सेलिब्रेटी बाप्पा! गणेशोत्सव महत्त्वाचा आहेच; पण आरोग्यही सांभाळा - अभिजित खांडकेकर 

संतोष भिंगार्डे
Friday, 14 August 2020

अभिनेता अभिजित खांडकेकर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत आला आहे. कोरोना संकटाच्या काळात त्याच्याकडे दहा दिवस बाप्पाचा पाहुणचार असेल; पण दरम्यान आरोग्यही जपा, असं तो आवर्जून सांगतोय. 

अभिनेता अभिजित खांडकेकर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत आला आहे. कोरोना संकटाच्या काळात त्याच्याकडे दहा दिवस बाप्पाचा पाहुणचार असेल; पण दरम्यान आरोग्यही जपा, असं तो आवर्जून सांगतोय. 
-- 

आमच्या घरी दर वर्षी दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. आम्ही उत्सव साधेपणानेच साजरा करतो. अर्थातच इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर जास्तीत जास्त भर असतो. त्यामुळे मूर्ती मोठी किंवा नावीन्यपूर्ण असावी, असं आमच्या कधीच मनात येत नाही. माझे आई-बाबा, पत्नी सुखदा आणि मी असे आम्ही सगळे जण मिळून भक्तिभावाने गणेशाची पूजा करतो. 
आमच्या बाप्पाची मूर्ती साधारण एक फुटाची असते. गणेशाची आराससुद्धा आम्ही कायम फुलांचीच करतो. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतो. फुले कोमेजली की आम्ही ती बदलत राहतो. यंदाच्या वर्षीही आम्ही साधेपणानेच गणेशोत्सव साजरा करणार आहोत. शाडूची मूर्ती आणणार आहोत. ती एक फुटाचीच असेल. फुलांची आरास करणार आहोत. सरकारी नियमांनुसार उत्सव साजरा करू. यंदा मूर्तीचे विसर्जनही आम्ही घरच्या घरी बादलीमध्ये किंवा पिंपात करणार आहोत. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठेही बाहेर जाऊन विसर्जन करणे धोक्‍याचे आहे. मी सर्व गणेशभक्तांना हेच आवाहन करेन, की कृपया विसर्जनाच्या वेळी गर्दीत जाणे टाळा. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. आता आपणच आपली तब्येत सांभाळली तरच पुढे बाप्पा आपली काळजी घेईल. 

सेलिब्रेटी बाप्पा! यंदा आरोग्य उत्सव  साजरा करू - स्वप्नील जोशी 

दहा दिवसांचा उत्सव असला, तरी पहिले एक-दोन दिवस आमच्याकडे आमचे नातेवाईक, पत्रकार मित्र आणि मित्र परिवार गणेशाचे दर्शन घ्यायला येतो. त्या दोन दिवसांत आमच्याकडे भरपूर मंडळींची ये-जा सुरू असते. यंदा मात्र मी सगळ्यांना दर्शनाला घरी येण्याचे कटाक्षाने टाळा, असे आवाहन केले आहे. यंदा आम्ही सुरक्षित अंतराबाबतचे पालन पूर्णपणे करणार आहोत. आपल्याला बाप्पा महत्त्वाचा आहेच; पण आपले आरोग्यही तेवढेच मोलाचे आहे. 

सेलिब्रेटी बाप्पा! शेवटी आपली भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची...
 - शंकर महादेवन

खर्च वाचवा; मदत करा! 
गणेशोत्सवासाठी दर वर्षी आपण जो खर्च मूर्ती किंवा सजावटीवर करतो तो यंदा वाचवा. ते पैसे एखाद्या कोरोनायोद्‌ध्याला, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एखाद्या सामाजिक संस्थेला किंवा लॉकडाऊनमुळे खरोखर पैशांची अडचण निर्माण झाली असेल, अशा एखाद्या गरजू व्यक्तीला द्या, असे आवाहन मी सगळ्यांना करतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Bappa! Ganeshotsav is important; But also take care of health - Abhijit Khandkekar