरकारी नियमांचे पालन करूनच सण साजरे करा.

सेलिब्रेटी बाप्पा! आमच्या गणेशाची  यंदा ऑनलाईन पूजा - सुरेश वाडकर 

भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची... 
दरवर्षी आम्ही ट्रकवर मूर्ती ठेवून वाजतगाजत मिरवणुकीने तिचे विसर्जन करीत असतो. यंदा तसे काही करता येणार नाही. आम्ही आमच्या बंगल्यातच एका मोठ्या पिंपात मूर्तीचे विसर्जन करणार आहोत. अद्याप काही त्याबाबत ठरलेले नाही, परंतु सरकारी नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करणार आहोत. शेवटी आपली भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची... 
-------------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Bappa in the end, your devotion and faith is important ... - Shankar Mahadevan